नवी दिल्ली- परदेशात सुटीवर गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी उशिरा रात्री भारतात परतले असून ते आता आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या निवडणुकीत प्रियांका गांधी यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा म्हणून प्रयत्न सुरू असून प्रियांका आपली राजकीय ‘इनिंग’ उत्तर प्रदेशमधून सुरू करतील, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांना वाटत आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने राज्याचे प्रभारी म्हणून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याकडे प्रभारीपदाची धुरा सोपवली आहे. त्यांच्याकडूनच प्रियांका गांधी यांच्यापुढे उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय राजकारणात उतरण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर प्रियांका यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. राहुल गांधी भारतात परतले असल्यामुळे गांधी परिवारात प्रियांका यांच्याबाबत चर्चा होऊन येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.