श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली.
काही दिवसांपूर्वी पुलवामा डिग्री महाविद्यालयाबाहेर नाका लावू देण्यास विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्याविरोधात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये 65 विद्यार्थी जखमी झाले होते. त्याचाच निषेध म्हणून श्रीनगरच्या एस पी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज मौलाना आझाद रोडवर मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी अश्रू धुराचा वापर केला. यानंतर विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याने या मोर्चालाही हिंसक वळण लागलं आहे. जवानांच्या लाठीचार्जविरोधात काश्मीर खोऱ्यातील सर्व महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.