दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारच्या अपयशाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत, अशी टिका काँग्रेसने केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे की, मोदी सरकार विविध क्षेत्रात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात कसे अपयशी ठरले आहे. मोदीजी जेव्हा पंतप्रधान पदावरून पायउतार होतील तेव्हा भारत छिन्नविच्छिन्न व गलितगात्र झालेला असेल. पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशावर लादलेल्या खोटेपणाच्या शासनाविरुद्ध लढा देऊन देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली व सत्याच्या आविर्भावात देशभर असत्याचा प्रचार केला. परंतु सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत मोदी यांचे सर्व खोटे दावे पार उघडे पडले आहेत.
डाळींच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत व पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीत मात्र मोदी गप्प आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी मोदी जगभर फिरण्यात मग्न आहेत.