तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेतील रुलबूक फेकल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
राज्यसभेमध्ये निवडणूक कायदा सुधारणा या विधेयकावर चर्चा सुरू होती. त्यावेळी डेरेक ओब्रायन यांनी विधेयक मंजूर करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. कृषी कायद्यांप्रमाणेच सरकार हे विधेयक मंजूर करत असल्याचं ते म्हणाले.
डेरेक ओब्रायन यांनी यावेळी रागामध्ये त्यांच्या हातात असलेलं संसदेचं रुलबूक सेक्रेटरी जनरल यांच्या अंगावर फेकलं आणि ते सभागृहातून निघून गेले. त्यानंतर विरोधकही सभागृहाबाहेर पडले.
त्यानंतर डेरेक ओब्रायन यांचं निलंबन करण्याच्या निर्णयासाठी मतदान घेण्यात आलं. त्यानुसार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.