देशात मोठ्या प्रमाणावर वीज संकट निर्माण होण्याची शक्यता ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे. कोळशाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्यानं हा धोका निर्माण झाल्याचं ऊर्जा मंत्रालयानं सांगितलं आहे.
देशामधील जवळपास 72 औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असल्याचं मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं या प्रकल्पांना वेळेत कोळसा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.
या वीज प्रकल्पांना त्यांचा कोळशाचा साठा संपण्यापूर्वी कोळसा उपलब्ध करून दिला नाही, तर अनेक वीज प्रकल्प बंद पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसं झाल्यास देशात मोठं वीज संकट निर्माण होऊ शकतं.
दरम्यान, सरकारी मालकीच्या कोल इंडियाचे कोळसा उत्पादन सप्टेंबरमध्ये किरकोळ वाढून 47 दशलक्ष टन झाले आहे. घरगुती कोळसा उत्पादनात कोल इंडियाचा वाटा सुमारे 80 टक्के आहे.