Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभेच्या प्रेक्षागृहातून उडी मारणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे?

लोकसभेच्या प्रेक्षागृहातून उडी मारणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे?
, बुधवार, 13 डिसेंबर 2023 (23:12 IST)
संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक केलेल्या चार जणांची भारताच्या सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे.
 
यातील दोघांनी बुधवारी शून्य प्रहरात प्रेक्षागृहातून खाली उडी मारली होती. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या दिवशीच ही घटना घडली आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेक्षागृहातून उडी मारणाऱ्यांमध्ये सागर शर्मा आणि मनोरंजन अशा दोन व्यक्तींचा समावेश आहे.
 
एएनआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं की, "आम्ही या पार्श्वभूमीबद्दल माहिती गोळा करत आहोत. सागर शर्मा हा म्हैसूरचा रहिवासी आहे. तो बेंगळुरू येथील विद्यापीठातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे तर दुसरा व्यक्तीही म्हैसूरचा आहे."
 
त्यांनी सांगितलं की, अटक केलेल्या लोकांची जास्तीची माहिती घेण्यासाठी आयबी आणि स्थानिक पोलिसांचं एक पथक त्यांच्या घराकडे रवाना झालं आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "या दोघांचेही फोन जप्त करण्यात आले असून ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत का याची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडे सापडलेली कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. सध्या सगळ्याची तपासणी सुरू आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "प्रेक्षागृहात पोहोचण्यापूर्वी त्यांनी ज्या सुरक्षा चौक्या पार केल्या त्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे."
 
दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं?
दिल्ली पोलिसांनी बुधवारी संसद भवन परिसराबाहेर रंगीत धुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या नीलम आणि तिच्या साथीदाराशी संबंधित माहिती दिली आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दिल्ली पोलिसांनी परिवहन भवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या दोन आंदोलकांना ताब्यात घेतलं असून त्यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
 
पोलिसांनी सांगितलं की, हे लोक रंगीबेरंगी धूर सोडणाऱ्या नळकांड्या फोडून आंदोलन करत होते.
 
आंदोलकांचे अनेक व्हीडिओही व्हायरल झाले आहेत. हे व्हीडिओ दिल्ली पोलिसांनी त्यांना पकडण्यापूर्वीचे आहेत. या व्हीडिओंमध्ये आंदोलनकर्ती महिला 'संविधान वाचवा आणि हुकूमशाही संपवा' अशा घोषणा देताना दिसत आहे.
 
दिल्ली पोलिसांनी म्हटलंय की, "प्राथमिक तपासानुसार, नीलम आणि अमोल असे दोघेजण संसद भवन परिसरात मोबाईल फोन घेऊन गेले नव्हते.
 
त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची बॅग किंवा ओळखपत्र नव्हतं. त्या दोघांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ते स्वतः संसद परिसरात पोहोचले. कोणत्याही संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला आहे."
 
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
मनोरंजनचे वडील काय म्हणाले?
प्रेक्षागृहातून लोकसभेच्या सभागृहात उडी मारलेल्या व्यक्तीचं नाव मनोरंजन आहे.
 
बीबीसीचे सहकारी पत्रकार इम्रान कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार, मनोरंजनचे वडील देवराजू गौडा यांनी आपल्या मुलाचं कृत्य निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे.
 
देवराजू गौडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, त्यांचं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे. त्यांच्या मुलाने अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे. हसन जिल्ह्यातील गावात मनोरंजन आपली जमीन कसत होता.
 
ते म्हणाले, "संसद आपली आहे. ते संसद भवन आहे. जे काही घडलं ते निषेधास पात्र आहे. तुम्ही संसदेबाहेर आंदोलन करू शकता पण तुम्ही अशी कृती करणं योग्य नाही."
 
देवराजू गौडा म्हणाले, "आम्ही प्रताप सिंह यांच्या मतदारसंघात राहतो. मनोरंजन चांगला मुलगा आहे. आम्ही त्याला चांगलं शिक्षण आणि संस्कार दिलेत. पण आज त्याने असं का केलं हे माझ्या देखील समजण्यापलीकडे आहे."
 
"त्याने विवेकानंदांची पुस्तकं वाचली आहेत. तो समाजासाठी, वंचितांसाठी चांगलं करू इच्छित होता. आमच्या शेजाऱ्यांनाही विचारू शकता. कोणीही त्याच्याबद्दल वाईट बोलणार नाही."
 
अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनोरंजनने कोणाच्याही हाताखाली काम केलं नाही. त्याने कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालन केलं.
 
त्याचे वडील म्हणाले, तो नेहमी दिल्लीला जायचा, पण तिथे जाऊन नेमकं काय करायचा हे माहीत नाही.
 
कर्नाटक पोलिस दलातील एसीपी दर्जाचे अधिकारी मनोरंजनच्या घरी चौकशी करायला गेले होते. वडिलांनी पत्रकारांना मनोरंजनची पुस्तकेही दाखवली.
 
संसदेबाहेर अटक करण्यात आलेल्या नीलमची आई काय म्हणाली?
बुधवारी भारतीय संसद भवनाबाहेर रंगीत धुराचे नळकांडे फोडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नीलमची सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.
 
तिचे कुटुंब हरियाणातील जिंद मधील आहे. नीलमच्या आईने आणि लहान भावाने सांगितलं की, नीलम दिल्लीला गेल्याची माहिती त्यांना नव्हती.
 
नीलमच्या आईने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, त्यांच्या मुलीला नोकरी न मिळाल्याने ती चिंतेत होती.
 
नीलमची आई म्हणाली, "बेरोजगारीमुळे खूप अस्वस्थ होती. मी तिच्याशी बोलले पण तिने मला दिल्लीबद्दल काहीच सांगितलं नाही. ती मला सांगायची की ती इतकी शिकलेली असून तिला नोकरी नाही, त्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं."
 
नीलमचा धाकटा भाऊ म्हणाला, "आम्हाला आमच्या मोठ्या भावाकडून नीलमच्या अटकेची माहिती मिळाली. त्याने आम्हाला फोन करून टीव्हीवर बातमी पाहायला सांगितलं."
 
तो म्हणाला, "ती दिल्लीला गेल्याचं आम्हाला माहीतही नव्हतं. आम्हाला फक्त एवढंच माहीत आहे की ती तिच्या अभ्यासासाठी हिस्सारला गेली होती. ती परवा घरी आली आणि काल परतली.
 
ती बीए, एमए, बीएड , एमएड, सीटीईटी, एमफिल आणि नेट उत्तीर्ण आहे. तिने अनेकदा बेरोजगारीचा मुद्दा मांडला आहे. तसेच शेतकरी आंदोलनातही भाग घेतला होता."
 
आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचं वर्णन करताना ते म्हणाले, "आम्ही दुधाचा व्यवसाय करतो आणि आमचे वडील मिठाईचा व्यवसाय करतात."
 
लातूरचा तरुण गोंधळ घालताना पकडला
लातूरचा अमोल शिंदे नावाचा तरुण संसदेबाहेर गोंधळ घालताना पकडण्यात आला आहे.
 
लातूरचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "संसदेतून ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव अमोल शिंदे आहे. तो लातूर जिल्ह्यातल्या झरी गावचा आहे.
 
"गेल्या काही वर्षांपासून तो पोलीस भरतीची तयारी करत होता. परंतू त्याला सातत्याने अपयश मिळत होतं, अशी प्राथमिक माहिती तूर्तास पोलिसांनी दिली आहे.
 
"या तरुणाच्या आई-वडिलांना तो कुठे आहे माहिती नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे."
 
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधिक्षकांना खोलवर तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
 
तसंच संबंधित तरुण कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं सध्यातरी प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
 
दरम्यान झरी गावात लातूर पोलिसांची अनेक पथकं दाखल झाली आहेत. दहशतवाद विरोधी पथक, एलसीबी आणि चाकूर पोलीस ठाण्याची पथकं या गावामध्ये दाखल झाली आहेत.
 
पोलिसांकडून अमोल शिंदेंच्या घराची तपासणी करण्यात आली. तसंच घरातील सदस्यांची माहिती घेण्यात आली.
 
Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mohhamd Shami : मोहम्मद शमीला मिळणार अर्जुन पुरस्कार!