राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही चित्र देशातील नोटांवर असायला हवे. अशी मागणी करणाऱ्या कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारकडून उत्तर मागवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने सरकारला 8 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
स्वत:ला स्वातंत्र्यसैनिक म्हणवणारे 94 वर्षीय याचिकाकर्ते हरेंद्रनाथ बिस्वास यांनी आपल्या याचिकेत केंद्र सरकारने नेताजींना योग्य मान्यता दिली नसल्याचा आरोप केला आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी भारतीय चलनी नोटांवर नेताजींचे चित्र लावावे, असा युक्तिवाद केला.
भारत सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल वायजे दस्तूर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 8 आठवड्यांचा अवधी मागितला. ही मागणी मान्य करून मुख्य न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती राजर्षी भारद्वाज यांच्या खंडपीठाने हे प्रकरण पुढील वर्षी 21 फेब्रुवारीला सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले.