पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समुळे राज्याच्या तिजोरीत भर पडत असली तरी त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरचे टॅक्स कमी करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी वरील सूचना करताना त्यांचा रोख विशेषतः बिगरभाजपशासित राज्यांकडे असल्याचं दिसून आलं.
देशभरातील सर्व राज्यांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरांची तुलना करताना राज्यांनी टॅक्स कमी करण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं. देशातील सर्व राज्यांनी गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे इंधनावरील व्हॅट कमी करावं, असं मोदी म्हणाले.
मुंबईपेक्षा दीव-दमणमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे, त्याकडे लक्ष वेधताना, मी याठिकाणी कुणावर टीका करण्यासाठी आलेलो नाही, सर्वांना प्रार्थना करत आहे, असं मोदी यांनी म्हटलं.
कोरोनाचं आव्हान अजूनही कायम
कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.
कोरोना व्हायरसचं आव्हान अजूनही कायम आहे. कोरोनाविरुद्ध लस हेच सर्वांत मोठी कवच आहे, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.
6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस तयार आहे. त्यांच्या लसीकरणाचा प्राधान्य देण्यात येईल, असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.
कोरोनाविरुद्धची लढाई लढत राहू आणि त्यातून मार्ग काढत राहू, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.