नवी दिल्ली- जम्मू काश्मीरमधील परिस्थिती केंद्र सरकारला व्यवस्थित हाताळता आलेली नाही. 44 दिवस झाले तरीही तेथे संचारबंदी कायम आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट बनत चालली असून केंद्र सरकार अजूनही बघ्याचीच भूमिका घेत असल्याची टीका करत भाजप सरकारच काश्मीरमधील परिस्थिती चिघळण्यास जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला.
काँग्रेसची काश्मीरबाबत भूमिका स्पष्ट करताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काश्मीर समस्येबाबत केंद्र सरकारचे मंत्री दररोज वेगवेगळी भूमिका मांडतात. प्रत्येकाच्या बोलण्यात विसंगती आढळून येते. केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. काश्मीरमधील परिस्थितीची काँग्रेसला चिंता आहे. यूपीए सरकारने जेव्हा-जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा-तेव्हा पुढाकार घेऊन प्रश्न प्राधान्याने मिटवले आहेत. काँग्रेसची अनेक वर्ष सत्ता होती. त्यामुळे भाजपला अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस मदत करू शकते, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला.