Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सात रूपये घेताना देतील का मतदार साथ?

सात रूपये घेताना देतील का मतदार साथ?

उमरगा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार ज्ञानराज चौगुले यांनी मतदारांकडून सात रूपये गोळा करण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. या प्रयोगात मतदार सात रूपये देतील मात्र त्यांना साथ देतील का? अशी चर्चा आहे.

श्री. चौगुले हे उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करतात. पुनर्रचनेनंतर उमरग्याची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली आणि आ. प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या खास मर्जीतले असलेले चौगुले यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. काँग्रेसकडून एक सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. बी. पी. गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठवाडा उपविभागाचे आरोग्य उपसंचालक या पदावरून निवृत्त झालेले डॉ. बी. पी. गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाला सात कोटी रूपयांचा पक्षनिधी देऊन उमेदवारी मिळविल्याची चर्चा आहे. मात्र, गायकवाड यांनी त्याचा इन्कार केला आहे.

पण तोच धागा पकडून चौगुले यांनी मतदारांकडून सात रूपये गोळा करायला सुरवात केली आहे. सात रूपयांच्या माध्यमातून ते सात कोटी रूपये लोकांवर बिंबविण्याचा प्रयत्न करत आहेत. एका सभेत ज्ञानराज चौगुले यांना मतदारांनी साथ देण्यासाठी प्रत्येकी सात रूपये देण्याचे आवाहन आ. रवींद्र गायकवाड यांनी केले आणि अक्षरशः पंधरा मिनिटात उपस्थित मतदारांमधून ४१ हजार ५०० रूपये जमा झाले. उमरग्याजवळील कन्हेर या छोट्या खेडेगावातून मतदारांनी चौगुले यांना चार हजार रूपये जमा करून दिले. आता तर शिवसेनेच्या उमेदवारांनी चक्क पावती बुक छापून सात रूपये गोळा करण्यास सुरूवात केल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रयोगात सहाय्यक असणारे शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांचा अभिनव प्रयोग यशस्वी होणार की सेवा निवृत्तीनंतर जनसेवेची इनिंग सुरू करणारे डॉ. बी. पी. गायकवाड यशस्वी होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi