तिकीटवाटपाची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली आहे. प्रत्येक पक्षात एकेका जागेसाठी बरेच जण इच्छूक असायचे. यातही मधल्या फळीतील तरुण, उमेदी मंडळी आशावादी होती. पण, राजकीय शह-काटशहात आणि वशिलेबाजीच्या खेळात काहींना राजकीय बळी ठरावे लागले तर काहींना घोर उपेक्षेचा सामना करावा लागला. यात प्रामुख्याने जयप्रकाश गुप्त, प्रफुल्ल गुडघे, राजेंद्र मुळक, अभिजित वंजारी आदी नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय, माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचेही नाव घेता येऊ शकते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागावाटप जाहीर झाल्यानंतर लगोलगच उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या. नागपुरातील सर्वच मतदारसंघ आघाडीतील राजकारणात काँगे्रसच्या वाट्याला गेल्या आणि नंतर सुरू झाले शह-काटशहाचे राजकारण. नागपुरात सक्रिय असलेले मुत्तेमवार यांचा गट आणि चतुर्वेदी-अनिस अहमद-नितीन राऊत यांचे त्रिकूट हे काँग्रेसमधीलच दोन परस्परविरोधी गट एकमेकांना शह देण्याच्या कामाला लागले. यात नरेश गांवडे, अभिजित वंजारी या मधल्या फळीतील इच्छूक उमेदवारांचा मोठा अपेक्षाभंग झाला. तर, रणजित देशमुख, गुप्त, गुडधे, मुळक हे राजकारणाचे बळी ठरले आहेत.
मुत्तेमवारसमर्थक असलेले विकास ठाकरे, दीनानाथ पडोळे यांचा पत्ता साफ करण्यासाठी या त्रिकुटाने भरपूर जोर लावला तर तिथेच या त्रिकुटाच्या समर्थकांना तिकीट मिळू नये म्हणून मुत्तेमवारांनीही जोर लावला. पण, काँग्रेसश्रेष्ठींनी बॅलेन्स साधत या दोन्ही गटांना बरोबरीने खुश ठेवले आणि दोन्ही गटांच्या तीन-तीन उमेदवारांना उमेदवारी दिली.