चेन्नई- पाल्कच्या सामुद्रधुनीतील नेडुनथेवू बेटाजवळ मच्छिमारी करणार्या तमिळनाडूतील पाच मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे.
उत्तर श्रीलंकेच्या भागात येत असलेल्या या बेटाजवळ तमिळनाडूतील मच्छिमार मासे पकडत होते. यावेळी श्रीलंकेच्या नौदलाने त्यांना घेरून अटक केले व त्यांची बोटही जप्त केली आहे. हे बेट तमिळनाडूतील रामेश्वरमपासून 48 कि.मी. अंतरावर आहे.
या भागात दोन्ही देशांचे मच्छिमार जात असतात. त्यांच्यावर नौदलाकडून कारवाई करण्यात येते. सागरी सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेकवेळा भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आलेली आहे. गेल्या महिन्यात 30 जूनला श्रीलंकेने सात भारतीय मच्छिमारांना पकडत त्यांच्या बोटींचे नुकसान केले होते.