Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाकाली महालक्ष्मी महासरस्वती

महाकाली महालक्ष्मी महासरस्वती
, गुरूवार, 15 ऑक्टोबर 2015 (14:50 IST)
विद्युद्दामसमप्रभां मृगपतिस्कन्धस्थितां भीषणां।
कनभि: करवालखेटविलसद्धस्ताभिरासेविताम्।
हस्तैश्चक्र गदासिखेट विशिखांश्चापं गुणं तर्जनीं।
बिभ्राणा मनलात्मिकां शशिधरां 
दुर्गा त्रिनेत्रां भजे।।
‘दुर्गा हे देवी पार्वतीचे सुंदर रूप आहे. दुर्गा म्हटलं की आपला समज जरा वेगळा म्हणजेच उग्र रूपाकडे होतो. परंतु तिचे हे एक स्वरूप आहे. स्वरूप एवढय़ासाठीच म्हणायचे की, तिने दुष्ट दैत्यांच्या संहारासाठी घेतलेले रूप. आणि संहार करण्यासाठी उग्ररूपाखेरीज पर्यायच नाही. गौरी, उमा, पार्वती, चंडी, चामुंडा, काली, कपालिनी, भवानी, विजया इत्यादी देवीच्या अनेक रूपांना पुराणकारांनी दुर्गेच्या ठायी एकरूप केले. मार्कंडेय पुराणाने तिची उत्पत्ती कशी झाली याचे वर्णन केले आहे.
 
शंकराच्या तेजाने दुर्गेचे मुख उत्पन्न झाले. यमाच्या तेजाने तिच्या मस्तकावर केस निर्माण झाले. विष्णूच्या तेजाने तिला भुजा फुटल्या.  चंद्राच्या तेजाने हिचे स्तन निर्माण झाले. इंद्राच्या तेजाने कटिप्रदेश निर्माण झाला. वरुणाच्या तेजाने जांघा आणि पिंढर्‍या तयार झाल्या. भूमीच्या तेजाने नितंबभाग निर्माण झाला. ब्रह्मच्या तेजाने पाय, सूयेतेजाने पादांगुली, वसुंच्या तेजाने करांगुली, कुबेर तेजाने नासिका, प्राजापत्यतेजाने दंत, अग्नि तेजाने तीन डोळे, सांध्यतेजाने भुवया, वायूतेजाने कान निर्माण झाले. अन्य देवतांचे तेजही हिच्यामध्ये सामावले.
 
दुर्गा सप्तशतीत तिची तीन प्रमुख रूपे म्हणजे, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशी दिली आहेत. महाकाली हे रूप तमोगुणी, महालक्ष्मी हे रजोगुणी, महासरस्वती सत्त्वगुणी मानलेले आहे. सप्तशतीच्या पहिल्या अध्यायात महाकालीचे वर्णन असून दोन ते चार या अध्यायात   महालक्ष्मीचे उदात्त चरित्र तर पाच ते तेरा यामध्ये सरस्वतीचे दिव्यरूप वर्णन केले आहे. दुर्गादेवीने शंकराला सांगितले आहे की, वैकुंठात महालक्ष्मी, गोलोकात राधिका, शिवलोकात शिवा आणि ब्रह्मलोकात सरस्वती या स्वरूपात मी राहते. वेदमाता मीच आहे.
 
दुर्गेची प्रतिमा म्हणजे राष्ट्रशक्तीचे प्रतिरूपच आहे. राष्ट्राचे शरीर-मनोबल, सर्वागीण समृद्धी, अध्यात्मसंपदा या तिहींचा संयोग त्या प्रतिरूपात झाला आहे. मोहरूपी महिषासुराचा वध करून ही जनांना सन्मार्ग दाखवते. त्यांना आधि-व्याधींपासून मुक्त करते. दुर्गेची शक्ती ही इच्छा, ज्ञान, क्रिया या रूपांनी त्रिविध आहे. सिंह हे तिचे वाहन आहे पण तो केवळ पशू नसून साक्षात धर्म आहे. धर्म चराचराला धारण करतो आणि तो स्वत: देवीचे वाहन बनून राहतो. (देवी महिमा : 3)
 
विठ्ठल जोशी

Share this Story:

Follow Webdunia marathi