पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भाविकांना मात्र या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. कारण दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने भाविकांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही मंदिरात जाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
भाविकांनी या गणपती मंदिराच्या परिसरात गर्दी केली होती. मात्र मंदिरातून दर्शन बंद करण्यात आले होते. भाविकांकडून हार, फुले, पेढे आणि नारळदेखील स्वीकारले जाणार नसून प्रसादही दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाई पाहून बाहेरूनच दर्शन घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाविकांनी दर्शनासाठी मंदिराबाहेर गर्दी करू नये, या उत्सव काळात भाविकांनी ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.