अखिलेश कुमार, जितेंद्र आणि आता विजेंद्र, या तीनही भारतीय मुष्टीयोध्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत ऑलिंपिकमध्ये भारताचे नाव गाजवले खरे परंतु महत्त्वाच्या सामन्यात नेहमीच बचावात्मक पवित्रा घेतल्याने बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्ण पदकाची आशा निमली आहे. विजेंद्रचा जरी आज क्युबाच्या एमिविओने 8-5 ने पराभव केला असला तरी, विजेंद्रला कांस्य पदक मात्र मिळणार असल्याने भारतीयांच्या आनंदाला उधाण आले आहे. आज विजेंद्रच्या आजच्या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच बचावात्मक खेळ केला. पहिल्या राऊंडमध्ये एमिविओने दोन गुण मिळवत आघाडी संपादन केली होती. यानंतर दुसऱ्या फेरीत विजेंद्रने काहीसा आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु एमिविओने त्याच्यावर प्रतिहल्ला चढवत आपल्या गुणांमध्ये वाढ केली. तिसऱ्या फेरीत मात्र एमिविओने अत्यंत सावध पवित्रा घेतला होता. त्याच्यावर असेलेला दबाव स्पष्ट जाणवत होता. अखेरच्या फेरीत एमिवियोने निर्णायक आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.