भारताच्या खात्यात एक सुवर्णपदक जमा झाले असले तरी त्यासाठी शंभराहून अधिक वर्षांची प्रतीक्षा आहे. या देशातील कोट्यवधी लोकांच्या मनातील खोल जखमेला मलम लावून दिलासा देणारा हा विजय आहे. |
|
|
अभिनव बिंद्राने मिळविलेल्या सोनेरी यशाची झळाळी काही और आहे. हा केवळ प्रतिभावान खेळाडूच्या कौशल्याचा सन्मान नसून एक अब्ज लोकांचे स्वप्न सत्यात उतरवणारा हा आशेचा किरण आहे. जगभरात आपल्या हॉकीचे वर्चस्व कमी झाल्यावर आपण ऑलंम्पिकमध्ये जन-गण-मन ऐकण्यासाठी आतुर होतो. आज पहिल्या पायरीवर उभे राहिलेला अभिनव बिंद्रा आणि जन-गन-मनवर उन्नत होत जाणारा तिरंगा हे दृश्य पाहणे हा रोमांचकारी अनुभव होता. यामागच्या भावना शब्दात व्यक्त न करता येण्यासारख्या आहेत.हा अविस्मरणीय क्षण डोळ्यांच्या कोंदणात साठवून ठेवताना शुभेच्छा, सलाम, शाब्बास आणि झिंदाबाद अभिनव.. असे शब्द मनातून व्यक्त झाले. ज्या देशात क्रिकेटला धर्म समजून पुजले जाते त्या देशाचे प्रतिनिधीत्व करताना अभिनवने केलेली कामगिरी प्रशंसनीय आहे. 20- ट्वेंटीच्या प्रवाहात आता नेमबाजीलाही त्याने आपल्या कामगिरीनेही एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. इतर सर्व खेळात स्वतःला सिध्द करण्यासाठी एका क्रिकेटपटूंपेक्षा अधिक ऊर्जा, साहस आणि आत्मबळाची आवश्यकता असते. जेथे एका महिला वेटलिफ्टरला घाणेरड्या राजकारणाची शिकार बनवून ऑलिंपिकपासून वंचित ठेवले जाते आणि खेळाविषयी काहीच माहिती नसणारे संघ अधिकारी जेथे आहेत, त्या भारतासाठी अभिनवने मिळविलेल्या यशाची किनार किती सोनेरी असेल याचा विचार करावा. निशाणेबाजी हा खर्चिक खेळ आहे आणि अभिनव आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा उद्योजक घराण्यातील आहे हेही तितकेच सत्य आहे. तो गरीब घरातील असता तर त्याने हे यश संपादन केले असते काय हाही एक प्रश्न आहे. आज जल्लोषात सामील झालेल्या देशातील तमाम क्रीडा प्रेमी आणि क्रीडा संघटनांशी निगडीत पदाधिकार्यांनी तो स्वतःविचारला पाहिजे. अभिनवनेही स्वतः जिंकल्यानंतर भावनात्मक न होता महत्त्वाची बाब सांगितली. 'यानंतर तरी भारतात ऑलिंपिक स्पर्धांसंदर्भातील स्थिती आणि विचार करण्याची पद्धत बदलायला हवी, एवढीच अपेक्षा मी ठेवतो,' या त्याच्या विधानातूनही त्याने बरेच काही सांगितले आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेला आपण आजही प्राधान्य देत नाही, हेच दुःख त्याच्या बोलण्यातून व्यक्त झाले. तेच आपण ओळखू शकलो नाही, तर केवळ पदकांसाठी आस ठेवण्याला काहीही अर्थ नाही. अन्यथा अभिनव बिंद्रा व राजवर्धनसिंह राठोड आपल्याला असे काही आनंदाचे क्षण देतील, पण देशातील क्रीडा व्यवस्थेतून ते साकारले नसतील. थोडक्यात स्वतःच्या बळावर हे यश त्यांनी मिळविले असेल. |
राष्ट्रगीतासह तिरंगा उन्नत होत असताना अभिनव शांत होता. पण त्याच्या चेहर्यावर बरेच बोलके भाव होते. बीजिंगमध्ये भारतीय राष्ट्रगीताची धुन वाजविण्याची ही नांदी आहे. |
|
|
पदक तालिकेत थायलंडसारख्या देशाच्या खात्यात सुवर्ण आणि झिम्बाब्वेसारख्या देशाला रौप्य पदक मिळताना पाहतो, त्यावेळी खूप दुःख होते. अभिनवने या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे, सहाजिकच भारतीय मनांनाही त्यामुळे आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे. ज्या आत्मविश्वासाने अभिनवने या सुवर्णपदकाला गवसणी घातली, त्यावरून त्याच्या मनोबलाचा अंदाज येतो.
अजून सायना नेहवाल, राजवर्धन राठौर व पेस भूपती ही जोडी या सगळ्यांकडून अशी कामगिरी होईल की ज्यामुळे भारतीय तिरंगा चिनी मातीत डौलाने फडकेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. अभिनव तुझ्या या सुवर्णमयी झळाळत्या यशाबद्दल, पुन्हा एकदा अभिनंदन.