Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोशल मीडियावर ‘मोगली’ म्हटलं जाणाऱ्या नीरज चोप्राचा पानिपतमधील गावापासून पॅरिस ऑलिंपिकपर्यंतचा प्रवास

neeraj chopra
, शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (12:21 IST)
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिंपिकमध्ये भालाफेक क्रीडाप्रकारात रौप्यपदक पटकावलं आहे. तर, टोक्योमध्ये झालेल्या ऑलिम्पिक 2020मध्ये पदकापासून दूर राहिलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक कमावण्याची कामगिरी नीरजनं केली आहे.

टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरजनंही भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण जिंकलं होतं. त्याशिवाय गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यानं सुवर्णपदकाची कमाई केली होती.
यंदा पॅरिस ऑलिंपिकच्या फायनल नीरजचा पहिला थ्रो फाऊल झाला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्यानं 89.45 मीटरवर भालाफेक केली. नीरजचे पुढचे प्रयत्नही अपयशी ठरले. पण रौप्यपदक मिळवण्यासाठी ही कामगिरी पुरेशी ठरली.
 
दुसरीकडे अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटरवर भालाफेक करत नवा ऑलिंपिक विक्रम रचला आणि सुवर्णपदकही निश्चित केलं. पाकिस्तानचं हे ऑलिंपिकमधलं पहिलंच वैयक्तिक सुवर्णपदक आहे.
ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सनं 88.54 मीटरवर थ्रो करत कांस्यपदक जिंकलं.
भारतासाठी सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारे खेळाडू
स्वतंत्र भारतासाठी सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदकं जिंकणारा नीरज आजवरचा एकूण तिसरा खेळाडू आणि आजवरचा दुसरा पुरुष आहे.
 
याआधी पैलवान सुशील कुमारनं 2008 साली बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य आणि मग 2012 सालच्या लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावलं होतं.
 
तर पीव्ही सिंधूनं 2016 साली रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि मग टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं.
नीरज चोप्राने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल
ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदकविजेता नीरजने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेतही सुवर्णपदक आपल्या नावे केलं.
विशेष म्हणजे, स्पर्धेत पहिल्या फेरीत नीरज चोप्रा 12व्या स्थानी होता. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या डावात कोणतीही चूक न करता नीरजने आपली कामगिरी उंचावली.
या निमित्ताने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान नीरजच्या नावे नोंदवला गेला होता.
“ही स्पर्धा ऑलिम्पिकपेक्षा कठीण असते. शेवटच्या भालाफेकपर्यंत मी स्वतःला पुश केलं,” अशी प्रतिक्रिया नीरजने ही स्पर्धा जिंकल्यानंतर दिली होती.
यंदाच्या म्हणजेच 2023 च्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरू आहेत.
या स्पर्धेतील भालाफेक खेळाची स्पर्धा रविवारी (27 ऑगस्ट) खेळवण्यात आली. यामध्ये नीरजची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली.
पहिल्या फेरीत नीरजने केलेली भालाफेक फाऊल (अमान्य) ठरल्याने तो खूपच मागे राहिला होता. पण त्यानंतरही खचून न जाता दुसऱ्या फेरीत नीरजने 88.17 मीटर अंतर पार केलं. तर तिसऱ्या फेरीत नीरजला 86.32 मीटर अंतर गाठता आलं.
 
पण नीरजने दुसऱ्या फेरीत गाठलेलं 88.17 मीटरचं अंतर कुणीच पार करू न शकल्याने अखेरीस सुवर्णपदक त्याच्या नावे झालं.
 
पाकिस्तानचा खेळाडू अरशद नदीम या स्पर्धेत 87.82 मीटर अंतरासह दुसऱ्या स्थानी तर चेक रिपब्लिकचा जेकब वादलेच हा 84.18 मीटरसह तिसऱ्या स्थानी राहिला.
 
नीरज चोप्राने टोक्योमध्ये झालेल्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. तिथेही अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू तो ठरला होता. तसंच गेल्या वर्षी डायमंड लीग स्पर्धेतही नीरजने गोल्ड मेडल जिंकलं होतं.
 
नीरजने केलेल्या या कामगिरीचं भारतासह जगभरातून मोठं कौतुक होत आहे.
 
13 व्या वर्षी भालाफेकीला सुरुवात
नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरयाणा जवळच्या पानिपत गावाजवच्या खंदरा खेड्यातला आहे. वडील शेतकरी आणि आई घरकाम करता करता वडिलांना शेतात मदत करणारी. घरात खेळांचं वातावरण अजिबात नव्हतं.
पण 2010मध्ये 13 वर्षांचा असताना नीरजने पानिपतच्या एका मैदानात जसबीर सिंग नावाच्या एका खेळाडूला जोरात धावत येत हातातली अणकुचीदार वस्तू दूरवर फेकताना पाहिलं. हा सगळा प्रकार नीरजला नवीन होता. कुतुहल म्हणून तो तिथे रेंगाळला आणि घरी आला तो जयवीरचा मित्र होऊन तसंच भालाफेकीची जुजबी माहिती घेऊनच.
 
'खेळातला वेग, धावतानाचा तो आवेश आणि जसबीरची पिळदार शरीरयष्टी यांची त्यादिवशी मला भुरळ पडली. कुठलाही खेळ बघायला मला आवडायचं पण, यावेळी तो स्वत: खेळावासा वाटला,' नीरजने काही वर्षांपूर्वी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या होत्या.
 
तेव्हा नीरजचं वजन होतं 80 किलो!
गावाजवळच भालाफेकीचं प्रशिक्षण मिळतं हे तर कळलं. पण, नीरज शेतकऱ्याचा खाता-पिता मुलगा होता. घरातलं दूध आणि पनीर यावर वाढला होता. चोप्रा घराण्यातल्या या लाडक्या मुलाचं वजन होतं चक्क 80 किलो. किंबहुना त्याचं वजन थोडं कमी व्हावं म्हणूनच त्याच्या वडिलांनी पानिपत मैदानावर खेळाच्या मैदानावर आणलं होतं.
घरच्यांना सतत वाटत होतं की, त्याने कुठला तरी खेळ खेळावा, जेणेकरून त्याचं वजन आटोक्यात येईल. आणि त्यांना वाटलंही नसेल इतकी त्यांची योजना यशस्वी झाली. नीरजला भालाफेकीचा चसकाच लागला आणि हा खेळच त्याच्यासाठी सर्वकाही बनला.
 
सुरुवातीला पानिपतमध्ये जय चौधरी यांच्याकडे त्याने प्रशिक्षण सुरू केलं. पुढे क्रीडा प्राधिकरणाच्या पटियाळा केंद्रात जगप्रसिद्ध भालाफेकपटू उवे हॉन यांच्याकडून त्याला मार्गदर्शन मिळालं. उवे हॉन हे खेळातले असे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी 100मीटरच्या वर भालाफेकीचा विक्रम केलाय. त्यांनीच नीरजमधला व्यावसायिक भालाफेकपटू घडवला.
 
पुढे नीरजने 2016मध्ये 20 वर्षांखालील वयोगटातली वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. पुढे 2018च्या कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये त्याने गोल्ड जिंकलं. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू. सध्या नीरज क्लाऊस बार्टोनेझ यांच्याबरोबर स्वीडनमध्ये सराव करतो.
 
ऑलिम्पिकपूर्वी नीरजचा उजवा हात मोडला होता
खरंतर दुखापती हा कुठल्याही खेळाच अविभाज्य भाग. पण, काही दुखापती कारकीर्दीवर परिणाम करणाऱ्या ठरतात. नीरजसाठी अशीच एक दुखापत त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच 2012मध्ये झाली. पानिपतमध्येच बास्केटबॉल खेळताना त्याच्या उजव्या हाताचं मनगटाचं हाड मोडलं.
ही दुखापत इतकी गंभीर होती की, नीरजला त्या वयात भीतीच वाटली आपण पुढे खेळू की नाही. पण, नशीबाने तो या दुखापतीतून बरा झाला. उजव्या हाताला जखम झाली असली तरी त्यामुळे त्याच्या खेळाच्या शैलीवर परिणाम झाला नाही. पुढे ऑलिम्पिकसाठी तयारी करत असतानाही याच हाताला परत एकदा मार बसला आणि तो 2019मध्ये तब्बल आठ महिने खेळापासून दूर होता.
 
एकतर कोव्हिडमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नव्हत्या. आणि त्यातच दुखापतीतून सावरण्याचं आव्हान. पण, आधी ऑलिम्पिक पुढे गेलं आणि मग भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने घेतलेल्या चाचणी स्पर्धेपूर्वी फिट होत नीरजने फिट होत नीरजने 83 मीटरवर भालाफेक करून कसंबसं शेवटच्या क्षणी ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. पण, त्याची चिकाटी आणि आत्मविश्वास इतका दांडगा की, त्याने मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करत गोल्ड जिंकलंच.
त्याला दुखापत झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही टोकयोची तयारी करणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधताना नीरजच्या दुखापतीची खास चौकशी केली होती.
 
नववीतच शिक्षण सोडलं
बाराव्या वर्षी नीरजने भालाफेकीचं प्रशिक्षण सुरू केलं. त्यामुळे त्याची शाळा मात्र अर्धवट सुटली. नववीतच त्याने शालेय शिक्षण पूर्णपणे सोडलं. नंतर बाहेरून दहावी-बारावीची परीक्षा दिल्यानंतर आता तो बाहेरूनच बीएच्या परीक्षेला बसणार आहे. त्यासाठी कुरुक्षेत्र विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला आहे.
अठरा वर्षांचा झाल्यावर क्रीडा कोट्यातून त्याला भारतीय सैन्यदलात नोकरी मिळाली. पण, पदवी हातात नसल्यामुळे नायब सुभेदार पदावर त्याची वर्णी लागली. तो राजपुताना रायफल्समध्ये तैनात आहे. आज त्याने गोल्ड जिंकल्यावर त्याला पहिल्या शुभेच्छा दिल्या त्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीच.
 
नीरजला आतापर्यंत मिळालेली मेडल आणि पुरस्कार
नीरज 19 वर्षांचा असताना 20 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून प्रकाशझोतात आला. त्यावेळी त्याने 86.48 मीटरचा जागतिक विक्रमही रचला. त्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नीरजचं कौतुक केलं होतं. आणि फेसबुकवर पोस्टही लिहिली होती.
पुढे 2018मध्ये त्याने कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकलं. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू. त्याचवर्षी भारत सरकारने नीरजला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केलं.
 
अशा या नीरज चोप्राने आपल्या कामगिरीतलं सातत्य आणि आलेख सतत चढता ठेवून ऑलिम्पिक गोल्डवर आपलं नाव कोरलंय.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिक्कीमच्या सोरेंगमध्ये आज सकाळी जाणवले भूकंपाचे धक्के