कोणताही उत्सव, समारोह, किंवा बैठक असू देत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी यजमान संपूर्ण व्यवस्था करतातच. नव्हे तसा प्रोटोकॉलच आहे.
परंतु बिजींग ऑलिंपिकच्या वृत्त संकलनासाठी गेलेल्या प्रसार माध्यमांच्या जगभरातील प्रतिनिधींना येथे कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि मोफत तर काहीच नसल्याने महागाईचा चांगलाच चटका सहन करावा लागत आहे.
बिजींग ऑलिंपिकसाठी चीन सरकारने अब्जावधी रुपयांचा खर्च केला असला तरी, प्रसारमाध्यमांसाठी मात्र कोणतीही सेवा येथे पुरविण्यात आली नसल्याचे वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांचे म्हणणे आहे.
भारताहून येथे आलेल्या काही पत्रकारांना धक्काच बसला जेव्हा त्यांना देण्यात आलेले इंटरनेट डाटा कार्ड बिजींगमध्ये बंद झाले. हे कार्ड वैध नसल्याचे बिजींग पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यांना दुसरे कार्ड पुरविण्यासही ऑलिंपिक समितीने नकार दिला असून, बिजींगमध्ये अशा स्वरूपाचे कार्ड अत्यंत महाग आहे. त्यामुळे ते विकत घेणेही या पत्रकारांना परवडणारे नाही.
त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. हीच अवस्था चीन वगळता इतर देशांच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची झाली आहे.