पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतील लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. स्थायी समिती सदस्यांनी तपासात सहकार्य करण्याचे निर्देश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांनी आज पिंपरी-चिंचवडला भेट दिली.घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व संबंधीतांशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल त्या मला सादर करतील आणि त्यानंतर या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी पोलिस तपासात संपूर्ण सहकार्य करावे अशी सुचनाही पाटील यांनी केली आहे. या सर्व प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. या षडयंत्रा मागील चेहरा समाजापुढे उघड होईल असेही ते म्हणाले. भाजप प्रवक्ते अमोल थोरात यांनी पाटील यांची ही प्रतिक्रिया कळविली आहे.