सर्व राक्षसांचा संहार करुन । आर्यादुर्गा देवी गुप्त होऊन । हें दृश्य सर्वांनी पाहून । आनंदले सर्व ऋषि -जन ॥१॥
उपरी सर्व देव -ऋषींनी । आर्यादुर्गेची प्रतिमा करोनी । यथाविधी मंत्रोच्चार करोनी । स्थापियली आर्याद्वीपावर ॥२॥
अकरा तीर्थे असती तेथ । नामें तयाचीं असती विख्यात । जे जे करिती स्नान तयांत । पावन होती तत्काळ ॥३॥
सर्व तीर्थात स्नान करोनि । पूजिली आर्यादुर्गा देवी सर्वांनी । मग गेले आपआपुल्या स्थानीं । निर्भयें सर्व देव -ऋषि जन आनंदुनी ॥४॥
वसुधारा तीर्थ तीर्थ गंगाधर । महिषतीर्थ आणि कालीधर । गौरीहद तीर्थ आणि कौमार । नाग तीर्थ आणि चामुंडा तीर्थ ॥५॥
वारुणा तीर्थ आणि वरुण तीर्थ । ऐशी असती तीर्थे दहा जाण । आणि असे एक तीर्थ महान । दुर्गा तीर्थ नामें मुख्य तें ॥६॥
दश तीर्थे सहस्त्र तीर्थांसमान । त्यांत शुद्धोदक दुर्गातीर्थ जाण । आणि तया तीर्थात करितां स्नान । होतील सर्वही पावन ॥७॥
जे करतील नित्य तीर्थांत स्नान । तैसेंचि दुर्गामहात्म्याचें पठण । शुद्ध अंतःकरणें करतील जाण । एक वर्षांत होइल देवी त्याला प्रसन्न ॥८॥
इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खंडे श्री आर्यादुर्गा महात्म्य
श्री जगदंबा आर्यादुर्गार्पणमस्तु
हें महात्म्य दामोदर प्रभु देसाई याने रचिलें । तें अनंत प्रभु देसाई याने यथामति परिशोधिलें । आणि तें भक्तजनांनी प्रेमें गायिलें । श्री जगदंबा श्री आर्यादुर्गा देवीचें ॥१॥
यांत काय न्युनाधिक असतां । भक्तगण नि वाचक तत्वतां । हंसक्षीर न्यायें निवडूनि घेतां । गोड मानून घेतील सकल जनता ॥२॥