Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हीडिओकॉनचे प्रमुख वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक, ICICI-व्हीडिओकॉन प्रकरण आहे काय?

व्हीडिओकॉनचे प्रमुख वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक, ICICI-व्हीडिओकॉन प्रकरण आहे काय?
, सोमवार, 26 डिसेंबर 2022 (14:43 IST)
आयसीआयसीआय कर्ज घोटाळ्याप्रकरणी व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. वेणूगोपाल धूत यांना आज (26 डिसेंबर) सत्र न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं.
पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) कोचर यांच्यासह व्हीडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत आणि इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
 
याच प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयनं शुक्रवारी (23 डिसेंबर) अटक केली होती.
व्हिडिओकाॅन समूहाला 3000 करोड रुपये कर्ज देताना अनियमितता राखल्याचा आरोप त्यांच्यावर सीबीआयनं केलाय. ज्यावेळी हे कर्ज देण्यात आलं होतं त्यावेळी त्या आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख होत्या.
 
त्यांनी मंजूर केलेली कर्जाची रक्कम त्यांच्या पतीच्या कंपनीत गुंतवल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आलाय.
 
त्यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेत त्यानुसार, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग आणि तेल-गॅस खाण कंपनी व्हिडिओकॉनचे माजी चेअरमन वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्यूएबल्स या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.
 
व्हिडिओकॉन समूहाला आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर ही गुंतवणूक करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन समूहाला दिलेलं हे कर्ज नंतर एनपीएमध्ये बदलण्यात आलं.
 
काय आहे नेमका हा वाद?
एप्रिल 2012 - ICICI बँकेनं व्हीडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. कर्जाखाली अडकलेल्या व्हीडिओकॉन समूहाला 20 बँका आणि काही आर्थिक संस्थांनी 40 हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते.
 
ऑक्टोबर 22 , 2016 - ICICI बँक आणि व्हीडिओकॉन ग्रुपमधील गुंतवणूकदार अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं. मूळत: 15 मार्च 2016रोजी लिहिलेल्या या पत्रात ICICI बँक ज्या मार्गांनी व्यवहार करत आहे, त्याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता.
 
व्हीडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचं जे कर्ज देण्यात आलं, त्यात हिंसंबंधांचा गैरवापर करण्याची शक्यता असल्याचं वर्तवण्यात आलं होतं. यामागे चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे व्हीडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
 
मार्च 28, 2018 - ICICI बँकेच्या मंडळानं एक पत्रक जाहीर करून चंदा कोचर यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं होतं. तसंच या व्यवहारात कुठल्याही प्रकारची चूक आणि हितसंबंधांचा गैरवापर झालेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
 
ICICI बँक आणि बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी अशी अफवा पसरवण्यात अली, असं पत्रकात म्हटलं होतं.
 
मार्च 29, 2018 - इंडियन एक्स्प्रेसच्या एका बातमीमध्ये दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्यात झालेल्या आर्थिक देवाणघेवाण आणि व्यावसायिक व्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आला होता. त्यानुसार...
 
• 2008च्या डिसेंबर महिन्यात दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांनी एकत्र येत न्यू-पॉवर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी तयार केली. या कंपनीत कोचर आणि धूत यांचा 50-50% हिस्सा होता.
 
• जानेवारी 2009 महिन्यात धूत यांनी कंपनीच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आणि आपले 25, 000 शेयर फक्त 25 लाख रुपयांना दीपक कोचर यांच्या कंपनीला ट्रान्सफर केले.
 
• यानंतर मार्च 2010मध्ये न्यू-पॉवर कंपनीला सुप्रीम एनर्जी प्राइवेट लिमिटेड कंपनीकडून 64 कोटींचं कर्ज मिळालं. सुप्रीम एनर्जी प्राइवेट लिमिटेड कंपनी धूत यांच्या मालकीची आहे.
 
• 2010च्या मार्च महिन्याच्या शेवटी धूत यांची सुप्रीम एनर्जी कंपनी न्यू-पॉवर कंपनीत 94.9 टक्के भागीदार बनली.
 
• नोव्हेंबर 2010मध्ये धूत यांनी सुप्रीम एनर्जी कंपनीतली आपली संपूर्ण भागीदारी महेश चंद्र पुगलिया यांच्याकडे ट्रान्सफर केली.
 
• 2012मध्ये पुगलिया यांनी त्यांची संपूर्ण भागीदारी पिनॅकल एनर्जी या ट्रस्टला ट्रान्सफर केली. ट्रान्सफर केलेली रक्कम फक्त नऊ लाख रुपये होती. दीपक कोचर या ट्रस्टचे अध्यक्ष होते.
 
• याचा परिणाम असा झाला की, कधीकाळी न्यू पॉवर कंपनीला 64 कोटी रुपयांचं कर्ज देणारी सुप्रीम एनर्जी ही कंपनी तीन वर्षांच्या आत पिनॅकल एनर्जीमध्ये सामील झाली.
 
• हा व्यवहार झाल्याच्या सहा महिन्यांपूर्वी व्हीडिओकॉन समूहाला ICICI बँकेकडून 3,250 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालं होतं.
 
• यापैकी जवळपास 86 टक्के रक्कम म्हणजे 2,810 कोटी रुपये बाकी आहे आणि व्हीडिओकॉन समूहाचं खातं non-performing asset (NPA) म्हणून ICICI बँकेनं 2017मध्ये जाहीर केलं होतं.
 
मार्च 31, 2018
दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांची प्राथमिक चौकशी CBI करणार असल्याचं माध्यमांतून समोर आलं होतं. तेव्हा चंदा कोचर यांच्या नावाचा प्राथमिक चौकशीत समावेश करण्यात आला नाही.
 
एप्रिल 4, 2018
आयकर विभागाकडून संबंधित प्रकरणाबद्दल दीपक कोचर यांच्या न्यू-पॉवर कंपनीला नोटीस बजावण्यात आली.
 
मे 24, 2018
SEBIने ICICI बँक आणि बँकेच्या MD आणि CEO चंदा कोचर यांना कारणे-दाखवा नोटीस पाठवली.
 
मे 30, 2018
चंदा कोचर यांच्याविरोधातल्या आरोपांवरची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल, असं ICICI बँकेनं म्हटलं आहे. चौकशी सुरू असताना बँकेनं अनिश्चित काळासाठी त्यांना रजेवर पाठवलं आहे, अशा काही बातम्या सुरुवातीला आल्या. पण नंतर बँकेकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं की, चंदा कोचर या वार्षिक सुट्टीवर आहेत.
 
24 जानेवारी, 2018
सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईतील दोन तर औरंगाबादच्या एका कार्यालयावर छापे टाकले. त्यानंतर CBIने चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
 
आयसीआयसीआय बँकेने यावर स्वतंत्र तपास करण्याचा निर्णय घेतला. बँकेने 30 मे 2021 रोजी बोर्ड व्हिसल ब्लोअरच्या आरोपांची 'तपशीलवार तपासणी' करण्याची घोषणा केली.
 
पुढे या प्रकरणाच्या स्वतंत्र तपासाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी एन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली.
 
शेवटी एप्रिल महिन्यात सीबीआयने हे प्रकरण आपल्या हाती घेतलं. त्यानंतर दीपक कोचर, व्हिडिओकॉन ग्रुप आणि इतर अज्ञात लोकांमधील व्यवहाराचा तपास सुरू झाला.
 
कोचर यांच्यानंतर संदीप बक्षी हे बँकेचे सीइओ बनले. पुढे चंदा कोचर यांनी राजीनामा दिल्यानंतर संदीप बक्षी यांची बँकेचे पूर्णवेळ सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पॅराशूटचा बेल्ट तुटून 400 फुटांवरून पडून साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू