Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंबिलओढा अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक आक्रमक

आंबिलओढा अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक आक्रमक
, गुरूवार, 24 जून 2021 (16:41 IST)
पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील आंबील ओढ्याजवळ असणाऱ्या वस्तीत महापालिकेचा वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात येते आहे. यावेळी नागरिकांनी आक्रमक रूप धारण करत या कारवाईला जोरदार विरोध केला. महापालिकेच्या न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
हनुमंत फडके यांनी या संदर्भात महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीची सुनावणी झाली. पुढील आदेशापर्यंत कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय न्यायालयाने यावेळी दिला. न्यायालयाच्या आदेशात या भागातील कुटुंब विस्थापित होणार आहे. त्यांचं पुनर्वसनाची न्यायालयासमोर नाही. अशावेळी नागरिकांना उध्वस्त करणे उचित ठरणार नाही. जोपर्यंत या नागरिकांचे पुनर्वसन होत नाही,तोपर्यंत महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला स्थगिती देत आहोत असे नमूद करण्यात आले आहे.
 
यामुळे कारवाई दरम्यान सुरू झालेला नागरिक व प्रशासन यांच्यातला तीव्र संघर्ष तात्पुरता संपण्याची शक्यता आहे. पुण्यातील आंबील ओढ्याजवळचा कारवाईला विरोध करणाऱ्या १०० नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झाली होती.
 
पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील आंबील ओढ्याजवळ असणाऱ्या वस्तीत महापालिकेचा वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात येते आहे. या परिसरात पूर येऊ नये म्हणून आंबील ओढ्याची लांबी रुंदी वाढण्याचे काम केले जात आहे. तसेच या लागत भिंत देखील बांधली जात आहे. तसेच या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना देखील राबवली जात आहे. या सगळ्यासाठी इथल्या रहिवाशांची घरे पाडण्यात येत होती.
 
मात्र आज सकाळपासून या कारवाईला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. कारवाईला विरोध करण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी विरोध करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती.जे नागरिक विरोध करत होते अशा १०० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापुढे देखील जे विरोध करतील त्यांचावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले जाईल असे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले होते. यानंतर आता कारवाईला सुरुवात करत इथली घरे पाडायला सुरुवात झाली आहे. दरम्यान या सर्व लोकांची राहण्याची सोय ट्रान्झिट कॅम्प मध्ये सोय केली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
 
काय आहे नेमकं प्रकरण...?
 
कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ती जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार असा दावा करत नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
 
घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आंबिल विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात कडक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि पाडकाम सुरु आहे.  कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढलं, सध्या राजकीय नेते या कारवाईचा निषेध करत असले तरी राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे असं स्थानिक नागरिक म्हणत आहेत.
 
आंबिल ओढ्यामध्ये भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामं करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरुन नुकसान होते. प्रशासनाकडून वारंवार नाले बुजवले जातात, पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ बुजवले जात आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची वहनक्षमता 60 टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे.
 
दरम्यान, आंबिल ओढा अतिक्रमण कारवाई प्रकरणी 130 कुटुंबांना कारवाई करून हटवण्यात आले आणि त्यानंतर तिथे महापालिकेच्या वतीने घर तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाई करून बाहेर काढलेल्या 130 कुटुंबांपैकी 81 कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था राजेंद्रनगरच्या एस आर ए कॉलनीमधील इमारतीमध्ये करण्यात आली आहे.सुमारे 81 कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपाचा करारनामा तातडीने बांधकाम व्यावसायिकांकडून करून देण्यात येतोय. उर्वरित सुमारे पन्नास कुटुंबांनी बांधकाम व्यावसायिकाकडून भाडं घेऊन आपल्या पसंतीने जागा शोधून राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळी ज्या कारवाईने मोठा आक्रोश तयार झालेला होता दुपारपर्यंत प्रशासनाने अत्यंत वेगवान हालचाली करून परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं आणि कारवाई जवळपास पूर्ण केली.आता यानंतर आंबील ओढा सरळ करण्याचे काम आणि एसआरएच्या इमारतीच्या बांधकामाला ही सुरुवात केली जाईल. इथे या इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या 130 कुटुंबीयांना तिथे घर देण्यात येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवारांची परमबीर सिंग प्रकरणात सीबीआय चौकशी करा : भाजप