कर्नाटकमधील हट्टीहोले गावात राहणाऱ्या उमेश शेट्टी यांच्या मुलगीचे हरवलेले दागिने सगळ्या गावाने मिळून शोधले आहेत. या घटनेत शेट्टी यांनी आपली मुलगी कुसुम हिच्या लग्नासाठी दागिने केले होते. कॉफीच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या शेट्टी यांच्या घराच्या परिसरात १६ ऑगस्ट रोजी भूस्खलन झालं. संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. त्यात त्यांच्या घरात असलेलं लोखंडी कपाटही त्यात होतं. २६ ऑगस्ट रोजी कुसुम हिचा विवाह असल्याने मुलीला दागिन्यांशिवायच लग्नाला उभं राहावं लागेल, ही भीती शेट्टी यांना होती. शेट्टी राहतात तो परिसर दुर्गम असल्याने तिथे वाहन पोहोचणं कठीण होतं. शेवटी दागिने शोधण्यासाठी सगळा गाव मोठा ढिगारा उपसू लागला. त्यानंतर एका स्थानिक आमदाराने दिलेल्या जेसीबीने ढिगारा उपसला गेला आणि लोखंडी कपाट मिळालं. त्यातले दागिने सुस्थितीत असले तरीही लग्नासाठी ठेवलेले पैसे गायब असल्याचं शेट्टी यांनी सांगितले.