Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जी-20 चे शेरपा अमिताभ कांत कोण आहेत? त्यांचं आणि त्यांच्या टीमचं एवढं कौतुक का होतंय?

amitabh kant with his team
, सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (21:53 IST)
नवी दिल्लीत पार पडलेली जी-20 परिषद ही राजकीय आणि राजनैतिक पातळीवर एक मोठं यश समजलं जात आहे.परिषदेच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत होतं की युक्रेन युद्धासारख्या जटील प्रश्नांमुळे सर्व देशांमध्ये सहमती होणं कठीण आहे.
 
मात्र परिषदेच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली जाहीरनामा घोषित केला. त्यात युक्रेन युद्धाचाही समावेश करण्यात आला होता आणि सर्व देशांनी त्याला सहमती दर्शवली.
 
भारतीय राजनैतिकतेच्या यशाचे खरे सूत्रधार अमिताभ कांत असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
परिषद पार पडल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर ते लिहितात, “संपूर्ण जी-20 परिषदेत युक्रेन युद्धाबाबत सर्वसहमती होणं हे अतिशय जिकिरीचं काम होतं. 200 तास चर्चा, 300 द्विपक्षीय बैठका आणि 15 मसुद्यानंतर हे शक्य झालं. त्यात नागराज नायडू काकानूर आणि ईनम गंभीर या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी माझी मदत केली आहे.”
 
युक्रेन युद्ध हा एक जटिल मुद्दा आहे. त्यावर जगभरात मतमतांतरं आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यासकट पाश्चिमात्य देश खुलेपणाने युक्रेनचं समर्थन करत आहे. तर रशिया, चीन आणि त्यांचे काही समर्थक देश एका बाजूला आहेत. भारतने सध्या या मुद्द्यावर तटस्थ भूमिका घेतली आहे.
 
गेल्या वर्षी बाली येथे झालेल्या जी-20 जाहीरनाम्यात युक्रेन युद्धाच्या मुद्दयावरून रशियावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे रशिया आणि चीन हे देश नाराज झाले होते.
 
अशा परिस्थितीत या मुद्द्यावर सर्वसहमती होणं आणि आर्थिक फोरमच्या अजेंड्यावर युक्रेन युद्धाचा मुद्दा वरचढ न होऊ देणं हे एक मोठं आव्हान होतं.
 
जी-20 मध्ये भारताचे शेरपा अमिताभ कांत आणि त्यांच्या टीमने या जटिल मुद्द्यावर असा तोडगा काढला की सर्व देश यावर खुश आहेत. परिषदेच्या जाहीरनाम्यात रशियाचं नाव नाही मात्र युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या मानवी संकटाचा उल्लेख आहे.
 
या जाहीरनाम्याचं श्रेय पंतप्रधानांनी अमिताभ कांत यांच्या टीमला दिलं आहे. ते म्हणाले, “आमच्या टीमच्या प्रयत्नामुळे नवी दिल्लीत झालेल्या जी-20 परिषदेत सर्वसहमती झाली. ”
 
“मी आमचे शेरपा आणि मंत्र्यांच अभिनंदन करतो, त्यांनी अतिशय मेहनत घेऊन हे काम तडीस नेलं,” असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
 
त्याचवेळी रविवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत अमिताभ कांत म्हणाले, “जेव्हा आमच्याकडे अध्यक्षपद आलं तेव्हाच पंतप्रधान मोदी म्हणाले होते की भारताचं अध्यक्षपद समावेशक, निर्णायक, आणि कामावर आधारित असायला हवं. नवी दिल्ली जाहीरनाम्यात 81 परिच्छेद आहेत. सर्व परिच्छेदांवर सर्व देशांची 100 टक्के सहमती आहे.”
 
फक्त पंतप्रधानच नाही तर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सुद्धा शेरपा अमिताभ कांत यांची स्तुती केली आहे.
 
शशी थरूर त्यांच्या एक पोस्टमध्ये म्हणतात, “शाब्बास अमिताभ कांत, तुम्ही IAS निवडलंत तेव्हा IFS ने एक उत्कृष्ट अधिकारी गमावला असं वाटतंय. रशिया आणि चीन यांच्याबरोबरची चर्चा काल रात्री पूर्ण झाली."
 
थरूर म्हणाले, “सर्वांच्या सहमतीने दिल्ली जाहीरनामा घोषित झाला. जी-20 मध्ये भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.”
 
अमिताभ कांत कोण आहेत?
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जन्माला आलेले अमिताभ कांत 1980 च्या तुकडीतले आयएएस अधिकारी आहेत.
 
ते केरळच्या कोळिकोडचे जिल्हाधिकारी होते. त्याशिवाय केरळच्या पर्यटन विभागाचे सचिव होते.
 
भारत सरकारच्या पर्यटन विभागाचेही ते संयुक्त सचिव होते.
 
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) चे ते भारतातील ग्रामीण भागातील नॅशनल प्रोजेक्ट डायरेक्टर होते.
 
जून 2022 पर्यंत ते नीति आयोगाचे अध्यक्ष होते. सहा वर्षं नीति आयोगाचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर त्यांना जी -20 मध्ये भारताचे शेरपा म्हणून नियुक्त करण्यात आलं.
 
भारत सरकारच्या स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, आणि इनक्रेडिबल इंडिया या योजनांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
अमिताभ कांत यांनी ब्रँडिग इंडिया- इनक्रेडिबल स्टोरी, मेड इन इंडिया याबरोबरच अनेक पुस्तकं लिहिली आहेत. या पुस्तकांमुळेच ते चर्चेत आले होते.
 
भारताला जी 20 चं अध्यक्षपद मिळाल्यानंतर ते भारताचे शेरपा म्हणून नियुक्त झाले. त्याआधी पियुष गोयल यांनी हे पद भूषवलं होतं.
 
जी-20 मध्ये शेरपाची भूमिका सगळ्यांत महत्त्वाची असते. त्यांचं सगळ्यांत महत्त्वाचं काम हे सदस्य देशांमध्ये समन्वय निर्माण करणं आणि चर्चा करण्याचं असतं.
 
शेरपा सदस्य देशांबरोबर बैठका घेतात. जी-20 च्या कामाची माहिती देतात आणि आर्थिक तसंच राजकीय मुद्द्यावर सहमती तयार करण्याचं काम ते करतात.
 
अमिताभ कांत यांची टीम
जी-20 परिषदेचं यशस्वी आयोजन आणि नवी दिल्ली जाहीरनाम्याचं श्रेय अमिताभ कांत आणि त्यांच्या टीमला दिलं जात आहे. भारतीय प्रसारमाध्यमात या चार अधिकाऱ्यांची विशेष चर्चा होत आहे.
 
नागराज नायडू काकानूर
 
1998 च्या तुकडीतले IFS अधिकारी नागराज नायडू काकानूर भारताच्या जी-20 मध्ये संयुक्त सचिव आहेत.
 
चार वेळा चीनमध्ये पोस्टिंग झालेलेल काकनूर अस्खलित चिनी भाषा बोलतात. त्याशिवाय त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्येही काम केलं आहे.
 
काकानूर यांच्याकडे अमेरिकेतील फ्लेचर इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमसीची कायदा आणि राजनैतिक विज्ञानाची मास्टर्स डिग्री आहे.
 
जी-20 मध्ये ते भारताकडून भ्रष्टाचार नियंत्रण, संस्कृती, विकास, डिजिटल इकॉनॉमी, शिक्षण आणि पर्यटन या गटाचे सदस्य होते.
 
ईनम गंभीर
 
भारतीय विदेश सेवेतील 2005 च्या तुकडीतील अधिकारी ईनम गंभीर यांचं स्पॅनिश भाषेवर प्रभुत्व आहे. त्या भारताच्या जी-20 सचिवालयात संयुक्त सचिव आहेत.
 
ईनम यांनी भारताकडून अनेक देशात काम केलं आहे. त्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणशी निगडीत मुद्दयांच्या तज्ज्ञ आहेत.
 
त्यांच्याकडे इंटरनॅशनल सिक्युरिटी आणि गणितात मास्टर्स डिग्री आहे. ईनम गंभीर यांनी इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश भाषांमध्ये कविता केल्या आहेत.
 
आशीष कुमार सिन्हा
 
जी-20 सचिवालयात असलेले संयुक्त सचिव आशिष कुमार सिन्हा 2005 च्या तुकडीचे IFS अधिकारी आहेत. ते नैरोबीतल्या भारतीय दुतावासात कार्यरत होते.
 
सिन्हा संयुक्त राष्ट्रांच्या भारताच्या स्थायी मिशनमध्ये तैनात होते. पाकिस्तानच्या मुद्दयावर ते तज्ज्ञ आहेत. ते स्पॅनिश भाषाही बोलतात. ते भारताच्या शेरपा टीमचे महत्त्वाचे सदस्य आहेत.
 
अभय ठाकूर
 
1992 च्या बॅचचे IFS अधिकारी अभय ठाकूर जी-20 सचिवालयात अमिताभ कांत यांचे अतिरिक्त सचिव आहेत. मूळचे इंजिनिअर असलेले आणि मग अधिकारी झालेले अभय ठाकूर अमिताभ कांत यांच्या टीममध्ये प्रत्येक चर्चेचा एक महत्त्वाचा चेहरा होते.
 
ते मॉस्को, लंडन, हो ची मिन सिटी शहरात भारतीय दुतावासात तैनात होते. ते नायजेरिया आणि मॉरिशसमध्ये भारताचे उच्चायुक्त राहिले आहेत.
 
शेरपा शब्द कुठून आला?
जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च संघटना जी-20 मध्ये सर्व देश त्यांच्या तर्फे एक शेरपा नियुक्त करतात. त्यांचं काम संघटनेच्या बैठका आणि चर्चामध्ये भाग घेण्याचं असतं.
 
हे शेरपा जी-20 मध्ये त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. शेरपा परिषदेत त्यांच्या देशातील नेत्यांची मदत करतात. तसंच जी-20 मध्ये त्यांच्या देशाचा अजेंडा पुढे नेतात.
 
इतर देशांना आपल्या देशाचं धोरण सांगणं हे शेरपाचं महत्त्वाचं काम असतं.
 
हा शब्द नेपाळ आणि तिबेट मध्ये राहणाऱ्या एका समुदायातून हा शब्द आला आहे.
 
शेरपा समुदायाचे लोक त्यांचा चिवटपणा आणि कठीण परिस्थितीत धाडस दाखवण्याच्या वृत्तीबद्दल ओळखले जातात.
 
शेरपा डोंगर चढण्याच्या त्यांच्या कौशल्याबद्दल आणि माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्यांची मदत करण्यासाठीही ओळखले जातात.
 
शेरपा गिर्यारोहकांना शिखरावर पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.
 







Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यासाठीच संसदेचा विशेष अधिवेशनाचा अजेंडा: नाना पटोले