अमेरिकेचा जलतरणपटू मायकल फेल्प्सने ऑलिपिंकमध्ये १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून या स्पर्धेतील सातवे सुवर्ण पटाकावले आहे. या विक्रमाने त्याने त्याच्याच देशाच्या मार्क स्पिटजचा एका ऑलिंपिकमध्ये सात सुवर्णपदके पटकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
फेल्प्सने ५०.५८ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक आपल्या नावे केले. गेल्या सहा स्पर्धांत फेल्प्सने सहा सुवर्णपदके पटकावताना नवा विश्वविक्रमही नोंदवला. मात्र, सातव्या स्पर्धेत विश्वविक्रमापासून तो ०.१८ सेकंद दूर राहिला.
शेवटच्या टप्प्यात फेल्प्स मागे पडला होता. मात्र, नंतर त्याने पिछाडी भरून काढून विजेतेपद पटकावले.
अमेरिकन जलतरणपटू स्पिटजने १९७२ मध्ये म्युनिक ऑलिंपिकमध्ये सात सुवर्णपदके जिंकली होती. फेल्प्सनेही सात सुवर्ण मिळवून त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता रविवारी तो मेंडले रिलेमध्ये भाग घेणार आहे. यात त्याला आठवे सुवर्णपदक पटकावून विश्वविक्रम करण्याची संधी आहे.