महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांसाठी मंदिर आता 22 तास खुले ठेवण्यात येणार आहे.
येत्या 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या काळात तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार आहे. नवरात्रीनिमित्त होणारी गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 1 वाजता हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असून ते रात्री 11 वाजपर्यंत म्हणजे 22 तास खुले राहणर आहे. गेली दोन वर्ष राज्यात कोरोनाचे सावट होते. त्यामुळे भाविकांसाठी मंदिरातील दर्शनावर पूर्णपणे बंदी होती, मात्र यंदा दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच भाविकांना मंदिरात कोणत्याही निर्बंधांशिवाय मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
26 सप्टेंबर 2022 पासून भारतात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. यादिवशी पहाटे तुळजाभवानी मातेची प्राणप्रतिष्ठापना होत दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना होते. घटस्थापना होत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात रंगरंगोटी, साफसफाई आणि दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. घटस्थापनेच्या आधी ही सर्व काम पूर्ण केली जाणार आहेत. घटस्थापना ते अश्विनी पौर्णिमा असे 15 दिवस हा महोत्सव सुरु असतो. यावेळी दररोज सरासरी दोन लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असतो. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून तयारी केली जाते.