Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फुले उधळावीत असा (खल) नायक

फुले उधळावीत असा (खल) नायक
WDWD
दृष्ट, कपटी पाटील किंवा, बेरकी इसम असे व्यक्तिविशेष समोर आणले की का कुणास ठाऊक निळू फुले आठवतात. अशा प्रकारच्या खलनायकी भूमिकांवर एवढा जबरदस्त पगडा उमटविणार्‍या निळू भाऊंच्या कर्तृत्वाचे मोजमाप केवळ खलनायक म्हणून करता येणार नाही, पण त्यांच्या आयुष्यातला मोठा भाग या प्रकारच्या भूमिकांनीच व्यापला आहे, हेही विसरता येणार नाही. वैशिष्ट्यपूर्ण आवाज, संवादफेकीची वेगळी शैली, तिरपी व भेदक नजर आणि याला समर्थ अभिनयाची जोड या जोरावर निळूभाऊंनी अनेक भूमिकांचे सोने केले.

त्यांच्यातल्या अभिनेत्याचा जन्म फार लहानपणीच झाला होता. निळूभाऊंना लहाणपणापासूनच नकलांची आवड. शिक्षकांच्या नकला ते करून दाखवायचे. मग शिक्षकांनाही त्यांना प्रोत्साहन दिले. त्यातूनच नाटकाची आवड जोपासली गेली. याच काळात देशात स्वातंत्र्याचे आंदोलन चालले होते. त्यांचे बंधू दत्तात्रय हे या आंदोलनात होते. त्यांना शिक्षाही झाली होती. त्यांचीच प्रेरणा घेऊन हान असले तरी चिठ्ठ्या पोहोविणे, निरोप देणे ही कामेही त्यांनी केली. चळवळीशी त्यांचा संबंध आला तेव्हापासून. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेवा दल या दोन्ही संघटना फार्मात होत्या. निळूभाऊ खेळायसाठी म्हणून संघाच्या शाखेवर जायचे. पण त्यांच्याबरोबर दलित, ख्रिश्चन आणि इतर जातीतील मुलंही असायची. दलित आणि मुस्लिम मुलांना आणू नका, असे तिथल्या शाखा प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे मग संघ सुटला. मग तिथे राष्ट्रसेवादलाशी संबंध आला. तिथे मात्र सर्वधर्मियांना येण्याची मुभा होती.

सेवादलातच त्यांना राम नगरकर, लीलाधर हेगडे, वसंत बापट ही मंडळी भेटली. निळूभाऊंच्या अभिनयाचा पाया कलापथकाने घातला. या कलापथकाद्वारे प्रबोधन आणि मनोरंजन यांचा संयोग साधून लोकनाट्ये व्हायची. त्यातला अर्धा भाग लिखित आणि अर्धा स्वयंस्फूर्त असायचा.मग व्यावसायिक नाटकात त्यांनी पदार्पण केले. कथा अकलेच्या कांद्याची, सखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबुतर ही नाटके मिळाली. दहा एक हजार प्रयोग केले. कथाचे दोनेक, जंगली कबूतरचे दीडेक हजार, सखारामचे आठशे प्रयोग केले.

मग दिग्दर्शक अनंत मानेंनी त्याच्यातला गुणी अभिनेता हेरला आणि 'एक गाव बारा भानगडी'मध्ये झेले अण्णाची भूमिका दिली. ही भूमिका अजरामर झाली. शंकर पाटलांनी लिहिलेला हा चित्रपट होता. मराठी आणि कानडी सीमेवरील ही व्यक्तिरेखा होती. शंकर पाटलांकडे जाऊन पंधरा दिवस तेही भाषा शिकले. यानंतर मग त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली. सामना, सिंहासन, शापित हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांनी अनेक हिंदी सिनेमेही केले. त्यापैकी ‘ कुली , गुमनाम है कोई , जरा सी जिंदगानी , रामनगरी , नागिन - २ ’ यात त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. पण मराठी चित्रपटाला त्यांचा बेरकी, खलनायकी पाटील किंवा सरपंचच जास्त गाजला.

व्यक्तिरेखा खलनायकी असल्या तरी निळूभाऊ अत्यंत भला माणूस होते. ते म्हणायचे, की ' प्रत्येक कलावंताला आपल्या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. मी माझ्या जीवनात अत्यंत साधा आहे, पण पडद्यावर मात्र खलनायक. पण मी या भूमिका किती प्रभावीपणे करतो हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आजही मी सामाजिक कामाच्या निमित्ताने खेड्यापाड्यात जातो, तेव्हा माझ्या पडद्यावरची खलनायकी भूमिका किती प्रभावी आहे याची पावती मिळते. गावातल्या शिक्षिका, नर्स, गृहिणी माझ्यापासून दूर रहातात. त्यांना वाटते, की पडद्यावरचा निळू फुले प्रत्यक्षातही तसाच वागतो की काय?'

चित्रपटातल्या भूमिकांनी निळू फुले देशभर पोहोचले असले तरी नाटक हीच त्यांची मूळ आवड आहे. 'नाटक करताना मजा येते, असं ते म्हणायचे. नाटक करताना सावधगिरी बाळगावी लागते. तुमच्या प्रत्येक संवादावर लगेचच प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते. तिथेच खर्‍या अभिनेत्याची कसोटी लागते, असं ते म्हणत.

अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारने तीन वेळा ‘ उत्कृष्ट अभिनेता ’ हा पुरस्कार देऊन गौरविले . संगीत नाटक अकादमी , अनंतराव भालेराव पुरस्कार आदी पुरस्कारही त्यांना मिळाले होते .

व्यक्तिगत आयुष्यात निळूभाऊ अत्यंत साधे होते. विनम्र होते नि कमालीचे सज्जनही होते. पडद्यावरची खलनायकी छटा त्यांच्या आयुष्यात अजिबात नव्हती. पडद्यावर अभिनय करणारे निळूभाऊ सार्वजनिक आयुष्यात मात्र सामाजिक उत्तरदायीत्व मानणारे होते, म्हणूनच ते अनके चळवळींशी जोडले गेले होते. सत्यशोधक समाजाशी त्यांचा संबंध होताच, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही काम ते करीत. वर्तमानातील अनेक घटना-घडामोडींवर ते आवर्जून टिप्पणी करत. त्यांचे वाचनही दांडगे होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने 'फुले' उधळण्याच्या योग्यतेचा 'नायक' गेला.

Share this Story:

Follow Webdunia marathi