अवघ्या जगाचे लक्ष वेधलेल्या, 205 देशांच्या खेळातील महाभारतासाठी एका योध्याप्रमाणे चीनचे बिजींग शहर सजले आहे. अवघ्या काही तासांत यावर्षीच्या ऑलिंपिक खेळांचे उद्घाटन होणार असून, यापूर्वीच उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला क्रीडाप्रेमींच्या ह्णदयाची स्पंदने अधिक वेगवान झाली आहेत. चीनी मातीत लढल्या जाणाऱ्या या महाभारतासाठी अनेक देशांचे प्रतिनिधी बिजींगमध्ये डेरेदाखल झाले आहेत.
या महाकुंभात स्वतः:चा सहभाग नोंदवण्यासाठी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, आणि प्रतिनिधी सध्या बिजींगमध्ये चीनचे वैभव न्याहाळत आहेत.
बीजिंगमध्ये खेळाचे महाभारत होत असताना एखाद्या नववधूप्रमाणे बीजिंग सजवण्यात आले आहे. चौकाचौकात चीनचा इतिहास आणि वैभवाची साक्ष देणाऱ्या पताका लावण्यात आल्या आहेत.
चीनचा राष्ट्रध्वज शहरातील बहुतांश घरावर वाऱ्याच्या वेगाला साथ देत आहेत. शहरातील प्रत्येक चौकात ऑलिंपिकसाठी येणाऱ्या खेळाडू आणि क्रीडा प्रेमींचे स्वागत करणारे फलक मानाने डौलत आहेत. त्यांच्या जोडीला शहरातील उंचच उंच इमारतींनाही सजवण्यात आले
असून, त्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
ऑलिंपिक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चिनी पोलिस आणि लष्कराच्या गाड्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. या मार्गावरील सर्वच गाड्या आणि वस्तूंची कसून तपासणी करण्यात येत आहे. जागोजाग बसवलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे संदेश ऐकण्यात नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
तिबेटी नागरिकांचा होणारा विरोध पाहता ऑलिंपिक गावाकडे फक्त पास असलेली वाहनेच सोडण्यात येत आहेत. चीनमधील अनेक वृत्त वाहिन्यांनी हा सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे ठरवल्याने बीजिंगसह चीनमधील सर्वच क्रीडाप्रेमींना घरबसल्या सोहळा पाहायला मिळणार आहे.
चीनचा शुभांक आठ असल्याने उद्याच्या मुहूर्तावर चीनमध्ये या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 24 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या ऑलिंपिकमध्ये एकूण 205 देशांचे 10500 खेळाडू सहभागी होण्यासाठी ऑलिंपिक गावात दाखल झाले आहेत.
सात तारखेच्या काळोखाला भेदत चीनची ऑलिंपिक ज्योत आठ तारखेच्या सूर्याला जणू आणखी एक प्रकाश किरण देणार असल्याचे चित्र सध्या बीजिंगमध्ये दिसत आहे.