Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींच्या सोनियांवरील टीकेमुळे काँग्रेसचा संसदेत गदारोळ

मोदींच्या सोनियांवरील टीकेमुळे काँग्रेसचा संसदेत गदारोळ
नवी दिल्ली , मंगळवार, 10 मे 2016 (10:58 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभांमध्ये ऑगस्टा वेस्टलँड लाचप्रकरणी सोनियांवर टीका करीत असल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने सोमवारी प्रचंड गदारोळ घातला.
 
राज्यसभेत पहिल्या दोन तासात चारवेळा कामकाज स्थगित करण्याची पाळी आली. झिरो अवर आणि प्रश्नोत्तराचा तास काँग्रेसच्या या  गदारोळात अक्षरश: वाहून गेला.
 
‘नरेंद्र मोदी माफी मांगे’, ‘फेकू मामा माफी मांगे’ अशा घोषणा देत काँग्रेस सदस्यांनी राज्यसभेत सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. प्रश्नोत्तराच्या तासातील एक प्रश्न वगळता कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
 
लोकसभेतही ऑगस्टा वेस्टलँड लाच प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी वारंवार अडथळे आणले. संरक्षणमंत्रंनी सभागृहात चर्चेला उत्तर देताना कोणाचेही नाव घेतलेले नसताना पंतप्रधान असे बेछूट आरोप कसे करतात, असा सवाल काँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. मोदी प्रचारसभांमध्ये कोणत्या न्यायालयाचा हवाला देत आहेत, असा प्रश्नही काँग्रेसचे सदस्य विचारत होते. ‘प्रधानमंत्री हाऊस में आओं’ अशा घोषणा देत काँग्रेस सदस्यांनी कामकाज रोखून धरले.
 
राज्यसभेत उपाध्यक्ष पी.जे. कुरीन यांनी प्रथम 10 मिनिटे व 12 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. दुपारी पुन्हा एकदा गदारोळ झाल्याने   कामकाज आणखी दोनवेळा स्थगित करण्यात आले. प्रश्नोत्तराचा तास झाला पाहिजे, असे वारंवार सांगत कुरीअन यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
 
लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, पंतप्रधानांच्या प्रचारसभेतील शेरेबाजीमुळे सीबीआय व ईडीवर दबाव येऊ शकतो. कोणत्या न्यायालयाने सोनियांचे नाव या प्रकरणात लाच घेणार्‍यांमध्ये जाहीर केले आहे, असा प्रश्न विचारत खर्गे म्हणाले की, या मुद्दय़ावर काँग्रेस पक्ष हक्कभंग सूचना मोदींविरुध्द मांडणार आहे. आनंद शर्मा यांनी मागणी केली की, पंतप्रधानांनी येऊन त्यांच्या विधानांना आधार असलेले पुरावे सादर करावेत.
 
पंतप्रधानांनी प्रचारसभेत कोणताही धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला नसल्याचे संसदीय व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी  स्पष्ट केले. या प्रश्नावर पंतप्रधानांना निवेदन करण्याचा आदेश देता येणार नाही असा निर्णय राज्यसभेत कुरीअन यांनी दिला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘नीट’ परीक्षेनुसारच होणार मेडिकल प्रवेश