भूपेंद्र पटेल हे 12 डिसेंबरला सलग दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शनिवारी त्यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. राज्यात भाजप सलग सातव्यांदा सरकार स्थापन करणार आहे.
पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. तत्पूर्वी, केंद्रीय निरीक्षक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येडियुरप्पा आणि अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत झालेल्या आमदारांच्या बैठकीत पटेल यांची नेता म्हणून निवड करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते सोमवारी दुपारी २ वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पटेल यांच्यासह सुमारे 20 कॅबिनेट मंत्री शपथ घेऊ शकतात.