उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात प्रचंड हिमस्खलन झालंय. यामध्ये अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी दिली आहे. चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळला असून, धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणीपातळी प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घराचं तडाखा बसला असून, अनेकजण बेपत्ता झाले आहेत.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हिमस्खलनामुळे धौलीगंगा नदी पात्रात पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झालीये. रेणी गावाजवळच्या वीज निर्मिती प्रॉजेक्टजवळ हिमस्खलनाची घटना घडल्याची माहिती आहे. यापार्श्वभूमीवर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जिल्हा प्रशासनाला आपात्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या सूचना दिल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. लोकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये. सरकार योग्य पावलं उचलत असल्याची माहिती रावत यांनी दिली आहे.