नवरात्रौत्सवाच्या आगमनाने बाजारपेठ फुलू लागली आहे. बाजारात रंगबिरंगी पारंपरिक 'चणिया-चोळी' व 'केडियू'पासून तर अगदी विविध पॅटर्नमध्ये घागरा-ओढणी विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. फॅशनच्या भुताने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच झपाटलंय. बदलत्या काळानुसार पारंपरिक गरबा-दांडियामध्येही आधुनिकता डोकावत आहे. गरबा- दांडिया खेळताना केला जाणारा पेहराव हा देखील फॅशनेबल झाला आहे.
नवरात्रौत्सवानिमित्ताने गुजराती पद्धतीचे 'गरबा ड्रेसेस' बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पारंपरिक चणिया-चोळीला फॅशनेबल लुक देऊन त्यावर स्टोन, चमकी, काच, टिकल्या लावून त्यांची चमक-धमक वाढवी जाते.पुरुषांचे 'केडियू' देखील त्याच पद्धतीने समजविले जाताहेत.
केवळ मोठ्यांसाठीच नव्हे तर लहान मुलांच्या साइजमध्ये देखील 'चणिया-चोली' व 'केडियू' यांच्या भरपूर व्हरायटीज बाजारात उपलब्ध असतात. पारंपरिक गरबा पोशाख मुख्यत: राजकोट, अहमदाबाद, भावनगर व बडोदा येथून स्थानीय बाजारपेठेत येत असतात.
कसे असतात 'गरबा ड्रेसेस' -
महिला व पुरुषांकरता गरबा ड्रेसेस वेगववेगळे असतात. महिलांच्या ड्रेसला 'चणिया-चोली' तर पुरुषांच्या ड्रेसला 'केडियू' म्हटले जाते. लहेंगा, चोली व ओढणी असा 'चणिया-चोली'चा पूर्ण सेट असतो. त्याचप्रमाणे पुरुषांचा 'केडियू'मध्ये रेडीमेड धोतर व घेरेदार शॉर्ट कुर्ता असतो. 'केडियू' टू पीस, थ्री पीस व फोर पीस मध्ये देखील येतात. त्यात कुर्त्याच्या आत घालण्यासाठी जॅकेट, डोक्यावर वर्ख केलेली चकाकणारी गोल टोपी, कुर्त्यावर लागणारे रेडीमेड धोतर असते.
लहान मुलांसाठी खास -
लहान मुलांसाठी तर विविध व्हरायटीजमध्ये पारंपरिक गरबा ड्रेसेस बाजारात मिळतात. त्यात सुंदर 'चणिया-चोली' मुलींसाठी तर व 'केडियू' हा मुलांसाठी असतात. मुलांच्या ड्रेसेसवर मोती, घुंगरू, शंक आदींनी वर्ख करून त्यांना अधिक आकर्षक केले जातात.
गरबा ड्रेसेचे वैशिष्ट्य -
'चणिया-चोली' व 'केडियू' यांच्यावर करण्यात येणार्या वर्खमध्ये साम्य असते. त्यावर नक्षीमध्ये काच वर्ख, आरी भरत, कोढी वर्ख, ऊन भरत, निम-जरी वर्ख, टिकली-मोती वर्ख, स्टोन वर्ख आदी केलेल्या गरबा ड्रेसेसला मोठी डिमांड आहे. जोधा-अकबर या चित्रपटात ड्रेसेसवर करण्यात आलेल्या रजवाडी स्टाइलमधील 'चणिया-चोली' यंदाच्या नवरात्रौत्सवात खास आकर्षण ठरत आहेत. 'जोधा-अकबर'च्याच नावाने ग्राहक मागणी करताना दिसत आहेत.
'चणिया-चोली' व 'केडियू' हे ड्रेस मुख्यत: कॉटन कपड्यापासून तयार होतात. मात्र, आता ग्राहकांकडून होणारी मागणी लक्षात घेता अशी ड्रेसेस सिल्क मटेरियलमध्येही उपलब्ध होत आहेत. कॉटनपेक्षा या ड्रेसेसच्या किंमती अधिक असतात. कॉटनची चणिया-चोली व केडियू 300 पासून 3000 रुपयांपर्यंत तर सिल्क मटेरियलमध्ये 500 पासून 5000 रुपयांपर्यंत आहेत.
परंपरेची झलक -
'गरबा' नवशक्तिच्या आराधनेचे एक माध्यम आहे. तसेच ते आपल्या परंपरेचा वारसाही आहे. गरब्याने प्रांता-प्रांतातील संस्कृतीला जोडले आहे. पारंपरिक पेहराव गरब्याचे मुख्य आकर्षण असल्याने नवरात्रौत्सवात त्या माध्यमातून देशाच्या गौरवशाली सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे.