Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाइलचोरांचा आयएमइआयलाही ठेंगा

मोबाइलचोरांचा आयएमइआयलाही ठेंगा
, मंगळवार, 3 नोव्हेंबर 2015 (11:17 IST)
मोबाइल हँडसेट हरविल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर त्याच्या शोधासाठी महत्त्वाचा दुवा ठरणारा ‘इंटरनॅशनल मोबाइल स्टेशन इक्विपमेंट आयडेंटिटी’ (आयएमइआय) क्रमांक बदलण्याचा धंदा सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात जोरात सुरू आहे. त्यामुळे चोरीचे हँडसेट ट्रॅक करणे, ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली असून देशाच्या सुरक्षेपुढेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे शहरातील बुधवार पेठ आणि पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी कॅम्प, सांगवी पट्ट्यांत काही ठिकाणी अवघे सातशे-आठशे रुपये आकारून आयएमइआय क्रमांक बदलून दिला जात आहे. चोरीचे अथवा सापडलेले मोबाइलचे लॉक ब्रेक करण्यापासून ते हा क्रमांक बदलण्यापर्यंतचे धंदे गल्ली-बोळांत बोकाळले आहेत. पोलिसांकडून मोबाइल चोरीचा विषय ‘ऑप्शन’ला टाकण्यात आल्याने हे धंदे तेजीत सुरू आहेत. त्यात बोगस सिमकार्ड शोधण्यातच पोलिसांची दमछाक होते. त्यामुळे बोगस ‘आयएमइआय’ क्रमांक शोधण्याचे आव्हान कायमच राहणार आहे. बोगस ‘आयएमइआय’ शोधण्यासाठी तपास यंत्रणांकडे कुठलेही तंत्रज्ञान उपलब्ध नाही. दूरसंचार संचालनालयानेही हँडसेट तयार कंपन्यांशी चर्चा करून यावर ठोस उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले, की सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या मदतीने बोगस ‘आयएमइआय’ असलेले हँडसेट आणि गुन्हेगार शोधणे शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली.


 
चोरीला गेल्यावर या क्रमांकाच्या आधारे तो ट्रॅक करता येतो आणि त्याआधारे चोरी शोधून काढता येते. तसेच गैरकृत्यांमध्ये अडकलेल्या आरोपींचाही तपास या क्रमांकांद्वारे लावणे शक्य होते. पण आता हे क्रमांकच बदलण्यात येऊ लागल्याने आपले हँडसेट सुरक्षित नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
 
सध्या इंटरनेटवर ‘आयएमइआय’ क्रमांक बदलण्याचे अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. या सॉफ्टवेअरचा सर्वाधिक वापर हा अँँड्रॉइड फोनसाठी करण्यात येतो. काही हँडसेटसाठी प्रॉक्झी सर्व्हरवरून ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो. चोरीला गेलेल्या मोबाइलचे ‘आयएमइआय’ क्रमांक बदलण्याची एक टोळीच काही वर्षामध्ये पुणे आणि मुंबईमधील चोरबाजारात उदयास आली आहे. हे नंबर बदलून हँडसेट पुन्हा विक्रीस येऊ लागले आहेत. प्रत्येक हँडसेटची स्वत:ची जागतिक (यूनिक) ओळख कायम ठेवण्यासाठी 16 अंकी क्रमांक असतो. प्रत्येक मोबाइलची बॅटरी काढल्यानंतर आतील बाजूस तो लिहिलेला असतो; तसेच मोबाइलच्या बिलावर आणि बॉक्सवर तो लिहिला जातो. मोबाइलच्या आतील बाहेरील बाजूसही तो लिहिण्यात येतो. मोबाइल कोणत्या भागात आणि कोण वापरत (टॉवर लोकेशन) आहे हे त्यावरून समजते. ड्युएल सिमकार्ड असलेल्या मोबाइलसाठी दोन आयएमइआय क्रमांक असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi