Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Tuljapur तीर्थक्षेत्र तुळजापूर

Tuljabhavani temple
, सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (22:40 IST)
तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून 270 मीटर उंचीवर वसलेल्या बालाघाट पर्वतरांगेत हे ठिकाण आहे. तुळजापूर मराठ्यांच्या कार्यकाळात भरभराटीस आले. भोसले राजघराण्याचे हे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मोहिमेवर निघायचे नाहीत. मंदिर परिसरात सर्वत्र चिंचेची झाडे असल्याने या परिसराचे मूळ नाव चिंचपूर होते. कालांतराने श्री तुळजा भवानी मातेच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव तुळजापुर झाले. देदेशभरातून दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात.
नवरात्राच्या काळात ह्या क्षेत्रास विशेष धार्मिक महत्व प्राप्त होते.
 
तुळजापूर नजीक पंढरपूर व अक्कलकोट ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीथेक्षत्रे आहेत. मंदिरात दररोज पहाटे चारच्या सुमारास चौघड्याच्या निनादाने पुजेस प्रारंभ होतो. दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेस चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. शंभू महादेवाच्या सन्मानार्थ याच महिन्यात शिखर-शिंगणापूर येथे जत्राही भरते. पौर्णिमेच्या दुधाळ प्रकाशात येथून परतताना भाविक तुळजापूरला भेट देतात. कर्नाटकातल्या विजापूर येथील शाकंबरी देवीच्या सन्मानार्थ दरवर्षी पौष महिन्यात शाकंबरी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरात दरवर्षी आश्विन महिन्यात शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येतो. श्री तुळजा भवानी मंदिर न्यास मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. मंदिराच्या आवारातच न्यासाचे कार्यालय आहे. भेट देणार्‍या सर्व भक्तांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था न्यासामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.
 
मुख्य मंदिर
मंदिरात प्रवेशासाठी राजा शहाजी व राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वारे आहेत. मुख्य दाराच्या पहिल्या माळ्यावर श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयांना लागूनच श्री समर्थ विशेष हे विश्रामगृहही आहे. महाद्वारातून प्रवेश करताना आपणास तुळजा भवानी मंदिर न्यासाचे कार्यालय व राजा शाहू प्रशासकीय सदनाच्या कार्यालयांसोबतच भारतीय स्टेट बँक व उपडाकघरही दृष्टीस पडते. मंदिरात नारळ फोडण्यास मनाई आहे. मंदिराच्या छायाचित्रणाची परवानगी नाही.
 
पायर्‍या उतरल्यावर उजव्या हातावर गोमुख तीर्थ तर डाव्या हातावर कल्लोळ तीर्थ दृष्टीस पडते. भवानी मातेच्या दर्शनाअगोदर भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात. मंदिराच्या आवारातच अमृत कुंड व दुध मंदिर आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हातावर सिद्धीविनायक मंदिर आहे तर उजव्या बाजूस आदिशक्ती, आदिमाता मातंगीदेवीचे मंदिर आहे. माता अन्नपूर्णेचे मंदिरही येथेच आहे.
 
मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस मार्कडेय ‍ऋषींचे मंदिर आहे. तसेच पायर्‍या उतरत खाली गेल्यास तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर समोर यज्ञकुंड आहे.
 
जाण्याचा मार्ग
सोलापूर व उस्मानाबदहून तुळजापूरला जायला नियमित बस आहेत. सोलापुरहून जवळपास चाळीस किलोमीटरवर तुळजापूर आहे. उस्मानाबादहून येथील अंतर 16 किलोमीटर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास सोलापूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. विमानाने जायचे असल्यास पुणे किंवा हैदराबाद गाठावे लागेल व तेथून तुळजापुरला यावे लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Garba : गरबा खेळणे म्हणजे काय ?