कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारामय्या यांनी आज (20 मे) शपथ घेतली. उपमुख्यमंत्रि म्हणून डीके शिवकुमार यांनी शपथ घेतली.बेंगळुरूच्या कांतिरवा स्टेडिअमवर शपथविधीचा कार्यक्रम पार सुरू आहे.
शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित आहेत.
सिद्धारामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासोबत 8 नेते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील.
डॉ. G परमेश्वरा, K H मुनियप्पा, K J जॉर्ज, M B पाटील, सतीश जराकिहोली, प्रियांक खर्गे, रामालिंगा रेड्डी, B Z झमीर अहमद खान हे आठ जण मंत्रिपदाची शपथ घेतील.
या शपथविधीला विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला
अभिनेते कमल हसन
शिवसेना खासदार अनिल देसाई
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
माकप नेते सीताराम येचुरी
भाकप नेते डी. राजा
डीके शिवकुमार की सिद्धरामय्या या दोन नावांभोवती निवडणूक निकालानंतरचं कर्नाटकचं राजकारण फिरत होतं. अखेर मुख्यमंत्रीपदी सिद्धारामय्या यांची निवड झाली आहे. काँग्रेस नेते के.वेणुगोपाल यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चढाओढीत सिद्धारामय्या शिवकुमार यांच्यावर वरचढ का ठरताना दिसले याचा घेतलेला हा आढावा.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लोकशाही पद्धतीने गटनेता म्हणून त्यांची निवड केली आहे हे अतिशय स्पष्ट आहे. पण किती आमदार त्यांच्या बाजूने होते आणि डीके शिवकुमार यांच्या बाजूने किती आमदार होते हे मात्र काँग्रेसने स्पष्ट केलं नाही.
निवडणुकीनंतर झालेल्या एका सर्वेक्षणात लोकनिती नेटवर्क आणि सीएसडीएस यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार हे स्पष्ट झालं आहे की मुख्यमंत्रीपदासाठी 39 टक्के लोकांची पसंती सिद्धारामय्या यांना होती तर 18 टक्के लोकांची पसंती बसवराज बोम्मई यांना होती. डीके शिवकुमार यांना फक्त चार टक्के लोकांची पसंती होती.
राजकीय विश्लेषक डी.उमापती बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले, “सिद्धारामय्या जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांची प्रतिमा लालू प्रसादांसारखी ग्रामीण बाज असलेल्या नेत्यासारखी आहे. दोन नेत्यांची तुलना केली जाऊ शकत नाही. मात्र सिद्धारामय्या आणि लालू प्रसाद दोघंही ग्रामीण भाषा बोलतात. सिद्धारामय्या यांच्याबद्दल लोकांना माहिती आहे. ते कायम गरीब वर्गाच्या कल्याणाचा विचार करतात आणि सरकार चालवण्याचं त्यांचं कसब वाखाण्ण्यासारखं आहे.”
लोकनीती नेटवर्कचे राष्ट्रीय संयोजक आणि राजकीय विश्लेषक प्रोफेसर संदीप शास्त्री बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले, “लोकांना एकत्र घेऊन चालणारा नेता अशी सिद्धारामय्या यांची जनतेत प्रतिमा आहे. तर शिवकुमार यांची प्रतिमा कुशल संघटक आणि निष्ठावंत अशी आहे. पक्षासाठी पैसा आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.”
मात्र सिद्धारामय्या यांची जमेची बाजू अशी आहे की त्यांच्याकडे एक मोठी व्होट बँक आहे. लोकसंख्येत आठ टक्के प्रमाण असलेल्या समुदायाचे ते नेते आहेत.
मात्र एका काँग्रेस नेत्याने बीबीसीला सांगितलं की सिद्धारामय्या मुस्लिम लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा लोकांना भावते.
लोकप्रियतेत आघाडीवर
तसे सिद्धारामय्या म्हैसूरला राहणारे आहेत. मात्र ते राज्याच्या एका मोठ्या वर्गात ते अतिशय लोकप्रिय आहेत. अहिंदा (अल्पसंख्याक इतर मागासवर्गीय आणि दलित) मतदारांचा गट जो देवेगौडा यांनी जनता दल सेक्युलर पासून वेगळं होण्याआधी तयार केला होता तो 2013 च्या तुलनेत यावेळी जास्त प्रभावशाली ठरला आहे.
भाजप सरकारने आरक्षण धोरणात बदल केला तेव्हा इतर मागासवर्गीय लोकांचा एक गट काँग्रेसकडे परत आला आणि दलित मतदारांनी सुद्धा काँग्रेसची साथ दिली.
डी. उमापती सांगतात, “अहिंदू मतदार परत आल्यामुळे सिद्धारामय्या इतर मागासवर्गीयांचे मसीहा असल्याचं काँग्रेसने भासवलं. यावेळी दलित वर्गाने काँग्रेसला मतं दिली. ही क्षमता डीकेंकडे नाही. मात्र पक्षाला संकटातून बाहेर काढायचं असेल तर त्यांचासारखा नेता नाही.”
शिवकुमार कनकपुराचे आहेत. त्यांचा बंगळुरू ग्रामीण हा लोकसभा मतदारसंघ अतिशय प्रभावशाली आहे. त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांचा प्रभाव यावेळी कर्नाटकाच्या दक्षिण भागात पसरला आहे. तिथे शिवकुमार यांच्या वोक्कालिगा समुदायाच्या मतदारांचा दबदबा आहे. शिवकुमार प्रभावशाली समुदायाचे आहेत. त्यांच्या प्रभावामुळे जेडीएस ची मतं काँग्रेस आणि भाजपच्या मते विभागली गेली.
तर दुसऱ्या बाजूला प्रोफेसर संदीप शास्त्री सांगतात की, “लोकांची समजूत घालण्यात सिद्धारमय्या कुशल आहेत त्यामुळे त्यांची लोकप्रियता जास्त आहे. या प्रकरणी शिवकुमार सिद्धारामय्या यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतात. त्यांचं असं आहे की एकतर आमचं ऐका किंवा चालतं व्हा.”
संदीप शास्त्री एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात जो या निवडणुकीत वारंवार उपस्थित झाला होता.
ते सांगतात, “निवडणुकीदरम्यान पैसे गोळा करण्याच्या शिवकुमार यांच्या कौशल्याचा काँग्रेसने फायदा घेतला आहे. तुम्हाला आठवत असेल की, मोदी म्हणाले होते की काँग्रेस कर्नाटकला एटीएम मशीन करेल. त्यांच्या आरोपात काहीतरी तथ्य होतं.”
शिवकुमार दुसऱ्या क्रमांकावर का?
शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एक मोठा अडथळा म्हणजे त्यांच्याविरुद्ध असलेल्या केसेस. काँग्रेसला भीती आहे की त्यांना जर मुख्यमंत्री केलं तर त्यांच्याविरुद्धच्या सगळ्या केसेस बाहेर काढल्या जातील. त्यांच्यावर आयकर आणि केंद्रीय कायदे मोडल्याचा आरोप आहे.
जेव्हा शिवकुमार यांच्यावर केंद्रीय संस्थांनी धाड घातली होती तेव्हा त्यांना अटक करून तिहार जेलमध्ये ठेवलं होतं. त्याचदरम्यान शिवकुमार यांना भेटायला सोनिया गांधी तिहार तुरुंगात गेल्या होत्या तेव्हा त्यांनी शिवकुमार यांना कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष करण्याचं आश्वासन दिलं होतं.
उमापती सांगतात, “शिवकुमार यांचा दावा 100 टक्के बरोबर आहे. कारण ते पक्षाप्रति एकनिष्ठ आहेत आणि पक्षासाठी निधी गोळा करण्यात सुद्धा त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही.”
सिद्धारामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागलेला नाही.
उमापती सांगतात, “सिद्धारामय्या यांच्यावर अर्कावती हाऊसिंग सोसायटीच्या मुदद्यावर आरोप लागले होते. मात्र त्यांच्यावर कोणताच आरोप सिद्ध झालेला नाही. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांच्यावर भाजपा एकही खटला दाखल करू शकलेली नाही.”
मुख्यमंत्र्यांची निवड करताना पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचाही काँग्रेस पक्षाने विचार केल्याचं दिसत आहे.
यावेळी पक्षाला त्यांच्या जागा वाढवायच्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 28 जागांपैकी एका जागेवर विजय मिळवता आला. एक जागा जेडीसने जिंकली होती. इतर 26 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.
Published By- Priya Dixit