दोन ट्रेन समोरासमोर आल्या तरी आता त्यांच्यामध्ये टक्कर होणार नाही. स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच'ची चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे.
सिकंदराबादमध्ये एकाच रुळावर दोन गाड्या समोरासमोर पूर्ण वेगाने आणून स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली प्रतिकूल परिस्थितीत गाड्यांची टक्कर थांबवू शकते का? याची यशस्वी चाचणी करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने या चाचणीचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच' हे रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) ने भारतीय उद्योगाच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे तंत्र इतकं अचूक आहे की, भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन गाड्या समोरासमोर आल्या तरी त्यांची टक्कर होणार नाही.
रेड सिग्नल ओलांडताच ट्रेनला आपोआप ब्रेक लागेल. यावेळी मागूनही एखादी ट्रेन येत असेल तर ती ट्रेनही आपोआप थांबेल. ट्रेन मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असेल तरीही दुसरी ट्रेन समोर आल्यानंतर आपोआप ब्रेक लावला जाईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे.