पडद्यावर आपल्या खलनायकी अभिनयाने अनेकांना कापरं भरायला लावणा-या निळू फुलेंमध्ये सामाजिक जाणीवेचे भान ठेवून काम करणारा कार्यकर्ताही होता. पुरोगामी विचारांच्या चळवळीमधील हा कार्यकर्ता उलगडून सांगताहेत अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर...तो काळ 1985 ते 90 चा असेल प्रकृती अस्वाथ्यामुळे निळू भाऊंनी चित्रपट कमी करून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र शांत बसेल तो कार्यकर्ता कसचा. याकाळात अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि समविचारी संघटनांच्या कामाची गतीही चांगलीच वाढली होती. आम्ही सांगत असलेले, मांडत असलेले विचार लोकांना पटू लागले होते. त्यामुळे कामही विस्तारत चालले होते. याकाळात एक दिवस कुठल्याशा कार्यक्रमानिमित्त आम्ही निळू भाऊंकडे गेलो. निळू भाऊंनी स्वतःहून आम्हाला अंनिसच्या कामात मदत करण्याचे आश्वासन देऊन आठवड्याला दोन दिवस देण्याचा मनोदय बोलून दाखविला. मूळातच राष्ट्रसेवा दलाचे संस्कार आणि पुरोगामी विचारांची बैठक यामुळे निळूभाऊ आधीपासूनच चळवळीच्या संपर्कात होते. मात्र कामाच्या गडबडीत ते प्रत्यक्ष संघटनेच्या व्यासपीठावर खूप क्वचित वेळा असत. निळू भाऊंनी स्वतःहून आठवड्यात दोन दिवस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमच्या कामाला जोर आला. मला आठवतं आता-आतापर्यंत ठरल्याप्रमाणे निळूभाऊ सलग आमच्या सोबत असायचे. सकाळी आठ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही त्यांचे कितीतरी कार्यक्रम निश्चित करून ठेवत असू आणि निळू भाऊ त्या सर्व कार्यक्रमांना सारख्याच उत्साहाने हजेरी लावत. एवढा मोठा नट मात्र संघटनेच्या कामात त्यांनी कधीही आपल्या मोठेपणाची प्रौढी मिरवली नाही. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये ते अगदी सामान्य म्हणून काम करताना मी पाहिले आहे. संघटनेच्या कामात मूळातच पैशांची वानवा असल्याने ब-याचदा त्यांच्या प्रवासाची सोय रेल्वेच्या सेकंड स्लीपरमधून केली जायची तर मुक्कामासाठीही मोठ्या लॉज परवडत नसल्याने स्थानिक पातळीवर ती गव्हर्मेंट गेस्ट हाऊसमध्ये केली जायची. तिथली अस्वच्छता व गैरसोयी अशा गोष्टी असूनही निळू भाऊंनी त्याबद्दल आमच्याकडे कधीही तक्रार केली नाही. त्यामुळेच मला त्यांच्यासोबत काम केल्याचा मनस्वी अभिमान वाटतो. पुरोगामी चळवळीचा आणि विचारांचा कोणताही कार्यक्रम असो लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि कार्यक्रमांना गर्दी व्हावी यासाठी आम्ही निळू भाऊंमधील नटाचे ग्लॅमर वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांना त्यांच्यातील नटापेक्षा कार्यकर्ताच अधिक भावल्याचे माझ्या लक्षात आले. चळवळीचे अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे यायचे आपल्या खाजगी अडचणी सांगायचे आणि निळू भाऊ त्यांना आपल्या खिशात हात घालून असेल तेवढी रक्कम द्यायचे. सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना यातून आमच्या समोर आली. यासाठी आम्ही निधी उभा करायचे ठरविल्यानंतर त्यासाठी नाटकांचे शो करणे असो की विद्यार्थी उपवास कार्यक्रम (प्रत्येक विद्यार्थ्याने एक दिवसातील एक वेळ उपास करून त्यातून वाचलेले पाच रुपये समितीला देणे अशी ही कल्पना होती. या उपक्रमात 5 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 25 लाख रुपये निधी गोळा केला होता.) प्रत्येक वेळला या कार्यक्रमाच्या प्रचाराची जबाबदारी निळू भाऊंनी आपण होऊन स्वीकारली. (पुढील पानावर...)[email protected] (09713039145)
चळवळीतील ढोलकीवाला
निळू भाऊ नेहमी गमतीने आपण चळवळीतील 'ढोलकीवाला' असल्याचे म्हणत. 'ज्याप्रमाणे रस्त्यावरच्या कार्यक्रमासाठी ढोलकीवाला ढोलकी वाजवून गर्दी गोळा करण्याचे काम करतो. तसे काम मी करतो', असे ते म्हणत. पण प्रत्यक्षात केवळ ढोलकीवाला इतकेच काम त्यांचे नव्हते हे नंतर आमच्या लक्षात आले. निळू भाऊ केवळ एक नट किंवा कलावंत नव्हते. तर त्यांना एक वैचारिक व राजकीय समज होती. हौसी खातर कार्यकर्ता बनलेला नट तो नव्हता तर अंतर्मनातील तगमगीतून त्यांच्यातील कार्यकर्ता तयार झाला होता हे मी मुद्दाम सांगू इच्छितो.
...आणि खलनायक हिरो ठरला
मला आठवतं बार्शी (जि.सोलापूर) येथे मी, राम नगरकर आणि निळू भाऊ एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. मात्र माझ्या भाषणाच्या वेळी नेमका माईक बंद पडला. त्यामुळे लोकांना ते ऐकताच आले नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनी दुस-या माईकची व्यवस्था केली आणि राम बोलायला उभे राहिले. दुदैवाने त्याही वेळी माईक बंद पडला आणि रामचे भाषणही लोकांना ऐकता आले नाही. नंतर निळू भाऊ बोलणार होते. ते नेहमी केवळ सात ते आठ मिनिटे बोलत असल्याने एवढ्या तयारीने केलेला कार्यक्रम फ्लॉप झाल्याचे पाहून आम्ही नाराज झालो. कार्यकर्त्यांनी घाई-घाईने तिस-या माईकची व्यवस्था केली आणि निळू भाऊ बोलायला उभे राहिले. एरवी सात-आठ मिनिटे बोलणारे निळू भाऊ त्यादिवशी तब्बल अर्धा तास एखाद्या अभ्यासू आणि फर्ड्या वक्त्यासारखे प्रवाही बोलत राहीले. एरवी लोकांना खलनायक म्हणून माहीत असलेला हा माणूस त्या दिवशी ख-या अर्थाने आमच्या कार्यक्रमाचा हिरो ठरला.
निळू भाऊंच्या सामाजिक जाणीवेची दुसरी एक घटना त्याही पेक्षा मला जास्त महत्वाची वाटते. निळू भाऊंच्या साठाव्या वाढदिवशी त्यांचा षष्ठ्यब्धपूर्ती सोहळा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मी त्याची कल्पना निळू भाऊंना सांगितली. आम्ही तुमच्या कार्यक्रमासाठी सहा लाख रुपये गोळा करतो ते पैसे तुम्ही सामाजिक कृतज्ञता निधीला द्या अशी आमची कल्पना होती. निळू भाऊंनी त्यास होकार दिला. मात्र नंतर दोन दिवसांनी त्यांचे मला लेखी पत्र आले, पत्राचा मजकूर होता. 'अशा प्रकारे माझ्या वाढदिवसाच्या नावे माझ्याच संघटनेच्या माध्यमातून माझ्या लोकांकडून पैसे गोळा करणे मला योग्य वाटत नाही. कृपया क्षमस्व'.
निळू भाऊंसोबत काम करताना या दोन घटना मला नेहमीच लक्षात राहिल्या. प्रसिध्दीच्या झोतात राहूनही लहानपणापासून मिळालेले सेवा दलाचे संस्कार त्यांनी अखेर पर्यंत जपले. चित्रपटातून खलनायकाची भूमिका वठवणारा हा कलावंत प्रत्यक्षात मात्र माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांसाठी नायक होता. आयुष्याच्या रंगमंचावरून या नायकाची एक्झिट चटका लावणारी आहे.
(शब्दांकनः विकास शिरपूरकर)