शेअर मार्केटमधील सर्वांत मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज (14 ऑगस्ट) निधन झालं. ते 62 वर्षांचे होते. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांच्या 'आकासा एअर'ची सुरूवात झाली होती.
2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या स्थापनेनंतरची ही पहिली नवीन एअरलाईन आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचा फोटो काही दिवासांपूर्वी व्हायरल झाला होता. मीडिया आणि सोशल मीडियात या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. त्या बैठकीनंतरच 'आकासा'ला सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाल्याची बातमीही आली होती.
400 कर्मचाऱ्यांसह सुरू होणाऱ्या या कंपनीत मार्चपर्यंत दर महिन्याला 200 कर्मचाऱ्यांसह दोन हजार इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कंपनीची तयारी आहे. मार्चपर्यंत कंपनीकडे 18 विमानांचा ताफा तयार असेल, असा दावाही केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, "अनेक लोक विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना उत्तर देण्याऐवजी मला असे म्हणायचे आहे की मी अपयशासाठी तयार आहे. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करून अयशस्वी होणं कधीही चांगलं."
कमी वयात करिअरची सुरुवात
5 जुलै 1960 ला जन्मलेले झुनझुनवाला मुंबईत लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यांचे वडील प्राप्तिकर खात्यात अधिकारी होते. किशोर वयातच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडं त्यांचा ओढा वाढला. दिवसभराच्या बातम्यांचा शेअर बाजारावर नेमका कसा परिणाम होतो, याकडं लक्ष ठेवण्याचा सल्ला त्यांचे वडील त्यांना द्यायचे, असं सांगितलं जातं.
झुनझुनवाला यांचा शेयर बाजाराविषयीचा ओढा अधिकच वाढत गेला. सिडनहॅम कॉलेजमध्ये शिकत असतानाच, झुनझुनवाला यांनी 1985 पासून शेअर बाजारात पैसा गुंतवण्यास सुरुवात केली होती.
चार्टर्ड अकाउंटंसीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार बोलून दाखवला. त्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्याकडून किंवा मित्रांकडून पैसे मागयचे नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं. शेअर बाजाराच्या व्यवसायात यश आलं नाही, तर त्यांना चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनही करिअर करता येऊ शकतं, असंही सांगितंल.
राकेश झुनझुनवाला यांनी अवघ्या 5,000 रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली, असं सांगितलं जातं. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती आज 6 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 45,328 कोटी रुपयांची आहे.
फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांची सर्वाधिक किंमत असलेली गुंतवणूक ही घड्याळं आणि दागिने तयार करणारी कंपनी टाटा समुहाच्या टायटन कंपनीमध्ये आहे. तसंच स्टार हेल्थ इन्श्युरन्स, मेट्रो ब्रँड्स आणि कॉनकॉर्ड बायोटेक सारख्या कपन्यांमध्येही झुनझुनवाला यांची गुंतवणूक आहे.
1986 मध्ये झुनझुनवाला यांनी एका कंपनीचे 5,000 शेअर खरेदी केले. त्यांनी हे शेअर प्रत्येकी 43 रुपयांनी खरेदी केले होते. पण तीन महिन्यांत या शेअरचं मूल्य वाढून 143 रुपये झालं होतं. एवढ्या कमी काळात तीनपटीपेक्षा अधिक परतावा मिळाल्यानं झुनझुनवाला यांच्यासाठी हा अनुभव यशाची पहिली पायरी चढण्यासारखा होता.
भारताचे वॉरेन बफे?
वॉरेन बफे यांना जगातील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हटलं जातं. फोर्ब्सच्या माहितीनुसार, सध्या बफे यांची एकूण संपत्ती 102 अब्ज डॉलर किंवा जवळपास 7,69,903 कोटी रुपये आहे.
बफे यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी शेअर खरेदी केली होती आणि 13 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा कर भरला होता, असं त्यांच्याबाबत सांगितलं जातं.
त्यामुळं झुनझुनवाला यांना नेहमी भारताचे वॉरेन बफे म्हटलं जातं. मात्र झुनझुनवाला यांना ही तुलना फारशी आवडत नाही.
ही तुलना योग्य नाही. संपत्ती असो, यश असो वा परिपक्वता सर्वच बाबतीत बफे माझ्यापेक्षा खूप पुढं आहेत, असं मत झुनझुनवाला यांनी 2012 मध्ये 'रॉयटर्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं.
"मी कुणाचाही क्लोन नाही. मी राकेश झुनझुनवाला आहे. मी माझ्या अटींवर जीवन जगलो आहे. मला जे आवडतं, तेच मी करतो. मी जे करतो, त्याचा आनंद घेतो," असं त्यांनी त्याच मुलाखतीत म्हटलं होतं.
वादांमध्येही अडकले होते झुनझुनवाला
झुनझुनवाला अनेकदा शेअर बाजाराशी संबंधित वादांमध्येही अडकले होते.
याचवर्षी जुलै महिन्यात झुनझुनवाला, त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला आणि इतर आठ व्यक्तींनी अॅप्टेक लिमिटेडच्या शेअरमध्ये इनसायडर ट्रेडिंगशी संबंधित एका प्रकरणात 37 कोटींपेक्षा अधिकचा मोबदला दिला होता. या रकमेमध्ये सेटलमेंट शुल्क, चुकीच्या पद्धतीनं मिळवलेल्या नफ्याचा मोबदला आणि व्याजाचं शुल्क याचाही समावेश होता.
इनसाइडर ट्रेडिंग, ही व्यवसायाची अशी पद्धत आहे, ज्यात गोपनीय माहितीच्या आधारे, स्वतःच्या फायद्यासाठी शेअर बाजारात व्यवहार केला जातो.
मात्र सेबीच्या रडारवर येण्याची झुनझुनवाला यांची ही पहिलीच वेळ नव्हती. सेबीनं 2018 मध्ये त्यांची दुसऱ्या एका कंपनीतील संशयास्पद अंतर्गत व्यवसायाबाबत चौकशी केली होती. झुनझुनवाला यांनी नंतर 2.48 लाख रुपये देऊन, 'सहमती'नं हे प्रकरण सोडवलं होतं.
'सहमती' या प्रक्रियेद्वारे गुन्ह्याचा स्वीकार न करता किंवा आरोप न फेटाळता सेबीला शुल्क देऊन संबंधित नियम उल्लंघन प्रकरणी तोडगा काढता येऊ शकतो.
म्हणजे, इनसाइडर ट्रेडिंगच्या वादांमध्ये झुनझुनवाला यांचं नाव येणं, हा प्रकार त्यांची प्रतिमा डागाळणारा आहे, असं म्हणता येऊ शकतं का?
"हा प्रकार अर्ध्या भरलेल्या आणि अर्ध्या रिकामच्या ग्लास सारखा आहे. दंड देणारा असं म्हणतो की, खटला लढवण्यात पैसा आणि वेळ खर्च होऊन इतर व्यवसांवर परिणाम होतो. त्यामुळं त्यापासून वाचण्यासाठी दंड भरत असल्याचं ते सांगतात. तर दुसऱ्या बाजुनं असं म्हटलं जातं की, दंड भरला म्हणजे या प्रकरणात त्यांना घाबरण्यासारखं, असं नक्कीच काहीतरी असू शकतं," असं ज्येष्ठ शोध पत्रकार आलम श्रीनिवास म्हणाले.
'इनसाइडर ट्रेडिंगची बहुतांश प्रकरणं एवढी गुंतागुंतीची असतात की, यात एखाद्याला दोषी किंवा निर्दोष ठरवणं अत्यंत कठीण असतं. इनसाइडर ट्रेडिंग झाल्याचं सिद्ध करणं, हेही अत्यंत कठीण असतं," असं ते म्हणाले.
'परिसासारखं व्यक्तिमत्त्व'
राकेश झुनझुनवाला हे एखाद्या परिसासारखे असल्याचं म्हटलं जायचं. म्हणजे ते स्पर्श करतील ती वस्तू सोनं बनते.
शेअर बाजारात मिळालेल्या यशानं जणू त्यांना एखाद्या सेलिब्रिटीचा दर्जा मिळाला होता. जवळपास सर्वच माध्यमांमध्ये झुनझुनवाला यांच्या मुलाखती झळकल्या.
राकेश झुनझुनवाला यांनी, 'इंग्लिश-विंग्लिश', 'की अँड का' आणि 'शमिताभ' अशा हिंदी चित्रपटांची निर्मितीही केली होती.
झी मीडियामध्ये सुरू असलेल्या एका वादामुळं झुनझुनवाला यांनी काही दिवसांपूर्वीच झीचे शेअर खरेदी करून त्यातून जवळपास 50 टक्के नफा कमावला.
"शेअर बाजार हा मानसशास्त्रावर जेवढा अवलंबून आहे, तेवढाच वास्तविकतेवरही आहे. शेअर बाजाराशी जुळवून घ्यायला जमणार नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. शेअर बाजारात कोणीही राजा नाही, शेअर बाजार स्वतःच राजा आहे. इथं राजा बनण्याचा प्रयत्न करणारे सगळे तुरुंगात गेले आहेत," असं झुनझुनवाला यांनी 2017 मध्ये 'ईटी नाऊ' या वाहिनीवर अभिनेत्री आलिया भट्टबरोबर बोलताना म्हटलं होतं.
झुनझुनवाला त्यांच्या रेअर इंटरप्राइझेस या कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय करतात. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावाच्या आद्याक्षरांपासून 'रेअर' नाव तयार करण्यात आलं आहे.
'पडद्यामागे पण प्रभावी'
पत्रकार आलम श्रीनिवास यांच्या मते, राकेश झुनझुनवाला एक हुशार आणि समजदार गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या गुंतवणुकीच्या पद्धतीवरून याबाबत अंदाज येतो. त्यांच्या मते झुनझुनवाला कॉर्पोरेट, आर्थिक आणि शेअर मार्केटच्या जगात अत्यंत प्रभावी आहेत.
"कोणत्याही कंपनीत 5 ते 15 टक्के भागीदारी खरेदी करून ते एवढे महत्त्वाचे समभागधारक बनतात की, त्यांनी काहीही म्हटलं तरी कंपनी व्यवस्थापनाला ऐकावं लागतं. त्यामुळं पडद्यामागं असले तरी, ते अत्यंत शक्तीशाली आहेत," असं श्रीनिवास म्हणतात.
त्यांच्या मते, झुनझुनवाला कॉरपोरेट आणि आर्थिक जगाशी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जोडले गेलेले आहेत. त्यामुळं राजकीय गटांमध्येही त्यांचे चांगले संबंध आहेत.
"शेअर बाजारात त्यांच्या नावानं शेअरचे भाव खाली-वर होत असतात. झुनझुनवाला शेअर खरेदी करत असल्याची अफवा पसरली तरी शेअरचे भाव वधारतात, तर शेअर विकत असल्याची अफवा पसरल्यास शेअरचे दर खाली येऊ लागतात. मात्र, राकेश झुनझुनवाला फार विक्री करत नाहीत, ते प्रामुख्यानं खरेदीदारच आहेत," असं श्रीनिवास सांगतात.