उत्तरकाशीमधील सिलक्याला बोगद्यातून मजुरांचा बचाव करण्याचे प्रयत्न अखंड सुरू आहे. आज या बचावकार्याचा (21 नोव्हेंबर) दहावा दिवस आहे.या मजुरांपर्यंत एक इंडोस्कोपी कॅमेरा पोहोचवण्यात बाचव यंत्रणांना यश आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यासंदर्भातला एक व्हीडिओ जारी केला आहे.
सहा इंच व्यासाचा एक पाईप या मजुरांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. त्याच्यामाध्यमातूनच या मजुरांना अन्नपाणी पोहोचवण्यात येत आहे.
याच सहा इंच व्यासाच्या पाईपच्या माध्यमातून हा कॅमेरा मजुरांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. साधारण हे अंतर 24 मीटर असल्याचं सांगितलं जात आहे.
व्हीडिओत हे मजूर एका ओळीत उभे असल्याचं दिसून येत आहे.
'कामागारांशी संवाद शक्य, औषधं-जेवणही पोहोचू शकतं'
राष्ट्रीय महामार्ग आणि एनएचआयडीसीएलचे संचालक अंशु एम खलखो यांनी अधिक माहिती देताना सोमवारी सांगितलं,
"आम्ही पहिलं यश मिळवलं आहे. गेल्या नऊ दिवसांपासून आम्ही प्रयत्न करत होतो आणि यालाच आमचं प्राधान्य होतं. सर्व आवश्यक उपकरणं गोळा केली असून, पुढच्या दोन दिवसात इथे पोहोचतील."
"बीआरओ उत्तरकाशी आणि बारकोटकडून रस्ते बनवत आहे. मशीन्स वजनदार आहेत. त्यांना हवाई मार्गाने आणली जाऊ शकत नाही. रस्तेमार्गांनीच आणावी लागतील. आता आम्ही त्या मशीन्सची वाट पाहतोय."
या बचवकार्यात खालील पाच संस्था एकत्र येऊन हे काम करत आहेत.
ऑईल अँड नॅचरल गॅस कोऑपरेशन (ONGC)
सतलज जल विद्युत निगम
रेल विकास निगम लिमिटेड
नॅशनल हायवे ऍन्ड इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL)
टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (THDCL)
ज्या भागात मजूर अडकले आहेत तो भाग 8.5 मी उंच आणि 2 किमी लांब आहे.
सतलज जल विद्युत निगम लिमिटेडकडून वरच्या भागातून ड्रिलिंग केलं जाणार आहे. त्यासाठी मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या मशीन्स रेल्वेमार्फत हलवल्या जाणार असून गुजरात आणि ओडिशा राज्यातून या मशीन्स येणार आहेत.
ONGC संस्था सुद्धा खोलवर ड्रिलिंग करण्यात तज्ज्ञ आहे. तेही या कामात सहभागी होतील.
पंतप्रधानांचं बारीक लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून बचाव कार्याची माहिती घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने या मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री धामी यांनीही सद्यस्थितीची माहिती घेतली. आतापर्यंत तीन वेळा मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
सर्व मजूर आत सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
Published By- Priya Dixit