टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं नुकतचं अपघाती निधन झालं. मुंबई-अहमदाबाद हायवेवर कारचं नियंत्रण सुटल्यानं त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. पण अपघातानंतर नेमक्या कुठल्या गोष्टीमुळं त्यांचा मृत्यू झाला, याचं कारण शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.
दरम्यान, सीटबेल्टचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना सायरस मिस्त्री यांचा मृत्यू शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांना झालेली गंभीर इजा आणि अनेक फ्रॅक्चर्समुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांच्या मृतदेहांचं शवविच्छेदन जे. जे. रुग्णालयात करण्यात आलं.
या अहवालात नमूद केल्यानुसार, असायरस मिस्त्री यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊन मेंदूतून अतीरक्तस्त्राव झाला. छाती, डोके, मांडी आणि मानेत अनेक फ्रॅक्चर्स झाले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची गंभीर इजा शरीराला बसलेल्या मोठ्या धक्क्यामुळे होऊ शकते. अशी इजा झाल्यास व्यक्तीचा लागलीच मृत्यू देखील ओढवू शकतो.
सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल हे दोघे कारच्या मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी सीटबेल्ट लावला नसल्यामुळे अपघातामध्ये त्यांच्या शरीराला जबर दुखापत झाली.