विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कोविड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिका 2020-21 संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यूजीसीने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, यंदाच्या शैक्षणिक सत्राला साथीच्या आजारामुळे उशीर झाला आहे. 22 सप्टेंबर 2020 रोजी आयोगाने प्रथम वर्षातील यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक दिनदर्शिके संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.
पूर्वी 1 सप्टेंबरपासून सुरू होणार होते शैक्षणिक सत्र, आता 1 नोव्हेंबरपासून
यापूर्वी 29 एप्रिल रोजी यूजीसीने देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक दिनदर्शिका 2020-21 ची सुरुवात 1 ऑगस्ट रोजी आणि नव्याने नोंदणीकृत यूजी/ पीजी विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक दिनदर्शिका 2020-21 ची सुरुवात 1 सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे आयोगाने 6 जुलै रोजी 30 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. यानंतर, 21 सप्टेंबर 2020 रोजी तज्ज्ञ समितीच्या बैठकीत नव्याने नोंदणी झालेल्या यूजी/ पीजी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिका 2020-21 मंजूर झाली, त्यानुसार 1 नोव्हेंबरपासून सत्र सुरू केले जाईल.
यूजीसी मार्गदर्शक सूचनांनुसार यूजी/ पीजी शैक्षणिक दिनदर्शिका 2020-21 च्या प्रमुख तारखा
– प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – 31 ऑक्टोबर 2020
– प्रथम सेमिस्टरच्या फ्रेश बॅचसाठी वर्ग सुरु होण्याची तारीख – 1 नोव्हेंबर 2020
– परीक्षांच्या तयारीसाठी ब्रेक – 1 मार्च 2021 ते 7 मार्च 2021
– परीक्षा आयोजित करण्याचा कालावधी – 8 मार्च 2021 ते 26 मार्च 2021
– सेमिस्टर ब्रेक – 27 मार्च ते 4 एप्रिल 2021
– इव्हन सेमिस्टर क्लासेसची सुरुवात – 5 एप्रिल 2021
– परीक्षांच्या तयारीसाठी ब्रेक – 1 ऑगस्ट 2021 ते 8 ऑगस्ट 2021
– परीक्षा आयोजित करण्यासाठी कालावधी – 9 ऑगस्ट 2021 ते 21 ऑगस्ट 2021
– सेमिस्टर ब्रेक – 22 ऑगस्ट 2021 ते 29 ऑगस्ट 2021
– या बॅचसाठी पुढील शैक्षणिक सत्राची प्रारंभ तारीख – 30 ऑगस्ट 2021
यूजी/ पीजी अॅकॅडमिक कॅलेंडरसाठी यूजीसी मार्गदर्शक तत्त्वांचे ठळक मुद्दे
– कागदपत्र संबंधित : गुणवत्ता आधारित प्रवेश 31 ऑक्टोबरपर्यंत आणि परीक्षा आधारित प्रवेश लवकरात लवकर द्यावा. तात्पुरते प्रवेश घेता येऊ शकतात आणि पात्रता परीक्षेची कागदपत्रे 31 डिसेंबरपर्यंत सादर करता येतील.
– वर्ग संबंधित : सर्व विद्यापीठे 2020-21 आणि 2021-22 च्या सत्रासाठी सहा दिवसांच्या आठवड्याची पद्धत अवलंबू शकतात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या या बॅचेसना कमीतकमी नुकसान सहन करावे लागेल. शिक्षण सत्रांचे नुकसान कमी करण्यासाठी विद्यापीठे सुट्टी आणि ब्रेकचा कालावधी कमी करू शकतात.
– शुल्क संबंधित : 30 नोव्हेंबर 2020 नंतर प्रवेश किंवा मायग्रेशनच्या स्थितीत संपूर्ण शुल्क परत केले जाईल. यानंतर 1000 रुपये प्रक्रिया शुल्क वजा करून संपूर्ण फी 31 डिसेंबर 2020 पर्यंत परत करावी लागेल.
– कोविड -19 संबंधित : 29 एप्रिल आणि 6 जुलै रोजी आयोगाने जारी केलेले ऑनलाइन अध्यापन, परीक्षा आयोजित करणे, सामाजिक अंतर इत्यादीचे नियम लागू राहतील.
विद्यापीठांना सूट
त्याचबरोबर, यूजीसीने 22 सप्टेंबर 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन पारदर्शक पद्धतीने विद्यापीठाचे विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या हितासाठी या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाऊ शकतात. विहित धोरणांनुसार विद्यापीठे प्रवेश घेऊ शकत नसल्यास ते इतर कोणत्याही वैधानिक मार्गाने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतात. विद्यापीठे त्यांच्या संबंधित राज्य किंवा स्थानिक प्रशासनाच्या साथीच्या संबंधित नियमांनुसार बदल करु शकतात.