येत्या काही दिवसात अॅपच्या माध्यमातून घरातील वीज बंद करता येणार आहे. वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएल कंपनीने देशामध्ये पहिल्यांदा ही संकल्पना आणली आहे. प्रायोगिकस्तरावर चंदननगर येथील २५० घरांमध्ये स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत. दिवाळीनंतर हे काम सुरू होईल. सध्या शहरात डिजिटल मीटर लागले असून त्याची किंमत १२०० रुपये आहे. स्मार्ट मीटरची किंमत त्यापेक्षा ३००० रुपयांनी अधिक राहणार आहे. स्मार्ट मीटरला अॅपशी जोडले जाईल. कंपनी प्रायोगिक मीटर लावण्यासाठी पैसे घेणार नाही व मीटरशी जोडणारे अॅपही ग्राहकाच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून दिले जाईल.
अॅपद्वारे ग्राहकाला कुठूनही घरातील वीज पुरवठा बंद करता येईल. तसेच, त्याला विजेच्या उपयोगाची माहिती मिळू शकेल. विजेचे बिलही अॅपवर येईल. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरीवर लक्ष ठेवले जाईल. या मीटरमुळे कंपनीचा मीटर रिडिंग घेण्याचा व बिले वाटण्याचा खर्च वाचेल. विजेचे आॅडिट करता येईल. वीज चोरीची माहिती तात्काळ मिळू शकेल. मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही.