Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

मौजमजेसाठी सुशिक्षित तरुणांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी; तिघांना अटक

35 bikes stolen
, बुधवार, 21 एप्रिल 2021 (08:05 IST)
सुशिक्षित दोन चोरट्यांनी पुणे, लातूर, जालना, धुळे, अहमदनगर या जिल्ह्यातून तब्बल ३५ दुचाकी चोरल्या. त्या दुचाकी तिसऱ्या साथीदाराच्या मदतीने किरकोळ किंमतीत विकल्या. कागदपत्रे नंतर देतो म्हणून मिळतील तेवढे पैसे घ्यायचे आणि त्या पैशांवर मौजमजा करत होते. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने या टोळीला बेड्या ठोकल्या असून ३३ लाख रुपये किमतीच्या ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संकेत आनंदा धुमाळ (वय २२, रा. मु.पो. खडकवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), श्रीकांत बाबाजी पटाडे (वय २३, रा. मु.पो. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे), सुनिल आबाजी सुक्रे (वय २६, रा. खडकवाडी, ता.आंबेगाव, जि. पुणे) अशी अटक केलेल्या वाहन चोरांची नावे आहेत. 
 
पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना माहिती मिळाली की, वखार महामंडळ चौक, पुणे नाशिक हायवे, भोसरी येथे दोघेजण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार एका पथकाने परिसरात सापळा लावला. मात्र चोरटे ठरलेल्या ठिकाणी आणि वेळी तिथे आले नाहीत. त्यातील एकजण आंबेगाव येथील असल्याची माहिती पोलिसांनी काढली आणि दरोडा विरोधी पथकाची एक टीम थेट आंबेगावला रवाना झाली.
 
तिथे पोलिसांनी संकेत धुमाळ याला १४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. धुमाळकडे चौकशी करून त्याचा दुसरा साथीदार श्रीकांत पटाडे याला ताब्यात घेतले. दोघांकडे तपास करून पोलिसांनी सुनील सुक्रे याला १५ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. सुनीलवर यापूर्वी तीन वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याने या चोरट्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना आरोपींकडे पोलिसांनी कसून तपास केला. तपासात तिन्ही चोरट्यांनी तब्बल ३५ दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी ३३ लाखांच्या ३५ दुचाकी अहमदपूर (लातूर), जालना, शिरपूर (धुळे), कोपरगाव, शनीशिंगणापूर (अहमदनगर), आळेफाटा, आंबेगाव, शिरूर शहरातून जप्त केल्या. आरोपी संकेत धुमाळ याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले असून त्याने पुढे अॅटोमोबाईलचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो पी. जी. कंपनीमध्ये सुपा येथे काम करीत आहे. श्रीकांत पटाडे विवाहीत असून त्याचे अकरावी पर्यंत शिक्षण झाले आहे. तो ट्रॅक्टर चालविण्याचा व्यवसाय करतो. तसेच आरोपी सुनिल सुक्रे आय. आय. बी. एम. चिखली या कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करीत होता. तसेच तो भारती विद्यापीठ कात्रज येथे गेस्ट सर्व्हिसेसच्या प्रशिक्षणासाठी असताना, त्या परिसरातील १० दुचाकी वाहने चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी सुनील हा मोटार सायकल चोरी करताना मास्टर चावीचा वापर करीत असे. वाहने चोरून ती यातील आरोपी श्रीकांत याच्या मार्फतीने गिऱ्हाईक शोधून त्यांना १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत विकत असे. गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगून काही वाहनांवर स्वतःच्या गाडीची नंबर प्लेट टाकून, पैशांची अडचण असल्याचे कारण सांगून वाहने गहाण ठेवीत असे. मिळालेले पैसे आरोपी तिघांमध्ये वाटून मौजमजा करीत होते.या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड शहरातील १३, पुणे शहरातील १० आणि पुणे ग्रामीण मधील एक असे २४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य वाहनांच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक मधील सर्व बांधकामे राहणार बंद, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय