आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. बस नाल्यात कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहे. त्यापैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यात आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि बस चालकाचा समावेश आहे. पश्चिम गोदावरीच्या जांगेरेड्डीगुडेम येथे हा अपघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस अश्वरापेठहुन जांगेरेड्डीगुडेम कडे जाणारी बस बुधवारी सकाळी पुलाचे कठडे तोडून नाल्यात पडली. पुलाच्या कठड्याला धडकल्याने अनियंत्रित होऊन बस 25 फूट खाली पाण्यात पडली. आणि उलटली त्यामुळे प्रवाशी अडकून पडले. या अपघातात 9 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर 22 जण गंभीर जखमी आहे. बस मध्ये एकूण 47 प्रवाशी होते.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
आंध्रप्रदेशचे राज्यपाल विश्वभुषण हरिचंदन यांनी ही अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.