Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजजींचा 'रोखठोकनाम्याची' ब्ल्यू प्रिंट !

राजजींचा 'रोखठोकनाम्याची' ब्ल्यू प्रिंट !

अभिनय कुलकर्णी

PR
PR
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली. या झाडाझडतीने धरती आंदोळली. कित्येक 'बांगड्या' फुटल्या. कित्येक घरंगळत पुन्हा आपल्या मायदेशी गेल्या. राजमान्य राजेश्री राजजींच्या या तेजतर्रार आंदोलनाने बहु मराठी मने आनंदली. 'मराठा तितुका मेळवावा'चा नाद घुमला आणि या महाराष्ट्रदेशी 'आनंदवनभुवनी'ची अनुभूती येऊ लागली. तर या सगळ्याचा मोठा लाभ राजजींना झाला. त्यांची लोकप्रियता बहु वाढली.

त्यातच महाराष्ट्रदेशी निवडणूक जाहीर झाली. राजजींशी आमचे अतिशय घरोब्याचे संबंध असल्याने या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठिशी असणार आहोत. त्यामुळे त्यांच्या अतिगुप्त बैठकांतही आमचा सहभाग असतो. अशाच एका बैठकीत आम्ही सहभागी झालो असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'रोखठोकनामा' आमच्या हाती लागला. (रोखठोक हे शीर्षक श्रीमान ठाकरेजींच्या स्वभावाशी निगडीत असून त्याचा 'ठोकण्याशी' काहीही संबंध नाही हे सूज्ञास सांगणे न लगे.) सांगायचा मुद्दा असा की हा रोखठोकनामा राजजींच्या व्यक्तिमत्वाला साजेसाच आहे. निवडणुकीनंतर राजजी काय करणार आहेत, याची चुणूक त्यातून कळते. राजजी हे सगळे जे काही करत आहेत, ते 'महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा' या न्यायानेच असल्याने हा रोखठोकनामा मला मायबाप जनतेसमोर आणणे जरूरीचे वाटले. सबब, हा रोखठोकनामा खाली दिला आहे.

* महाराष्ट्रात यापुढे फक्त मराठीच बोलली, लिहिली जाईल. (ही मराठी कोणती यावर सध्या चर्चा (खरं तर वाद) सुरू आहे. पुण्याची, विदर्भाची, कोकणातली, खानदेशातली की पश्चिम महाराष्ट्रातली असा तो वाद आहे. काहींनी ज्ञानेश्वरकालीने मराठीचे रूप सर्वांत शुद्ध मानावे असे म्हटले आहे. पण मराठा महासंघ व इतर संघटनांनी त्याला तीव्र विरोध करून तुकारामाच्या काळातील मराठी शुद्ध मानावी असे म्हटले आहे.

* महाराष्ट्रात प्रवेश नाक्यांवर 'मराठी बोलणार्‍यासच प्रवेश' असा बोर्ड लावला जाईल. या तसेच सर्व नाक्यांवर एक भाषाविषयक तज्ज्ञ ठेवण्यात येईल. त्याची पात्रता साधारणपणे मराठी प्राध्यापकाएवढी असेल. (पात्रता हा शब्द शैक्षणिक पात्रतेशी निगडीत असून त्याचा बौद्धिक कौशल्याशी संबंध नाही.) प्रत्येक गाडीतून उतरणार्‍या प्रवाशाला मराठी येते की नाही याची तो तपासणी करेल. तसेच मराठी शिकविण्याची व्यवस्थाही येथे असेल. किमान कामचलाऊ मराठी शिकविण्याचे 'क्लासेस' उघडणार्‍यांना येथे फुकट सरकारी भूखंड दिला जाईल. विमानतळावरही मराठी शिकविण्यासाठी खास अधिकारी असेल.

* शाळेतही अर्थात मराठीतूनच शिकवले जाईल. हिदी भाषिक विद्यार्थ्यांना 'एक्स्ट्रा मराठी' असा विषय असेल. त्यात त्यांना हिंदी भाषकांना ळ, ड, ट, ज्ञ ही अक्षरे तसेच च, ज यांचे उच्चार घोटवून घेण्यात येतील. त्यांच्याकडून मराठीचा सराव करण्यासाठी 'घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा' हे गाणे कविता म्हणून पाठ्यक्रमात सामील करण्यात येईल. हे गाणे म्हणून दाखविणार्‍या हिंदी भाषकाला 'मराठी प्रवीण' ही पदवीही देण्यात येईल.

* याशिवाय ज्यांचे शिक्षण पूर्वी हिंदीत झाले आहे त्यांना मराठी शिकविण्यासाठी 'फाडफाड मराठी' 'तातडीचे मराठी', कामचलाऊ मराठी' 'शुद्ध मराठी' असे कोर्स सुरू करण्यात येतील. हे कोर्स चालविणार्‍या क्लासचालकांना सवलती देण्यात येतील. तसेच यासाठी लागणारी पुस्तके सरकारी खर्चाने उपलब्ध करून देण्यात येतील.

* उत्तर भारतीयांना मराठी 'धडा' शिकविणार्‍या मराठी युवकांना विशेष गुण दिले जातील. याचा उपयोग त्यांना सरकारी नोकरीतील प्राधान्य, सरकारी घरात प्राधान्य वगैरेसाठी होऊ शकेल.

* बैंक, बैग, इस्कूल, आईसीआईसीआई असे उच्चार करणार्‍या हिंदी भाषकांना कठोर दंड ठोठावण्यात येईल.

* केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील कार्यालयातही मराठीतूनच कामकाज चालेल. 'हिंदी पखवाडा' बंद करून 'मराठी वर्ष' असा उपक्रम राबविला जाईल. टपालापासून आयकरापर्यंतची सर्व कार्यालये हिंदीतूनच काम करतील. रेल्वेचे कामकाजही महाराष्ट्रात तरी मराठीतूनच चालेल. त्यामुळे रेल्वेची उद्घोषणा फक्त मराठीत केली जाईल. महाराष्ट्रातील इतर भागात या उद्गोषणा मराठी आणि तेथील स्थानिक प्रादेशिक भाषेतही असतील. उदा. खानदेशात- खानदेशी. रेल्वेतील सर्व हिंदी शब्द मराठीत केले जातील. उपरी उपस्कर डिपो' वगैरे शब्दांचे मराठीत भाषांतर केले जाईल.

* दुकानांच्या सर्व पाट्या मराठीतच असतील. इंग्रजीत असलेल्या पाट्याही मराठीत करण्यात येतील. उदा. बिग बझारचे 'मोठा बाजार', कॅफे कॉफी डेचे कॉफीचे दिवसाचे हॉटेल असे नामकरण करण्यात येतील. एवढच नव्हे तर ज्या कंपन्या महाराष्ट्रातून चालविल्या जातात, त्यांची नावेही मराठीत होतील. उदा. रिलायन्सचे 'विश्वास', कॅमलचे 'उंट' अशीही नावे मराठीत असतील.

* छट पूजेला परवानगी दिली जाईल. पण ही पूजा पूर्णपणे मराठीत होईल. त्यासाठी मराठी भिक्षुक असतील. त्यानंतर होणारी गाणीबजावणीही अस्सल मराठी होईल. त्यात लावणी, लोकसंगीत, मराठी भावसंगीत असे चढत्या भाजणीचे कार्यक्रम ठेवावे लागतील.

* मनोरंजनाची साधने फक्त मराठीतच उपलब्ध होतील. उदा. मराठी चित्रपट सर्व चित्रपटगृहात लावले जातील. त्यातही अलका कुबल छाप चित्रपट तर मल्टिप्लेक्समध्ये दाखविण्यात येईल. मराठी अभिनेत्यांना ग्लॅमर येण्यासाठी त्यांची मानधनाची रक्कम ही कोट्यावधीत देण्यात येईल. समजा निर्मात्याने (कसेबसे) २५ हजार दिल्यास उर्वरित रक्कम महाराष्ट्र सरकार देईल. मराठीचा गौरव टिकविण्यासाठी सरकारचे हे 'पुरोगामी' पाऊल असेल.

* बॉलीवूडचे चित्रपटही मराठीतच तयार होतील. फक्त त्याला हिंदी सबटायटल्स देण्याची मुभा दिली जाईल. पण त्यांना या चित्रपटात कंपल्सरी एक मराठी आयटम सॉंग टाकावे लागेल. (मराठीत हिंदी आयटम सॉंग चालते मग हे उलटे का नाही?) महाराष्ट्रात रहाणार्‍या हिंदी भाषकांना 'कंपल्सरी' मराठी चित्रपट पहावे लागतील. त्यांचे मराठी सुधरेपर्यंत तरी आठवड्याला एक असा हा 'रतीब' असेल.

* मराठीत काम करणार्‍या बॉलीवूडच्या अभिनेत्यांना त्यांच्या चित्रपटांच्या संख्येनुसार पुरस्कार देण्यात येईल. उदा. पाच चित्रपट केल्यास महाराष्ट्र गौरव, दहा केल्यास महाराष्ट्राचा अभिमान असे पुरस्कार देण्यात येतील.

* मराठी रागसंगीतातील हिंदी, अवधी, ब्रज भाषेतली बंदिशी बदलून त्यांची जागा मराठी पदांनी भरून काढली जाईल. त्यासाठी पूर्वी जसे राजकवी असायचे तशी कवींची भरती करण्यात येईल. हे कवी या बंदिशींना पर्यायी मराठी बंदिशी देतील.

* बिहार व युपीमधून येणार्‍या रेल्वेगाड्यांमध्ये महाराष्ट्रातील शेवटचे स्टेशन येईपर्यंत मराठी संस्कृतीची सीडी दाखवली, ऐकवली जाईल. त्यात अभंग, गवळण, लावणीपासून भावसंगीत ऐकविण्यात येईल. त्यानंतर मराठी सण-उत्सवांची ध्वनिचित्रफित दाखविण्यात येईल. महाराष्ट्रात येताना शेवटचे स्टेशन असेल तिथे यावर एक प्रश्नमंजूषा ठेवली जाईल. त्यात प्रथम क्रमांक मिळविणार्‍यांना 'पाईक महाराष्ट्राचा' हा पुरस्कार देण्यात येईल.

तर राजमान्य राजजींच्या 'रोखठोकनाम्यात' मराठीचा गौरव वृद्धिंगत करण्यासाठी अनेक 'कलमे' आहेत. पण विस्तारभयास्तव त्यातील मोजकी कलमेच येथे दिली आहेत. माननीय राजजींच्या नेतृत्वाखालील सरकार या महाराष्ट्र देशी आल्यानंतर नक्कीच मराठीचा गौरव वाढेल हे उपर्यु्क्त तर्जुम्यावरून कळोन येते नाही का?

(वरील 'रोखठोकनामा' ही थोरल्या महाराजांचे निकटस्थ रा. रा. मोरोपंत पिंगळे यांच्या आज्ञापत्रे या बहु गाजलेल्या ग्रंथाची त्रिशतकोत्तर आधुनिक आवृत्ती असल्याचे आमचिया कानावर आले आहे.)

Share this Story:

Follow Webdunia marathi