तीन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात संशयास्पद ड्रोन हल्ल्याचं लक्ष्य ठरलेलं एमव्ही केम प्लूटो हे जहाज 25 डिसेंबरला मुंबईत पोहोचलं तेव्हा भारतीय नौदलाच्या बॉम्ब नाशक पथकानं त्याची प्राथमिक तपासणी केली.
या जहाजावर लायबेरियाचा ध्वज फडकत होता. या जहाजावरील क्रू मेंबरमध्ये 21 भारतीय आणि एका व्हिएतनामी व्यक्तीचा समावेश होता.
हल्ला झालेला जहाजाचा भाग आणि तिथे पडलेले अवशेष पाहिल्यानंतर कदाचित हा ड्रोन हल्ला असावा असं वाटतं. तरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सौदी अरेबियातून मंगळुरुला येणाऱ्या या जहाजावर शनिवारी ( 23 डिसेंबर) अरबी समुद्रात हल्ला झाला.
दरम्यान, व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर भारतीय नौदलानं अरबी समुद्रातील वेगवेगळ्या भागात आयएनएस मोर्मुगाओ, आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता नावाच्या क्षेपणास्त्र विनाशिका तैनात केल्या आहेत.
यापूर्वी आफ्रिकन देश गॅबॉनचा झेंडा असलेल्या जहाजावर हल्ला झाला होता. ते खनिज तेलानं भरलेलं होतं.
एम. साईबाबा नावाचं हे जहाज भारताच्या दिशेनं येत होतं आणि त्यात 25 क्रू मेंबर होते. ते सर्व भारतीय होते.
रविवारी ( 24 डिसेंबर) या जहाजावर ड्रोनने हल्ला करण्यात आला. यापूर्वी नॉर्वेचा झेंडा असलेल्या जहाजावर हल्ला झाला होता.
रविवारी ज्या गॅबॉनच्या जहाजावर हल्ला झाला या बाबत आधी अशी बातमी आली होती की भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर हल्ला झाला आहे.
भारतीय जहाजावर हल्ला झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता. पण नंतर भारतीय नौदलानं ते गॅबॉनचे जहाज असल्याचं सांगितलं.
अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडनं सांगितलं की, 'गॅबॉनच्या जहाजावर रविवारी हुती बंडखोरांनी हल्ला केला. शनिवारी ( 23 डिसेंबर) 'एमव्ही केम प्लूटो'वर इराणमधून ड्रोनने हल्ला झाला. मात्र भारताकडे येणाऱ्या जहाजावर आपल्या हद्दीतून हल्ला झाला नसल्याचं इराणनं म्हटलं होतं.
भारताची प्रतिक्रिया
भारतात येणाऱ्या जहाजांवर हल्ले अशा वेळी होत आहेत, जेव्हा तांबड्या समुद्रात येमेनच्या हुती बंडखोरांकडून यूएव्ही आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर इस्रायलच्या दिशेने जाणाऱ्या जहाजांवर हे हल्ले होत आहेत.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने ट्विट करून या हल्ल्यांच्या गांभीर्याकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले की अशा हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
7 ऑक्टोबर रोजी हमासचा इस्रायलवर हल्ला आणि त्यानंतर प्रत्युत्तराची कारवाई झाल्यानंतर हे हल्ले सुरू झाले.
सर्व प्रथम 21 नोव्हेंबर रोजी इस्रायली मालवाहू जहाज गॅलेक्सी लीडरवर हल्ला झाला. हे जहाजही तुर्कीतून भारताच्या दिशेनं येत होतं.
इराणचे मित्र असलेल्या हुती बंडखोरांनी जहाजावरील 25 जणांचं अपहरण केलं होतं.
त्यावेळी मुख्य मध्यस्थ आणि हुती बंडखोरांचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल सलाम यांनी म्हटलं होतं की, 'शत्रूंच्या सर्व जहाजांचे भवितव्य एकसारखंच असेल.'
यापूर्वी हुती बंडखोरांच्या प्रवक्त्यानं त्या देशांना इस्रायली जहाजांमधून त्यांचे नागरिक परत बोलवावेत असं सांगितलं होतं. हमासला पाठिंबा देणारा इराण हा हुती बंडखोरांना ड्रोन, बॅलेस्टिक आणि क्रूझ मिसाईल चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचं बोललं जात आहे.
25 नोव्हेंबर रोजी गॅलेक्सी लीडर या मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर 3 डिसेंबरपर्यंत दोन इस्रायली जहाजांवर आणि आणखी एका व्यावसायिक जहाजावर हल्ला करण्यात आला आणि आता गेल्या दोन-तीन दिवसांत भारतात येणाऱ्या दोन जहाजांवर हल्ले झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
आपल्या सागरी सीमेमध्ये उडणाऱ्या लायबेरिया आणि गॅबॉनच्या ध्वज असलेल्या विमानांवर झालेल्या हल्ल्यांनंतर अरबी समुद्राच्या विविध भागात भारत सरकारने आयएनएस मोर्मुगाओ, आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता नावाच्या 'गाईडेड' क्षेपणास्त्र विनाशिका तैनात केल्या.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "भारताच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्यानं काही शक्तींना हेवा वाटू लागला आहे.
"अरबी समुद्रात एमव्ही केम प्लुटोवर नुकताच झालेला ड्रोन हल्ला आणि काही दिवसांपूर्वी तांबड्या समुद्रात एमव्ही साईबाबा जहाजावर झालेला हल्ला भारत सरकारनं अतिशय गांभीर्यानं घेतला आहे. हा हल्ला कोणी केला असेल त्याला समुद्राच्या तळातूनही शोधून शिक्षा केली जाईल," असे राजनाथ सिंह यांनी सांगितले होते.
तांबड्या समुद्राचं महत्त्व
नाव न सांगण्याच्या अटीवर भारतीय नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसी हिंदीला सांगितलं की, "हमास आणि इस्रायलमधील संघर्ष आता अरबी समुद्राकडे येत असल्याचं दिसत आहे. अशी युद्ध आघाडी उघडल्यानं भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो."
"असं म्हणू शकतो की याचा भारतावर परिणाम होऊ लागला आहे. यामुळेच भारताने क्षेपणास्त्र नष्ट करणारी जहाजं तैनात केली आहेत. भारतातील बहुतांश आयात-निर्यात मुंबई, कोची, मंगळुरू, गोवा आणि चेन्नईमधून केली जाते. त्यामुळे ही परिस्थिती भारतासाठी चिंताजनक आहे," त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
भारताचा 80 टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो. याशिवाय त्यांचं 90 टक्के इंधन सागरी मार्गाने येतं.
अशा परिस्थितीत सागरी मार्गाने झालेला कोणताही हल्ला भारताच्या व्यापार आणि पुरवठा साखळीला थेट धोका ठरेल.
आज जगातील 12 टक्के जहाज वाहतूक ही तांबड्या समुद्र आणि सुएझ कालव्यातून होते.
तांबड्या समुद्राचा जाण्याचा मार्ग एडनच्या आखातातून जातो आणि एडनच्या आखाताचा मार्ग अरबी महासागरातून खुला होतो. सुएझ कालव्याचा मार्ग भूमध्य समुद्रातून जातो.
भूमध्य समुद्र आणि त्याच्या मागे संपूर्ण युरोप आणि त्याच्या पुढे अटलांटिक समुद्र, उत्तर आणि दक्षिण अमेरिका आहे. ही व्यापारी मार्गांची संपूर्ण मालिका आहे. यातील कोणतीही समस्या संपूर्ण जागतिक व्यापाराला हानी पोहोचवू शकते.
या हल्ल्यांचा भारतावर काय परिणाम?
भारत आणि या मार्गावर आयात-निर्यात ही जास्तकरुन मुंबई, कोची, मंगळुरू, गोवा आणि चेन्नईमार्गे केली जाते. त्यानंतर सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम यांसारखे आग्नेय आशियातील देश आणि चीन, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलियाला जाणारी सर्व जहाजं अरबी समुद्रातून ये-जा करतात.
प्रथम, जहाजं हे हिंद महासागरात आणि नंतर अरबी महासागरात येतात. अरबी महासागरातून ते एडनचे आखात, तांबडा समुद्र आणि नंतर सुएझ कालवा आणि भूमध्य समुद्रात जातं आणि तेथून युरोपात आणि नंतर जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून अटलांटिक समुद्रात आणि नंतर अमेरिकेत जातं.
यात काही अडचण आल्यास संपूर्ण मार्ग बदलण्यात येईल. यानंतर संपूर्ण माल हा केप ऑफ गुड होप येथून आणावा लागेल. यामुळे संपूर्ण व्यापारी मार्गाची लांबी 40 टक्क्यांनी वाढेल.
साहजिकच आता जास्त अंतरासाठी अधिक इंधन खर्च करावा लागेल आणि व्यावसायिक खर्च वाढेल. भारतासाठी हा मोठा आर्थिक दबाव असेल.
भारतावर दबाव आणण्यासाठी हे हल्ले केले जात आहेत का?
यापूर्वी इस्रायल किंवा त्यांच्या व्यवसायिक किंवा मित्र देशांच्या व्यापारी जहाजांवर हल्ले होत होते आणि आता भारतात येणाऱ्या जहाजांवर हल्ले होत आहेत.
अखेर भारताच्या दिशेने येणाऱ्या जहाजांवर हल्ले का होत आहेत. इस्रायलचे हल्ले थांबवण्यासाठी हमासवर दबाव वाढवण्यासाठी हे केलं जात आहे का?
जोपर्यंत हमासवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील, असं हुती बंडखोरांचं म्हणणं आहे.
भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने सांगितलं की, "अशा युद्धाच्या आघाड्या उघडल्याने भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा भारतावर परिणाम होऊ लागला आहे असं म्हणुया. यामुळेच भारताने क्षेपणास्त्र नष्ट करणारी जहाजं तैनात केली आहेत."
हमास आणि त्याच्याशी संबंधित शक्ती ही इस्रायलवर हल्ले थांबवण्यासाठी दबाव आणत आहेत. रशिया आणि चीन आधीच इस्रायलला हल्ले करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आता भारतावर दबाव आणला जात आहे.
भारताचे हितसंबंध बिघडवण्याचा प्रयत्न केला तर, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबावं असं भारताला वाटेल.
नेतन्याहू यांच्याशी भारताचे चांगले संबंध आहेत आणि ते या दिशेने पुढाकार घेऊ शकतात. त्यामुळे भारतावर दबावाची ही रणनीती आखली जात आहे.
भारतीय क्षेपणास्त्रं विनाशिका किती शक्तीशाली आहेत?
आयएनएस मोर्मुगाओ युद्धनौकेचं बांधकाम सप्टेंबर 2016 मध्ये सुरू झाले आणि 19 डिसेंबर 2021 रोजी समुद्रात याच्या चाचण्या झाल्या.
ही युद्धनौका अत्याधुनिक सेन्सर्सने सुसज्ज आहे जी शत्रूच्या हल्लाचा अंदाज घेऊ शकते आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज जगातील सर्वांत आधुनिक क्षेपणास्त्रवाहक आहे. ही युद्धनौका जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मध्यम श्रेणीच्या क्षेपणास्त्रांनी आणि जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज आहे.
समुद्राखालून शत्रूच्या पाणबुड्यांना लक्ष्य करण्यासाठी हे स्वदेशी बनावटीचे टोरपीडो ट्यूब लाँचर्स आणि रॉकेट लाँचर्सने सुसज्ज आहे. नौदलानुसार, ही युद्धनौका अण्वस्त्र, जैविक आणि रासायनिक युद्ध परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार आहे.
ही युद्धनौका आधुनिक देखरेख रडार प्रणालीसह सुसज्ज आहे, जी शत्रूच्या हल्ल्यांचं अचूक आकलन करण्यास सक्षम आहे.
आयएनएस कोची 7500 टन वजनासह 30 नॉट्सच्या वेगानं जाऊ शकते. ती 16 सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.
याशिवाय 76- एमएम सुपर रॅपिड गन आणि एके- 630 यांचाही त्यात समावेश आहे. सी किंग आणि चेतक अशी दोन हेलिकॉप्टरही त्यावर ठेवता येतील.
आयएनएस कोलकाता 164 मीटर लांब आणि 18 मीटर रुंद आहे. त्याची उंची पाच मजली इमारती एवढी आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेमध्ये प्रथमच थ्रीडी रडारचा वापर करण्यात आला आहे.
यात ब्रह्मोस क्षेपणास्त्र, 76 मिमी गन, दोन रॉकेट लाँचर, अँटी-सर्फेस गन, अँटी-सबमरीन रॉकेट लाँचरने सुसज्ज आहे. सबमरीन डिटेक्टर आणि चार टोरपीडो देखील आहेत.
हुती बंडखोर कोण आहेत आणि त्यांचा उद्देश काय आहे?
हुती हा येमेनमधील अल्पसंख्याक शिया 'झैदी' समुदायाचा सशस्त्र गट आहे.
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी या समुदायानं 1990 च्या दशकात या गटाची स्थापना केली होती.
त्याचं नाव त्याच्या मोहिमेचे संस्थापक हुसेन अल- हुती यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. ते स्वतःला 'अन्सार अल्लाह' म्हणजेच देवाचे साथीदार देखील म्हणतात.
2003 च्या अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराकवरील आक्रमणा दरम्यान हुथी बंडखोरांनी असा नारा दिला होता की, " ईश्वर महान आहे, अमेरिका संपली पाहिजे, इस्रायल संपलं पाहिजे, ज्यूंचा नाश होवो आणि इस्लामचा विजय होवो."
हमास आणि हिजबुल्लाह यांच्या सोबत राहून इस्रायल, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांविरुद्ध इराणच्या नेतृत्वाखालील प्रतिकार करणाऱ्या आघाडीचा भाग म्हणून त्यांनी स्वतःचं वर्णन केलं.
युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीसचे तज्ज्ञ हिशाम अल-ओमेसी म्हणतात की, हुती हे आखातातून इस्रायलकडे जाणाऱ्या जहाजांना का लक्ष्य करत आहेत हे यावरून स्पष्ट होऊ शकतं.
ते सांगतात की, "खरं तर ते आता वसाहतवाद्यांशी लढत आहेत. ते इस्लामिक राज्यांच्या शत्रूंशी लढत आहेत. ही कल्पना त्यांच्या उद्देशाशी चांगली जुळते."
हुती बंडखोरांना कोण मदत करत आहे?
हुती बंडखोर लेबनॉनच्या सशस्त्र शिया गट हिजबुल्लाह यांना आपला आदर्श मानतात.
अमेरिकेच्या संशोधन संस्थेच्या 'कॉम्बेटिंग टेररिझम सेंटर'नुसार, हिजबुल्लाह 2014 पासून त्यांना मोठ्या प्रमाणावर लष्करी कौशल्य आणि प्रशिक्षण देत आहे.
हुती स्वतःला इराणचे मित्र म्हणतात कारण त्यांचा समान शत्रू सौदी अरेबिया आहे.
हुती बंडखोरांना इराण शस्त्र पुरवत असल्याचा संशय आहे.
ताबंड्या समुद्राच्या किनारपट्टीच्या मोठ्या भागावर हुतींचं नियंत्रण आहे. येथूनच ते जहाजांना लक्ष्य करत आहेत.
युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीसचे तज्ज्ञ हिशाम अल-ओमेसी म्हणतात की, या हल्ल्यांमुळे त्यांना सौदी अरेबियासोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेत वरचढ होण्यास मदत झाली आहे.
ते सांगतात की, " ते 'बाब अल-मंदब' म्हणजे ताबड्या समुद्रातील अरुंद सागरी मार्ग बंद करू शकतात हे दाखवून त्यांनी सौदी अरेबिया कडून सवलती देण्यासाठी दबाव वाढवला आहे."
Published By- Priya Dixit