आंतरराष्ट्रीय स्तरावर जिव्या सोमा म्हसे यांनी वारली चित्रकलेला जगमान्यता मिळवून दिली. म्हसे यांना १९७६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तर २०१६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रांमधून वारली संस्कृती, कला याचे अनोखे चित्रण त्यांनी केले. रशिया, इटली, जर्मन, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांमध्ये म्हसे यांची चित्रकला पोहचली आहे. त्यांच्या वारली पेटिंगवर खूश होऊन बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना १७ लाख रुपयांचे बक्षीस दिले होते, तर जपानच्या मिथिला म्युझिअमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्तेदेखील त्यांचा गौरव करण्यात आला.