Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘मोदी सरकारचे 2 हजार नको’ ते ‘काँग्रेस जोडो असं यात्रेचं नाव हवं’ इथपर्यंत...

congress
, मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (13:43 IST)
Author,श्रीकांत बंगाळे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन आता 9 दिवस झाले आहेत.
 
7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये पोहचलेली ही यात्रा आज विदर्भात प्रवेश करत आहे.
 
बीबीसी मराठीनं 7 ते 11 नोव्हेंबरदरम्यान ही यात्रा कव्हर केली. या दरम्यान, राहुल गांधींच्या यात्रेबद्दल मराठवाड्यातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं आणि त्यांचे प्रश्न नेमके आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.
 
‘राहुल यांना पाहायला आलोय’
 
7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी राहुल गांधी देगलूरला पोहोचणार असल्यानं नगर परिषदेच्या शेजारील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठी गर्दी जमली होती.
 
राहुल यांना पाहण्यासाठी तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला रस्त्याच्या दोन्ही बाजूनं उभे होते.
 
पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्त दिसून येत होता. राहुल यांना पाहण्यासाठी जमलेली मंडळी हातातला फोन बाहेर काढून राहुल यांचा फोटो टिपण्यासाठी सज्ज होती.
 
इथंच आमची भेट संगम बिरादार यांच्याशी झाली. ते देगलूर तालुक्यातल्या मालेगावमध्ये राहतात आणि शेती करतात.
 
कशासाठी आलात, असं विचारल्यावर ते म्हणाले, “मी राहुल गांधींना पाहायला आलोय. पहिल्यांदाच ते देगलूरला येत आहेत. आमच्या अनेक मित्रांनी तसे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. ते पाहून मग मीही देगलूरला आलो. राहुल गांधी साडेसहाला येईल असं सांगण्यात आलं होतं. पण त्यांना लेट झालं," असं संगम सांगत होते.
 
राहुल गांधी यांचा कोणता मुद्दा पटतोय, यावर ते म्हणाले, “महागाईचा मुद्दा आम्हाला जास्त पटतोय. सगळ्याच गोष्टी महाग झाल्यात. शेतमाल आणि शेतीच्या अवजारांवरसुद्धा जीएसटी लागलाय.
 
या यात्रेचा 2024 च्या निवडणुकीवर परिणाम होईल असं वाटतं का, असं विचारल्यावर ते म्हणाले, “नांदेडमध्ये पहिल्यापासून काँग्रेस आहे आणि 2024 मध्येही काँग्रेसच राहिल. पण, देशात काय होईल माहिती नाही. कारण मोदी शेवटी मोदी आहे.”
 
संगम यांच्याशेजारीच त्यांच्या गावातील दुसरा व्यक्ती बसला होता.
 
संगम यांचं बोलणं संपताच तो म्हणाला, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा नक्की परिणाम होईल. 30 ते 40 % परिणाम होईल.”
 
राहुल गांधी रात्री जवळपास नऊच्या सुमारास शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचले. तिथं स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं.
 
राहुल यांना पाहण्यासाठी मुस्लिम समाजातील पुरुष आणि स्त्रियांची संख्या इथं लक्षणीय प्रमाणात होती. हा पट्टा मुस्लीम लोकांचा आहे म्हणून एवढी गर्दी झालीये, असं सिद्धार्थ कांबळे नावाचा विद्यार्थी सांगत होता.
 
राहुल यांचं छोटेखानी भाषण झालं. त्यानंतर रात्री 9 च्या सुमारास त्यांच्या नेतृत्वाखाली देगलूर ते वन्नाळी अशी मशाल यात्रा काढण्यात आली.
 
8 तारखेला गुरुनानक जयंती असल्यामुळे राहुल यांनी 7 तारखेच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वन्नाळी येथील गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं. त्यासाठी ही मशाल यात्रा काढण्यात आली.
 
यासाठी देगलूर ते वन्नाळीच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूनं राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले होते.
 
गुरुद्वारातील दर्शनानंतर राहुल देगलूरला मुक्कामी परत आले. आम्ही वन्नाळीहून परत यायला निघालो, तेव्हा रस्त्यावर लावण्यात आलेले झेंडे लोक काढून नेत असल्याचं दिसलं.
 
8 तारखेला सकाळी 8 वाजता राहुल यांची पदयात्रा वन्नाळीहून सुरू झाली. आम्हीही या पदयात्रेत चालायला लागलो.
 
सकाळच्या टप्प्यात वन्नाळी ते वझरगा असा या यात्रेचा प्रवास होता. वन्नाळी आणि वझरगा या दोन्ही गावांमध्ये राहुल यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. महिला घराच्या गच्चीवर जाऊन राहुल यांची वाट बघत असल्याचं दिसत होतं.
 
भारत जोडो पदयात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत स्थानिक काँग्रेसचे नेते, पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, काही समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसंच पत्रकारही सहभागी झाले होते.
 
पदयात्रेत सामील झालेल्या लोकांसाठी जागोजागी पाण्याची सोय करण्यात आली होती. केळीही वाटप केली जात होती.
 
सकाळी 10 वाजता वझरग्याला यात्रा पोहचली. तिथं 10 ते 4 असा ब्रेक घेण्यात आला. दुपारी 4 वाजता वझरग्याहून शंकरनगरकडे ही यात्रा निघाली.
 
रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गाड्यांची गर्दी झाल्यामुळे पत्रकारांसहित काँग्रेसच्या आमदारांच्या गाड्याही ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिसत होतं.
 
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही यात्रा शंकरनगर या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचली. तिथं राहुल यांनी सभेला संबोधित केलं.
 
8 तारखेला राहुल यांच्या पदयात्रेदरम्यान नागपूरचे काँग्रेसचे पदाधिकारी कृष्णकुमार पांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. राहुल यांनी सभेला संबोधित करताना पांडेंना श्रद्धांजली अर्पण केली.
 
यावेळी राहुल यांनी त्यांच्या भाषणात बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी प्रश्नांचा उल्लेख केला.
 
बेरोजगारी, महागाई आणि शेतीचे प्रश्न या प्रमुख समस्या
भारत जोडो यात्रा कव्हर करत असताना आम्ही मराठवाड्यातील काही गावांमध्ये जाऊन तिथले प्रश्न समजून घेतले.
 
देगलूर तालुक्यातील शहापूरमध्ये आमची भेट माधव गायकवाड यांच्याशी झाली. ते उच्चशिक्षित असून पेंटिंगचा व्यवसाय करत आहेत.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “आमच्या भागात बेरोजगारी हीच मोठी समस्या आहे. गावात बहुतेक सगळी मुलं डिग्री पूर्ण झालेले आहेत, पण नोकऱ्या मिळत नाही. नवीन नोकर भरती होत नाहीये.”
 
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेविषयी काय वाटतं, असं विचारल्यावर ते म्हणाले, “मी यात्रेत सहभागी व्हायला नाही, तर राहुल गांधींना पाहायला जाणार आहे.
 
"भारत जोडो असं यात्रेचं नाव आहे, पण मूळात भारत एकच आहे. मग जोडो कुठून आलं? या यात्रेचं नाव काँग्रेस जोडो असं ठेवायचं होतं.”
 
याच गावातील तरुण शेतकरी चंद्रशेखर सुरकंटे गेल्या 4 वर्षांपासून कृषी पंपाच्या कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत.
 
ते म्हणाले, “बियाणे, औषधे खूप महाग झाले आहेत. शेतीचा खर्च आता परवडत नाहीये. दुसरं म्हणजे रात्री 8 तास लाईट दिली जाते. रात्री 12 वाजता शेतात पाणी द्यायला जावं लागतं. वीज कनेक्शनसाठी मी क्वोटेशन भरून 4 वर्षं झाली आहेत. पण अजूनही मला कनेक्शन मिळालेलं नाहीये. वरुनच निधी येत नाही, तर आम्ही काय करणार? असं अधिकारी सांगतात.”
 
राहुल गांधी यांनी त्यांच्या शंकरनगर येथील सभेत मांडलेले महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे मुद्दे आपल्याला पटत असल्याचं यात्रेकरू आणि मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील जनतेतील लोकांचं मत आहे.
 
पण, ही माणसं त्यांच्या स्थानिक नेत्यांवर कमालीची नाराज असल्याचं दिसून येतं. मतदान झाल्यावर 5 वर्षं स्थानिक नेते फिरकत नसल्याचं ग्रामीण भागातील नागरिक सांगतात. त्यामुळे राहुल यांनी गावागावात येऊन आमचे प्रश्न जाणून घ्यावेत, अशी अपेक्षा ते व्यक्त करत होते.
 
8 तारखेला संध्याकाळी शंकरनगर येथे राहुल गांधी यांची सभा ऐकायला धुप्पा गावच्या महिला उपस्थित होत्या.
 
9 तारखेच्या सकाळी आम्ही धुप्पा गावात जाऊन या महिलांशी चर्चा केली.
 
धुप्पा येथील रहिवासी ज्योती म्हणाल्या, “आमचे आजी-आजोबा सांगायचे की त्यांनी राजीव गांधींना बघितलंय. आज राहुल गांधी आमच्या घरापुढे येत असल्यामुळे त्यांना बघावं असं आम्हाला वाटलं आणि आम्ही तिथं गेलो.”
 
शेतमालाला विक्रीवेळी योग्य बाजारभाव मिळायला हवा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
 
ज्योती यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मिळाला होता. पण आता गॅसच्या वाढलेल्या किंमतीमुळे त्यांनी तो सिलेंडर घरात एका कोपऱ्यात ठेवला आहे आणि त्या चुलीचाच वापर करत आहेत.
 
याच गावातील 75 वर्षीय मुक्ताबाई कांबळे म्हणाल्या, “आमच्या समस्या काही सुटत नाही. 600 रुपयाला गॅस होता, आता 1200 ला झालाय. घरात 10 माणसं आहेत. कसं खावं आणि कसं राहावं? राहुल गांधींना एवढ्या पब्लिकमध्ये आम्ही दिसणं शक्य आहे का? ते आम्हाला बाय बाय करत गेले, आम्ही त्यांना बाय-बाय केलं. त्यांनी इथं येऊन आमच्यात बसून आमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे.”
 
या महिलांशी चर्चा करून झाल्यानंतर आम्ही कृष्णूर इथं पोहचलो. 9 नोव्हेंबरचा राहुल यांचा मुक्काम इथंच होता.
 
10 नोव्हेंबरच्या सकाळी कापशी गुंफा येथून निघालेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चंदासिंग कॉर्नर येथे विश्रांतीसाठी थांबली होती. राहुल गांधी दुपारी चार वाजता इथून निघून नांदेड शहरात प्रवेश करणार होते. त्यांना पाहण्यासाठी सकाळच्या अकरा वाजेपासून इथं गर्दी जमली होती.
 
इथं आमची भेट टाकळगावहून आलेले गोविंदराव पाटे या आजोबांशी झाली. राहुल गांधी यांच्या नांदेड येथील सभेत सहभागी होण्यासाठी ते चालले होते.
 
ते म्हणाले, “इंदिरा गांधींपासून आम्ही काँग्रेसला मतदान करतो. राहुल गांधी पंतप्रधान व्हावं अशी आमची आशा आहे. अशोकराव साहेब राहुल यांच्या पाठीमागे राहावं अशी आशा आहे.”
 
पण, महिन्याभरापूर्वी तर अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती, असं म्हटल्यावर ते म्हणाले, “अशोक रावांनी राहुल गांधींसोबतच राहावं, अशी आमची इच्छा आहे.”
 
इथंही राहुल गांधी त्यांच्या भाषणांमध्ये उपस्थित करत असलेले बेरोजगारी, महागाई आणि शेतीचे प्रश्न आपल्याला पटत असल्याचं अनेकांनी आम्हाला सांगितलं.
 
दुपारी दोनच्या सुमारास आमची भेट प्रल्हाद कोलते यांच्याशी झाली. राहुल यांच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून आम्ही आमच्या गाडीच्या दिशेनं चालत असताना कोलते आम्हाला भेटले.
 
ते म्हणाले, “भारत 1947 लाच तुटलाय, आता काय जोडणार? नांदेडमध्ये एमआयडीसी बंद झाल्यात, कारखाने बंद झालेत. इथं काहीच नाही. गरीब लोकांनी फक्त हमाली करायची.”
 
बेरोजगारी वाढली असं नाही का वाटतं, असं विचारल्यावर ते म्हणाले, “एकाच्या घरी दीड-दीड लाख पगार देण्यापेक्षा अनेक लोकांना वीस-वीस हजार पगार दिला जातोय, मोदी तरी यापेक्षा दुसरं काय करणार? “या रस्त्यावरून आपण चाललोय तो राहुल गांधी येणार म्हणून आता साफ केलाय. नाहीतर इथं लोक दारू पिऊन पडलेले असतात. इथं सगळीकडे कचरा असतो. आता नीट केलंय त्यांनी हे सगळं. विकास करा म्हणा त्यांना नांदेडचा,” रस्त्याकडे बोट दाखवून कोलत बोलत होते.
 
कोलते यांचा रोख नांदेडच्या स्थानिक नेत्यांकडे होते.
 
तुमचं नाव काय असं विचारल्यावर ते म्हणाले, “मी गरीब हाये साहेब. खरं काय ते बोललो. नाव कशाला पाहिजे?”
 
राहुल गांधींची सभा ऐकायला जाणार आहे, ते काय म्हणतात तेही पाहायचं आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, देगलूर ते नांदेड या 80 किलोमीटरच्या प्रवासात रस्त्यावर दोन्ही बाजूला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा फोटो असलेले बॅनर्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते.
 
चव्हाण यांच्यासोबतच बॅनरवरील त्यांच्या मुलीचा श्रीजया चव्हाण यांचा फोटोही अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता.
 
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अशोक चव्हाण आपल्या मुलीला उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करू पाहत असल्याचं स्थानिक नागरिक आणि जाणकारांचं म्हणणं आहे.
 
10 नोव्हेंबरला संध्याकाळी राहुल गांधी यांची नांदेड येथे जाहीर सभा झाली. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. राहुल यांचं भाषण सुरू असताना काही जण सभास्थळाहून बाहेर पडतानाही दिसत होते.
 
प्रत्येक मतदारसंघातून 400 ते 500, तर प्रत्येक गावातून 5 ते 10 गाड्या आणण्याचं टार्गेट असल्याचं स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं होतं.
 
नांदेडमधून हिंगोलीत प्रवेश
11 तारखेच्या सकाळी राहुल यांची भारत जोडो यात्रा नांदेडहून हिंगोलीच्या दिशेनं निघाली. अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता येथे सकाळी 10 वाजता ही यात्रा पोहोचली.
 
इथं आमची भेट शेतकरी कैलास वाठोरे यांच्याशी झाली. ते हदगाव तालुक्यातील फाटेगाव उमरी इथं राहतात. त्यांच्याकडे 4 एकर शेती आहे.
 
राहुल गांधींमुळे राजकारणात बदल होईल, अशी अपेक्षा ठेवून ते या यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. ते सांगतात, “मोदी सरकार शेतमालाला जे भाव देत आहे, ते आम्हाला बरे वाटत नाहीत. ते विमा देत आहेत किंवा दोन हजार खात्यावर टाकत आहेत, ते आता आम्हाला नको. त्यांनी खताचे भाव स्थिर ठेवावेत, मालाला भाव ठीक द्यावा.”
 
पुंडलिक मुलगीर सुद्धा हदगाव तालुक्यातून आले होते.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “आम्ही एक शेतकरी आहोत. रातंदिवस शेतामधी राबराब राबतो. लाईटची इतकी वाईट अवस्था आहे. आम्हाला वाटलं 2014 नंतर मोदी साहेब अच्छे दिन आणतील, पण आमचे बुरेच दिन आले. कोण्या मालाला भाव नाही. खताचे भाव हजाराहून अठराशेला गेले. आमच्या सोयाबीन, कापसाला कशालाच भाव नाही. आम्हाला मोदींनी चोवीस तास लाईट द्यावी, आम्ही त्यांना त्यांचे दोन हजार परत देऊन टाकतो.”
 
नरेंद्र मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत वर्षाला 6 हजार रुपये देत आहे. या योजनेअंतर्गत वर्षातल्या दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
 
पार्डी मक्ता इथंच भारत जोडो यात्रेविषयी विचारल्यावर एक जण म्हणाले, “गावागावातल्या लोकांमध्ये खूप अंतर झालंय. हे अंतर कमी करायचं आहे. लोक एकमेकांपासून तुटलेत. त्यांना जोडायचंय.
 
"भारत तुटला म्हणजे देशाचा तुकडा पडला असं वाटतंय की काय? तसं नाही हो. माणसाची मनं एकमेकांपासून बाजूला गेलीत. हे लोक एकत्र आले पाहिजेत. लोकांमधील मतभेद दूर व्हायला पाहिजे.”
 
कन्याकुमारी ते श्रीनगर
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली भारत जोडो यात्रा आजपासून विदर्भात दाखल होत आहे. या यात्रेचा आजचा 69 वा दिवस आहे.
 
आज संध्याकाळी विदर्भातील वाशिम जिल्ह्यात ही यात्रा प्रवेश करणार आहे. त्यानंतर अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांतून मध्य प्रदेशात ही यात्रा जाणार आहे.
 
येत्या 18 नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राहुल गांधींची महाराष्ट्रातील दुसरी जाहीर सभा नियोजित आहे.
 
कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही भारत जोडो यात्रा काश्मीरपर्यंत नेण्याचा राहुल गांधींचा संकल्प आहे.
 
दरदिवशी सकाळी 6 वाजता सुरू होणारी ही यात्रा दररोज जवळपास 25 किलोमीटर अंतर पार करत पुढे चालली आहे.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Amazon 10,000 कर्मचाऱ्यांना काढणार?