Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तरकाशी : अडथळा आला नाही तर मध्यरात्री 40 मजुरांना बाहेर काढलं जाण्याची शक्यता

uttarkashi tunnel
, शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (11:51 IST)
उत्तरकाशीच्या सिलक्याला गावात एका बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. आज या मदत कार्याचा सातवा  दिवस आहे.
 
बोगद्याच्या बाहेर मजूर, मदत कार्य करणाऱ्या पथकातील लोक, माध्यमकर्मी आणि पोलिसांची गर्दी आहे.
 
त्याशिवाय विविध प्रकारची यंत्रं असलेल्या गाड्या आणि क्रेनचा वापर यासाठी केला जात आहे.
 
आतमध्ये अडकलेले मजूर ठिक असल्याची माहिती उत्तरकाशीचे एसएसपी अर्पण यदुवंशी यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
 
मजुरांना ऑक्सिजन, पाणी आणि खाण्याचे पदार्थ पाठवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
आत दोन किलोमीटरपर्यंत ते चालू शकतात आणि त्यांची मानसिक स्थितीही उत्तम आहे, असंही ते म्हणाले.
 
"मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना काय लागेल, यासाठीची रंगीततालिम सध्या केली जात आहे. तसंच वैद्यकीय पथक, पोलिसांचं पथक आणि मदतकार्य करणाऱ्यांच्या समन्वयानं हे काम आणि रंगीततालिम केली जात आहे," असंही यदुवंशी म्हणाले.
 
मजुरांना बाहेर काढण्यासाठी आणखी नेमका किती वेळ लागणार असा प्रश्नही त्यांना करण्यात आला.
 
त्यावर आत नेमका ढिगारा किती पसरला आहे, हे माहिती नसल्यानं नेमकी वेळ सांगता येणार नसल्याचं यदुवंशी म्हणाले.
 
पण त्याठिकाणी उपस्थित असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या मते, जर काही अडचणी आल्या नाहीत, तर शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी दुपारच्या दरम्यान त्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं.
 
प्रतीक्षा आणि संयमाचा खेळ
बोगद्याबाहेर त्यांचे नातेवाईक आणि सहकारी कामगार चांगली बातमी येण्याची वाट पाहत हिरमुसून बसलेले आहेत. त्यांना माध्यमांशी बोलायला बंदी घातली असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
बोगद्यात अडकलेले मजूर आणि ज्यांच्याशी आम्ही बोललो, ते सर्व मजूर हा बोगदा आणि हायवेचं काम करणारी कंपनी नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेड (एनईसीएल) साठी काम करतात.
 
गिरिडीहमधील एका मजुरानं म्हटलं की, त्याचे अनेक मित्र अडकलेले असल्यानं तो चिंतेत आणि तणावात आहे.
 
"मीही त्यांच्याबरोबर तिथं काम करतो. त्यादिवशी ते रात्रपाळीला होते आणि मी दिवसा काम करतो. पण त्यादिवशी दिवाळीमुळं मी सुटीवरही होतो. हा अपघात झाला नसता तर आत अडकलेले ते लोकही आज दिवाळी साजरी करत असते."
 
पण त्यांची रात्रपाळी संपण्याच्याआधीच पहाटे 5 वाजता बोगद्यात 200 मीटर अंतरावर वरचा एक भाग खाली कोसळला आणि अंदाजे 70 मीटरचा ढिगारा तयार झाला.
 
गिरिडीहमधून आलेल्या मजुरानं त्याच्या म्हणजे झारखंड राज्यातील 15 मजूर फसलेले असल्याचं सांगितलं.
 
"ते आम्हाला सांगतात की, त्यांना लवकरच बाहेर काढू. ते आम्हाला धीर देतात पण नंतर भ्रमनिरास होतो."
 
आरा, बिहारमधील नफीस अहमद यांचे चुलत भाऊ सबा अहमद टनलच्या आत अडकले आहेत.
 
ते म्हणाले त्यांचा दुसरा भाऊ गुरुवारी सबाशी बोलला असून, तो ठिक आहे.
 
"पण त्यांचे कुटुंब खूप तणावात आहे. त्यांची पत्नी आणि मुलं रडत आहेत. ते आराहून इथं येऊ शकत नाहीत. त्यामुळं मला पाठवलं आहे."
 
नफीस अहमद म्हणाले की, अधिकाऱ्यांनी त्यांना सबासह सर्व मजूर सुखरुप बाहेर येतील असं सांगितलं आहे.
 
"आम्ही आलो आहोत तर, त्यांना घेऊनच जाऊ मग कितीही वेळ लागला तरी चालेल."
 
याठिकाणचे अधिकारी एवढे घाबरलेले होते की, ते कॅमेऱ्यासमोर बोलायलाही तयार झाले नाही. तर जे बोलले त्यांनी नावं सांगितली नाही. त्यांच्या कंपनीनं त्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
वादग्रस्त योजनेतील बोगदा
हा बोगदा तयार करणारी कंपनी नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेड (एनईसीएल) च्या दोन सुपरवायझरनं आम्हाला, या बोगद्याचं काम 2018 मध्ये सुरू झालं होतं, असं सांगितलं.
 
त्यांच्यापैकी एकानं सांगितलं की, "बोगद्यात काम होण्याच्या काही काळ आधी एकदा भूस्खलन होऊन जिथं रविवारी नुकसान झालं, तिथंच नुकसान झालं होतं. ते तयार करण्यास सहा महिने लागले. पण ते तेवढंही मजबूत बनवलेलं नाही."
 
आम्ही याला दुजोरा मिळावा म्हणून साइट ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी बोललो, पण त्यांनी माध्यमांशी बोलत नाही असं सांगितलं. त्यांनी आम्हाला कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगितलं.
 
काम सुरू असलेला हा बोगदा महत्त्वाकांक्षी चार धाम योजनेचा भाग आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, आणि गंगोत्री या तीर्थस्थळांची कनेक्टिविटी वाढवण्यासाठीची ही पायाभूत सुविधा आहे.
 
पण हा एक वादग्रस्त प्रकल्प आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी या प्रकल्पामुळं अचानक पूर किंवा भूस्खलन याची शक्यता वाढल्याचं म्हटलं आहे.
 
हा अपघात रविवारी दिवाळीच्या दिवशी पहाटे झाला. शुक्रवारी या मजुरांना वाचवण्याच्या ऑपरेशनचा सहावा दिवस होता.
 
पहिल्या चार दिवसांत प्रयत्नांना यश आलं नाही. कारण उपलब्ध मशीन तो ढिगारा उपसू शकल्या नाहीत.
 
त्यामुळं दिल्लीहून डोंगर कापण्याचे मशीन आणत काम सुरू केलं. गुरुवारी त्यातही काही तांत्रिक अडचण आली होती, पण काही तासांत ती पुन्हा सुरू झाली.
 
काम संथ गतीनं सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केलं. या मशीनद्वारे ढिगाऱ्यात छीद्र होतं आणि नंतर सहा मीटर व्यासाचा एक पाईट आत टाकला जातो. ही पाइपलाईन 900 मिमी व्यासाची आहे. त्यातून मजूर बाहेर येऊ शकतील.
 
एक पाईप दुसऱ्याला जोडायला तीन तास लागत आहेत. सहा ते आठ पाईप फिट केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे काम असंच सुरू राहिलं तर शुक्रवारी मध्यरात्रीच्या आधीच मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू होऊ शकतं.
 
हा साडेचार किलोमीटरचा बोगदा तयार करण्याचं काम 2018 मध्ये सुरू झालं होतं, असं अधिकारी म्हणाले.
 
काम दोन्ही बाजुंनी सुरू झालं. आत 400 मीटरचा डोंगर अजूनही कापलेला नाही. अपघात झाला ती जागा प्रवेशद्वारापासून 200 मीटर अंतरावर आहे. त्यापुढं 70 मीटर मातीचा ढिगारा आहे. नंतर पुढे बोगदा आहे.
 
आत वीज असून पाणी आणि ऑक्सिजन एका पाईपातून सोडले जात आहे. खाण्याची पाकिटंही त्यातून पाठवली जात आहेत.
 
आत अडकलेले मजूर बिहार, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालचे सर्वाधिक आहेत.
 









Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनच्या बाजारपेठेतून कंपन्या काढता पाय का घेताहेत?