Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पॅरिस ऑलिंपिक : खाशाबा जाधव, अभिनव बिंद्रा ते नीरज चोप्रा आणि हॉकीचा सुवर्णकाळ

पॅरिस ऑलिंपिक : खाशाबा जाधव, अभिनव बिंद्रा ते नीरज चोप्रा आणि हॉकीचा सुवर्णकाळ
, शुक्रवार, 26 जुलै 2024 (10:25 IST)
फ्रान्सची राजधानी पॅरिस तिसऱ्यांदा ऑलिंपिकचं यजमानपद भूषवत आहे. या शहराचं भारताच्या ऑलिंपिकमधल्या प्रवासाशी जवळचं नातं आहे.
 
कारण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती म्हणजे IOC च्या रेकॉर्डनुसार भारतानं पहिलं ऑलिंपिक पदक पॅरिसमध्येच मिळवलं होतं.
 
तेव्हापासून आजवर भारताच्या खात्यात ऑलिंपिकमध्ये 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य अशी एकूण 35 पदकं मिळवली आहेत.
 
भारताच्या ऑलिंपिकमधल्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेऊया.
 
नॉर्मन प्रिचर्ड यांनी उघडलेलं खातं
1900 साली पॅरिसमध्ये पहिल्यांदा ऑलिंपिकचं आयोजन झालं. तेव्हा भारतावर ब्रिटनचं राज्य होतं आणि नॉर्मन प्रिचर्ड यांनी भारताकडून त्या ऑलिंपिकमध्ये दोन रौप्यपदकांची कमाई केली होती.
 
त्यांनी 200 मीटर अडथळ्याची शर्यत आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत ही रौप्यपदकं मिळवली होती.
 
कोलकात्यात जन्मलेले नॉर्मन अथलिट होते आणि नॉर्मन अथलेटिक्सच्या बरोबरीने फुटबॉलही उत्तम खेळायचे. ते भारतीय पासपोर्टसह पॅरिसला गेले होते.
 
पण नॉर्मन ऑलिंपिक स्पर्धेत स्वतंत्र खेळाडू म्हणून सहभागी झाले होते आणि नॉर्मन यांची पदकं आमची आहेत असा दावा ब्रिटनने केला होता.
 
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीन मात्र नॉर्मन यांची पदकं भारताच्या खात्यात दाखवलं. अधिकृत निकालातही तशीच नोंद आहे.
 
त्यामुळे भारत हा ऑलिंपिक पदक मिळवणारा पहिला आशियाई देश ठरला.
 
दरम्यान नॉर्मन यांनी पुढे भारतीय फुटबॉल संघटनेचं सचिवपद भूषवलं आणि नंतर खेळ सोडून अभिनयाकडे मोर्चा वळवला.
 
हॉलिवूडमध्ये गेल्यावर त्यांनी नॉर्मन ट्रेव्हर असं नाव घेतलं आणि अनेक भूमिका समर्थपणे साकारल्या.
 
चित्रपटांत काम करणारे नॉर्मन हे पहिले ऑलिंपियन ठरले होते.
 
भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ
1928 सालच्या ऑलिंपिकमध्ये भारतानं पहिल्यांदा हॉकीचं सुवर्णपदक मिळवलं आणि खऱ्या अर्थानं या खेळाचा सुवर्णकाळ सुरू झाला.
 
तेव्हाही देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. एकीकडे स्वातंत्र्यचळवळीनं जोर धरला होता.
 
बहुतांश जनतेला आर्थिक चणचणीमुळे मूलभूत गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागत होता. साहजिकच खेळांसाठीच्या सोयीसुविधा किंवा साधनं उपलब्ध नव्हती आणि खेळाला प्राधान्य देण्यासारखी स्थिती देशात नव्हती.
 
पण या खडतर परिस्थितीला तोंड देत भारताच्या पुरुष हॉकी संघाने अ‍ॅमस्टरडॅम 1928, लॉस एंजेलिस 1932, बर्लिन 1936 अशा सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवत आपण जगात सर्वोत्तम असल्याचं सिद्ध केलं.
 
पुढची दोन वर्ष महायुद्धामुळे ऑलिंपिकचं आयोजन झालं नाही. नंतर लंडन 1948, हेलसिंकी 1952 आणि मेलबर्न 1956 या सलग तीन ऑलिंपिक या स्पर्धांमध्येही भारतीय पुरुष हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकत वर्चस्व कायम राखलं.
 
हा तो काळ होता जेव्हा प्रवासाची साधनं मर्यादित आणि वेळखाऊ होती. प्रतिस्पर्ध्यांच्या खेळाचा अभ्यास करण्यासाठी व्हीडिओ विश्लेषण तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. तरीही भारतानं ही कामगिरी बजावली.
 
अचंबित करणाऱ्या सातत्यानंतर मात्र भारतीय हॉकी क्षेत्राला अनागोंदीने ग्रासलं. संघटनांमधील वाद, निधीचा अभाव, संघनिवड-प्रशिक्षक निवड यातील वाद विकोपाला गेले. जागतिक स्तरावर बाकी देशांनी आपली गुणकौशल्यं घोटली आणि भारत हॉकीत मागे पडला.
 
मग चार दशकांनी, टोकियो ऑलिंपिकमध्ये तो दुष्काळ संपला. 2021 साली झालेल्या त्या स्पर्धेत भारतानं हॉकीचं कांस्यपदक मिळवलं.
 
खाशाबा जाधवांची कमाल
कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी 1952 साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या बँटमवेट प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं. भारताचं ते ऑलिंपिकमधलं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं होतं.
 
लाल मातीत कुस्तीचे डाव गिरवलेल्या खाशाबा यांचा हेलसिंकीतला पदकाचा सामना कसा रंगला, हे तुम्ही इथे वाचू शकता.
 
त्या काळात गटवार कुस्तीच्या प्राथमिक फेऱ्या होत असत आणि गुणांच्या आधारे टॉप खेळाडूंची पदकांसाठी लढत होत असे.
 
खाशाबांनी पाचव्या राऊंडमध्ये रशियाच्या मेमेदबेयोव्हविरुद्ध तासभर लढा दिला पण त्यात ते पराभूत झाले.
 
ही मॅरेथॉन लढत खेळून खाशाबा दमले होते. पण, पुढच्या पंधरा मिनिटांत त्यांना पदकासाठीची फेरी खेळावी लागली.
 
खरंतर नियमानुसार खाशाबा वेळ मागू शकले असते, पण दुर्देवाने त्यावेळी टीममधलं कुणी त्यांच्याबरोबर नव्हतं आणि खाशाबांना आपलं म्हणणं इंग्रजीत मांडता आलं नाही. तरीही त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि कांस्यपदक मिळवलं.
 
अलीकडे खेळाडूंना आर्थिक मदत मिळते, प्रशिक्षक फिजिओ, ट्रेनर मदतीला असतात. पण
 
खाशाबांच्या वेळी परिस्थिती वेगळी होती.
 
ते ज्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते तिथले प्राध्यापक खर्डीकर यांनी राहतं घर गहाण टाकून सात हजार रुपये उभे केले. एका बँकेकडून सहा हजारांचं कर्ज घेतलं आणि त्यातून ही हेलसिंकी वारी शक्य झाली.
 
खाशाबा पदकासह परतले, तेव्हा करवीरवासीयांच्या उत्साहाला उधाण आलं आणि गावकऱ्यांनी कऱ्हाडपासून जन्मगाव गोळेश्वर पर्यंत 151 बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती.
 
त्यानंतर चार वर्षांनी खाशाबांना पोलीस दलात नोकरी मिळाली मात्र पुढची 22 वर्ष बढती मिळाली नाही. 1984मध्ये एका मोटार अपघातात त्यांचं निधन झालं.
 
पेसने फोडली कोंडी
भारताचा टेनिसस्टार लिअँडर पेसनं 1996 साली अमेरिकेच्या अटलांटा शहरात झालेल्या ऑलिंपिकमध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक मिळवलं.
 
खाशाबा जाधव यांच्या ऐतिहासिक पदकानंतर तब्बल 44 वर्षांनी भारताला पेसच्या रुपानं दुसरं वैयक्तिक पदक साजरं करता आलं.
 
तसंच 1980 मधल्या हॉकीच्या पदकानंतर म्हणजे सोळा वर्षांनी भारताला ऑलिंपिकमध्ये पदकतालिकेत खातं उघडता आलं.
 
पेसनं अटलांटामध्ये स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती पण आंद्रे आगासीने तेव्हा त्याला नमवलं होतं.
 
मग कांस्यपदकासाठीच्या लढतीत पेसने ब्राझीलच्या फर्नांडो मेलिजेनीवर 3-6, 6-2, 6-4 असा विजय मिळवला.
 
कर्णम मल्लेश्वरीची कमाल
पेसने प्रज्वलित केलेली मशाल चार वर्षात वेटलिफ्टिंगपटू कर्णम मल्लेश्वरीने तेवत ठेवली.
 
2000 साली सिडनी इथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये मल्लेश्वरीनं 69 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं.
 
ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी पदक पटकावणाऱ्या मल्लेश्वरी पहिल्या महिला खेळाडू ठरल्या होत्या.
 
राज्यवर्धन सिंग राठोडचा लक्ष्यवेध
लष्करी सेवेत असतानाच राज्यवर्धन राठोडनं नेमबाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात नाव गाजवायला सुरुवात केली होती. पण त्यांना खरी ओळख अथेन्स ऑलिंपिकनं दिली.
 
राठोड यांनी अथेन्समध्ये रौप्यपदकाची कमाई केली आणि भारतीय नेमबाजांच्या क्षमतेवरच शिक्कामोर्तब केलं.
 
राठोड यांना राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, पद्मश्रीनं सन्मानिक करण्यात आलं. लष्करानंही त्यांना प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवलं.
 
लष्करातून निवृत्ती घेतल्यानंतर राज्यवर्धन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2014 मध्ये राज्यवर्धन जयपूर ग्रामीण मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतरच्या काळात राज्यवर्धन यांनी माहिती आणि प्रसारण आणि क्रीडा खात्याचा कारभार पाहिला.
 
सुवर्णपदकाचा 'अभिनव' क्षण
भारताचं वैयक्तिक सुवर्णपदकाचं स्वप्न नेमबाज अभिनव बिंद्राने प्रत्यक्षात साकारलं. बीजिंग इथे 2008 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत अभिनवने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं.
 
ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा अभिनव पहिला भारतीय खेळाडू ठरला.
 
ऑलिंपिकच्या पोडियमवर जनगणमनचे सूर निनादत आहेत आणि मागे तिरंगा फडकतोय या अनोख्या क्षणाची अनुभूती अभिनवमुळे देशवासीयांनी अनुभवली. मायदेशी परतल्यानंतर अभिनववर कौतुकाचा वर्षाव झाला.
 
अनेक वर्ष नेमबाजी क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अभ्यासू नेमबाजांमध्ये अभिनवची गणना व्हायची. घरच्यांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर अभिनवने खेळातले बारकावे विदेशात जाऊन पक्के करून घेतले होते.
 
बीजिंगमध्ये दडपणाच्या क्षणी मनशांती ढळू न देता अभिनवने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. अभिनवचं सुवर्णपदक हा देशातल्या असंख्य युवा पिढीसाठी प्रेरकबिंदू ठरला.
 
खेळातून बाजूला झाल्यानंतर अभिनव आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटना तसंच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचं काम करतो. अभिनव बिंद्रा फाऊंडेशनची त्याने स्थापना केली आहे. चतसंच भुवनेश्वर इथे अभिनव बिंद्रा स्पोर्ट्स मेडिसन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची त्याने स्थापना केली.
 
सुशील-विजेंदरची कमाल
बीजिंगमध्ये पैलवान सुशील कुमार आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांनीही पदकावर नाव कोरलं. सुशीलने 66 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल प्रकारात तर विजेंदरने मिडलवेट गटात कांस्यपदक पटकावलं.
 
आपापल्या खेळांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दोघांनी ऑलिंपिक व्यासपीठाचं दडपण न घेता चांगला खेळ करत पदक पटकावलं. सुशीलचं यश हे युवा कुस्तीगीरांसाठी आश्वासक टप्पा मानला जातो.
 
एका युवा कुस्तीपटूचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी सुशील कुमारला तुरुंगात जावं लागलं.
 
दुसरीकडे विजेंदर सिंग ऑलिंपिक पदकानंतर पोस्टर बॉय ठरला. विजेंदरच्या यशाने भारतीय बॉक्सिंगला नवी दिशा मिळाली. ऑलिंपिक यशानंतरही विजेंदरने आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली.
 
रॅम्पवॉक, चित्रपटात भूमिका याबरोबरीने विजेंदरने प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये विजेंदरने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याने निवडणूकही लढवली मात्र त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.
 
सायना, मेरी कोम आणि पदकांचा षटकार
अभिनव-सुशील-विजेंदर यांच्या यशाने नेमकं काय साधलं याचं उत्तर लंडन ऑलिंपिकमधल्या भारताच्या कामगिरीत आहे. भारताने लंडनवारीत सहा पदकांची कमाई केली.
 
नेमबाज विजय कुमारने रौप्य तर गगन नारंगने कांस्यपदक पटकावलं. सुशीलने बीजिंगमधल्या यशाला झळाळी देत चंदेरी पदकावर नाव कोरलं.
 
भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालने कांस्यपदक नावावर केलं. देशवासीयांना अभिमान वाटावा अशी कारकीर्द नावावर असणाऱ्या बॉक्सर मेरी कोमने कांस्यपदक मिळवून दिलं.
 
कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही आपली क्षमता सिद्ध करत कांस्यपदक जिंकलं.
 
सायनाच्या यशाने भारतीय बॅडमिंटन क्षेत्राला नवा आयाम मिळाला. ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी सायना पहिली बॅडमिंटनपटू ठरली.
 
सायना मायदेशी परतल्यानंतर देशभरात तिच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित झाले. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे देशात अनेक गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये, मेट्रो शहरांमध्ये बॅडमिंटन खेळलं जाऊ लागलं.
 
पालक हौसेने आपल्या मुलांना बॅडमिंटन खेळायला पाठवू लागले.
 
मेरी कोमच्या यशाने ईशान्येतील राज्यांना नवी ओळख मिळवून दिली आणि महिला बॉक्सिंगमध्ये नवं पर्व सुरू झालं.
 
सिंधू-साक्षी चमकल्या पण...
ब्राझीलमधल्या रिओ दी जानिरो इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पदकाच्या खूप अपेक्षा होत्या. पण भारताच्या हाती अवघी दोन पदकं आली.
 
कुस्तीत साक्षी मलिकने फ्रीस्टाईल 58 किलो वजनी गटात कांस्यपदक नावावर केलं.
 
तर पी. व्ही. सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मारिनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. पण या सामन्याची गणना बॅडमिंटन विश्वातल्या सार्वकालीन महान मुकाबल्यांमध्ये केली जाते.
 
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, सुपर सीरिज स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सिंधूने अपेक्षांचं ओझं न बाळगता बहारदार खेळ करत पदक पटकावलं.
 
टोकियोत नीरज चोप्रानं रचला इतिहास
नीरज चोप्रानं टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक (जॅवेलिन थ्रो) प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आणि भारतीय खेळांमधला नवा अध्याय लिहिला.
 
भारताचं अ‍ॅथलेटिक्समधलं ते पहिलंच ऑलिंपिक सुवर्ण होतं. तसंच नीरज स्वतंत्र भारतासाठी अ‍ॅथलेटिक्समध्ये ऑलिंपिक पदक मिळवणारा पहिलाच खेळाडू ठरला.
 
ऑलिंपिकमध्ये नीरज पहिल्यांदाच सहभागी झाला होता. पण नवोदित असल्याचं दडपण त्याच्यावर दिसून आलं नाही.
 
खरं तर कोव्हिडमुळे तेव्हा ऑलिंपिक वर्षभर पुढे ढकललं गेलं. 2020 ऐवजी 2021 साली या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या.
 
त्यात सायखोम मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक मिळवत भारताचं खातं उघडलं. पीव्ही सिंधूनं बॅडमिंटन महिला एकेरीत कांस्य तर लवलिना बोर्गोहाईननं महिलांच्या वेल्टरवेट बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवलं.
 
कुस्तीत रवि दाहियानं रौप्य तर बजरंग पुनियानं कांस्य आणि पुरुषांच्या हॉकी टीमनंही कांस्य पदकाची कमाई केली.
 
भारतीयांनी त्या स्पर्धेत एकूण 7 पदकं जिंकत आजवरची सर्वोत्तम कामिगिरी नोंदवली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'जनसंपर्क वाढवा, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला उत्तर द्या', पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांना सल्ला